देशभरात जेन झी तरुणांच्या आंदोलनांवर विविध स्तरांतून चर्चा सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. आंदोलन करणाऱ्या तरुणांना देशविरोधी ठरवणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी लोकशाहीत आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा वैध अधिकार असल्याचे सांगितले. तरुणांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, नाराजी आणि अपेक्षा समजून घेण्याची गरज आहे. त्यांना विरोधक किंवा देशविरोधी ठरवण्याऐवजी संवादाच्या माध्यमातून त्यांचे म्हणणे ऐकले गेले पाहिजे, असा ठाम संदेश त्यांनी दिला.
‘इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स’ (आयआयएमयूएन) या संस्थेच्या १५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित वार्षिक परिषदेचा कार्यक्रम मुंबईतील बीकेसीत पार पडला. या परिषदेसाठी देशातील १०० हून अधिक शहरांमधून सुमारे २,००० जेन झी आणि जेन अल्फा वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या परिषदेत तरुणांशी संवाद साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले.
हे ही वाचा:
‘शहा’निशा सुरू झाली, फंडिंगचे पुरावे समोर आले…
बनावट कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही!
वैभव सूर्यवंशी टी-२०चा बादशहा बनेल!
श्रीलंकेत जडेजाचा अनुभव ठरणार भारतासाठी तुरुपाचा पत्ता!
भागवत म्हणाले की, आजची जेन झी पिढी विचार करणारी आणि प्रत्येक गोष्टीमागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करणारी आहे. केवळ आदेश देऊन किंवा परंपरेचा दाखला देऊन ही पिढी समाधानी होत नाही. त्यांना तर्क, पारदर्शकता आणि संवाद हवा असतो. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. समाज आणि व्यवस्थेनेही बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल स्वीकारले पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, लोकशाही ही मतभेद दडपण्याची व्यवस्था नसून विविध मतांना स्थान देणारी व्यवस्था आहे. आंदोलन हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. आंदोलन करणाऱ्यांचा हेतू समजून घेणे आणि त्यांच्या मागण्यांवर चर्चा करणे अधिक महत्त्वाचे आहे. मतभेद असले तरी संवाद कायम राहिला, तरच समाज अधिक मजबूत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अलीकडील काळात शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, सामाजिक प्रश्न आणि धोरणांबाबत देशभरातील तरुणांनी विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांनी तरुणांना राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वाची शक्ती संबोधत त्यांची ऊर्जा सकारात्मक दिशेने वापरण्याचे आवाहन केले. तसेच तरुणांचा विश्वास जिंकण्यासाठी सरकार, समाज आणि सर्व संस्थांनी अधिक संवेदनशील आणि संवादकेंद्रित भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
