भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेअंतर्गत भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्ध-मानवरूपी रोबोट ‘व्योममित्र’ २०२६ च्या उत्तरार्धात मानवरहित अंतराळ मोहिमेवर झेपावणार आहे. मानवी अंतराळ मोहिमेपूर्वीचा हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, या मोहिमेच्या यशानंतर २०२७ पर्यंत आणखी दोन मानवरहित चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यानंतर २०२७-२८ मध्ये भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याचा मार्ग मोकळा होईल. इस्रोचे अंतिम लक्ष्य २०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे भारतीय अंतराळ स्थानक उभारण्याचे आहे.
‘व्योममित्र’ हा केवळ रोबोट नसून भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमेचा ‘सहप्रवासी’ असेल. हा AI-आधारित रोबोट अंतराळातील वातावरण, मानवी शरीरावरील परिणाम, क्रू मॉड्यूलमधील जीवनरक्षक प्रणालींची कार्यक्षमता आणि विविध तांत्रिक प्रणालींची तपासणी करणार आहे. त्याला मानवी संवाद साधण्याची क्षमता असून, पाय नसलेला हा अर्ध-मानवरूपी रोबोट उपकरणांवर लक्ष ठेवणे, आवश्यक बटणे कार्यान्वित करणे आणि पृथ्वीवरील मिशन कंट्रोलशी थेट संवाद साधणे अशी महत्त्वाची कामे पार पाडणार आहे.
गगनयान मोहिमेसाठी इस्रोला रशियाची रोस्कोस्मोस, फ्रान्सची CNES, युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी यांचे तांत्रिक सहकार्य मिळत आहे. या सहकार्यामुळे भारतीय मानवी अंतराळ कार्यक्रमाला जागतिक स्तरावरील तांत्रिक बळ मिळणार आहे.
हे ही वाचा:
तेहलकाचे संपादक तरुण तेजपाल १० वर्षे खडी फोडायला जाणार
भाजपने नव्हे; काँग्रेसच्या आयटी सेलनेच आम्हाला खूप ट्रोल केले!
माफिया अतीक अहमदचा मुलगा अबानचा भीषण अपघातात मृत्यू
लैंगिक अत्याचार प्रकरणात तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल दोषी
दरम्यान, भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला या चार गगनॉट्सची निवड करण्यात आली आहे. ‘व्योममित्र’ची मोहीम यशस्वी ठरल्यानंतर या अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याच्या दिशेने इस्रो आणखी एक ऐतिहासिक पाऊल टाकणार आहे.
