सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. आपल्या २६ दिवसांच्या उपोषणादरम्यान राहुल गांधी यांनी उपोषण सोडवण्यासाठी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असा आरोप त्यांनी केला. उपोषण संपल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत वांगचुक यांनी हा दावा करत काँग्रेसवरही टीका केली.
वांगचुक म्हणाले की, त्यांची इच्छा राहुल गांधी यांनीच आपला उपवास सोडावा, अशी होती. त्यासाठी पत्नी गीतांजली आंग्मो यांनी सातत्याने प्रयत्न केले. “त्या राहुल गांधींच्या विरोधात नव्हत्या. उलट त्यांनीच माझा उपवास सोडावा, यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. मात्र, राहुल गांधींकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही,” असे वांगचुक यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर अधिक भाष्य करण्याचे टाळत वांगचुक म्हणाले की, “सांगण्यासारखं बरंच काही आहे. मात्र, सध्याच्या सरकारविरोधात देशात निर्माण झालेली एकजूट कमकुवत व्हावी किंवा विरोधी पक्षांमध्ये कटुता निर्माण व्हावी, अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे मी यापेक्षा अधिक बोलणार नाही.”
पत्नी गीतांजली आंग्मो यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसकडून झालेल्या टीकेचाही त्यांनी उल्लेख केला. “माझ्या पत्नीने राहुल गांधींबाबत केवळ एकच टिप्पणी केली होती, तर भाजपवर चार-पाच अत्यंत कठोर टीका केल्या होत्या. त्या टीकेवर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, काँग्रेसच्या व्यवस्थेने मला आणि माझ्या पत्नीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, उपोषण संपवण्यासाठी केंद्र सरकारशी कोणताही ‘मिडनाईट डील’ झालेला नसल्याचेही वांगचुक यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासमोर सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीतच उपोषण संपल्याची घोषणा व्हावी, अशी अट आपण घातली होती, असे त्यांनी सांगितले. अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतेही छायाचित्र प्रसिद्ध केले जाणार नाही, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. मात्र, तो शब्द पाळला गेला नाही, असाही त्यांनी दावा केला.
हे ही वाचा:
लैंगिक अत्याचार प्रकरणात तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल दोषी
‘बिइंग ह्यूमन’ ज्वेलरी प्रकरणात सलमान खानसह बहिणीला समन्स
“अटक झाली तरी मायदेशी परतणार” काय म्हणाल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान?
८८ कोटींच्या घोटाळ्याच्या सूत्रधाराच्या पत्नीला यूएईतून आणले भारतात
सरकारशी तडजोड केल्याच्या आरोपांवर उत्तर देताना वांगचुक म्हणाले, “मला जर सौदेबाजीच करायची असती, तर २६ दिवस उपोषण करण्याची गरजच नव्हती. त्याआधीही मला अनेक मोठ्या संधी मिळाल्या होत्या. मला हवे असते तर शिक्षणमंत्रीपदाचीही मागणी करू शकलो असतो. मात्र, माझा उद्देश परीक्षा व्यवस्थेत मूलभूत सुधारणा आणि जबाबदारी निश्चित करणे हा होता.”
