आषाढी वारीत एसटीला ₹४१.१८ कोटींचे उत्पन्न

विठुरायाच्या सेवेत ‘लालपरी’ची विक्रमी धाव

आषाढी वारीत एसटीला ₹४१.१८ कोटींचे उत्पन्न

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) केलेल्या विशेष वाहतूक नियोजनाला यंदा मोठे यश मिळाले आहे. राज्यभरातून धावलेल्या ५,५०० विशेष बस आणि २१,५२७ फेऱ्यांद्वारे तब्बल ९ लाख २४ हजार ७३८ भाविकांनी सुरक्षित प्रवास केला. या विशेष वाहतुकीतून एसटी महामंडळाला ₹४१.१८ कोटींचे विक्रमी उत्पन्न मिळाल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्व एसटी विभागांतून पंढरपूरसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित व्हावा यासाठी चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी चोख नियोजन केले. त्यामुळे भाविकांना कोणताही मोठा अडथळा न येता विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचणे शक्य झाले.
हे ही वाचा:
अन्नसुरक्षेच्या नियमांमध्ये कोणालाही सूट नाही

कुरकुरेच्या पाकिटातील प्लास्टिकचा चेंडू गिळला, पाच वर्षांचा मुलगा दगावला

पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे भारतात शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी उधळली

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा: भारताची शानदार कामगिरी, ३९ पदके, चौथे स्थान
यंदाच्या वारीत एसटीच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ₹५.३० कोटी अधिक महसूल महामंडळाला मिळाला. वाढलेली प्रवासी संख्या, विशेष बससेवेचे प्रभावी नियोजन आणि भाविकांचा एसटीवरील विश्वास यामुळे ही विक्रमी कमाई शक्य झाल्याचे मानले जात आहे.

यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले, “पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे. गळ्यात तुळशीची माळ, मुखी विठ्ठलाचे नाम आणि मनात पांडुरंगाच्या भेटीची ओढ घेऊन लाखो वारकरी पंढरपूरकडे निघतात. अशा भाविकांना सुरक्षितपणे विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचवणे आणि पुन्हा सुखरूप घरी आणणे ही केवळ वाहतूक सेवा नसून विठ्ठलसेवाच आहे. लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य एसटी परिवाराला लाभले, ही आमच्यासाठी विठुरायाची कृपाच आहे.”

Exit mobile version