पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लाखो रिक्षा प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTA) रिक्षा भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, १ सप्टेंबर २०२६ पासून नवीन दर लागू होणार आहेत. तब्बल चार वर्षांनंतर रिक्षा भाड्यात वाढ होत असल्याने प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा खर्च वाढणार आहे.
नवीन दरांनुसार, रिक्षाचे किमान भाडे पहिल्या १.५ किलोमीटरसाठी २५ रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी आकारले जाणारे भाडे १७ रुपयांवरून २० रुपये करण्यात आले आहे. वाढीव दर लागू होण्यापूर्वी सर्व रिक्षाचालकांनी आपल्या मीटरचे कॅलिब्रेशन आणि तपासणी करून घेणे बंधनकारक राहणार आहे.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशातील मदरशात आता फक्त १२वीपर्यंत शिक्षण, पदव्या देणे बंद
सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीत तेजी
दरोड्यानंतर १५ दिवसांनी चोरांनी आणून दिली रक्कम, दागिने
शेअर बाजाराला ब्रेक! सेन्सेक्स २१० अंकांनी घसरला
रिक्षा संघटनांनी इंधनाचे वाढलेले दर, वाहनांच्या देखभालीचा वाढता खर्च, सुटे भाग महाग होणे आणि वाढती महागाई यामुळे भाडेवाढ आवश्यक असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर RTA ने प्रस्तावाचा आढावा घेत अखेर भाडेवाढीस मंजुरी दिली. अधिकृत अधिसूचना आणि अंतिम दरपत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नव्या निर्णयामुळे रोज रिक्षाने प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या मासिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, रिक्षाचालकांनी या निर्णयाचे स्वागत करत वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा दिलासा असल्याचे म्हटले आहे. १ सप्टेंबरपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व रिक्षांमध्ये सुधारित भाडेदर लागू होतील.
