कृष्णा नदीच्या पुराचे पाणी वाईच्या महागणपती मंदिरात

संकष्टीच्या दिवशी भाविकांची निराशा

कृष्णा नदीच्या पुराचे पाणी वाईच्या महागणपती मंदिरात

सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून तिच्या पुराच्या पाण्याने वाई येथील ऐतिहासिक महागणपती अर्थात ढोल्या गणपती मंदिराला वेढा घातला आहे. नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने पुराचे पाणी थेट मंदिर परिसरात शिरले असून श्री गणेशाच्या चरणांपर्यंत पाणी पोहोचले आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच मंदिराचे दरवाजे बंद ठेवावे लागल्याने दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांची निराशा झाली.

गेल्या काही दिवसांपासून साताऱ्याच्या पश्चिम भागात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे धोम धरणासह परिसरातील अन्य धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी कृष्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला असून त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. वाढत्या पाण्यामुळे वाई शहरातील नदीकाठचा परिसर जलमय झाला असून महागणपती मंदिर, घाट आणि आसपासचा परिसरही पाण्याखाली गेला आहे.
हे ही वाचा:
भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची दमदार कमबॅक

केरळममध्ये पूर आणि भूस्खलनाचा भीषण कहर; आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू

इंडोनेशियात भीषण बोट दुर्घटना, ५ जणांचा मृत्यू, ४१ जण बेपत्ता

‘मोदीजी. तुम्ही आमच्या मुलीला नवे जीवन दिलेत!’

वाईचे महागणपती मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. कृष्णा नदीच्या तीरावर उभे असलेले हे मंदिर वर्षभर हजारो भाविक आणि पर्यटकांचे आकर्षण असते. मात्र यंदा संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच पुराचे पाणी मंदिरात शिरल्याने अनेक भाविकांना बाहेरूनच श्रींचे दर्शन घ्यावे लागले. मंदिर परिसरातील पाण्याचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.

पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना आणि भाविकांना नदीपात्रात किंवा नदीकाठच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून धरणातून होणाऱ्या विसर्गात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासन सतर्क असून नदीकाठच्या गावांनाही दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version