‘शिवालिक’ एलपीजी टँकर मुंद्रा बंदरात पोहोचला

दोन भारतीय ध्वजधारी एलपीजी जहाजांना इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवासाची दिली होती परवानगी

‘शिवालिक’ एलपीजी टँकर मुंद्रा बंदरात पोहोचला

संघर्षग्रस्त होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारा ‘शिवालिक’ हा एलपीजी टँकर गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहचल्याची माहिती समोर आली आहे. इराणी अधिकाऱ्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून द्रवीभूत पेट्रोलियम वायू (एलपीजी) वाहून नेणाऱ्या दोन भारतीय ध्वजधारी जहाजांना प्रवास करण्याची परवानगी दिली. त्यापैकी एक ‘शिवालिक’ आहे, तर दुसरे जहाज ‘नंदा देवी’ आहे. यापूर्वी, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी शनिवारी माहिती दिली होती की, शिवालिक आणि नंदा देवी ही जहाजे अनुक्रमे १६ मार्च आणि १७ मार्च रोजी भारतात पोहोचतील.

“पर्शियन आखाती प्रदेशातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत आणि गेल्या २४ तासांत त्यांच्याशी संबंधित कोणत्याही अनुचित घटनेची नोंद झालेली नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला असलेल्या पर्शियन आखातात २४ भारतीय ध्वजांकित जहाजे होती. त्यापैकी शिवालिक आणि नंदा देवी ही भारतीय ध्वजांकित जहाजे, दोन्ही एलपीजी वाहक, काल रात्री उशिरा/आज सकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे बाहेर पडली आणि आता भारताकडे जात आहेत,” असे सिन्हा म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, या जहाजांमध्ये अंदाजे ९२,७०० मेट्रिक टन एलपीजी आहे आणि ते मुंद्रा आणि कांडला बंदरांकडे जात आहेत. आता पर्शियन आखातात २२ भारतीय ध्वजधारी जहाजे शिल्लक आहेत, ज्यात एकूण ६११ खलाशी आहेत, असेही ते म्हणाले.

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आपली ऊर्जा सुरक्षा जपण्याचा प्रयत्न करत असताना, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सागरी वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तेहरानशी थेट संवाद साधण्याचा सल्ला दिला होता. फायनान्शियल टाईम्स यूकेला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर म्हणाले की, जागतिक तेल व्यापाराच्या जवळपास २० टक्के भाग हाताळणाऱ्या या महत्त्वाच्या जलमार्गाचे पुनरुज्जीवन सुलभ करण्यासाठी नवी दिल्ली इराणशी संपर्क साधत आहे. त्यांनी नमूद केले की या चर्चेतून आधीच काही निकाल मिळत आहेत, आणि तेहरानशी संबंध तोडण्याऐवजी समन्वय साधणे भारताला अधिक प्रभावी वाटते.

हे ही वाचा:

होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेला भारतीय ध्वज असलेली किती जहाजे उपस्थित?

मुंबई विमानतळावर १२.६८ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

सलमानच्या “बॅटल ऑफ गलवान”चे नाव बदलून “मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस”

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या डीजीपी आणि मुख्य सचिवांना हटवले

दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणच्या सर्वोच्च नेत्याचे भारतातील प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी भारतीय जहाजांना धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली जाईल, असा पुनरुच्चार केला.

Exit mobile version