27.8 C
Mumbai
Wednesday, August 5, 2026
घरसंपादकीयनिमंत्रण का नाकारतोय दिपके?

निमंत्रण का नाकारतोय दिपके?

Google News Follow

Related

कॉकरोच अभिजीत दिपकेचा मुखवटा जनता ओरबाडेल तेव्हा ओरबाडेल, सध्या काँग्रेसनेच त्याचे वस्त्रहरण कऱण्याचा विडा उचललेला दिसतो आहे. हे काँग्रेसलाच जमू शकते. कोणाला जोडे उचलायला द्यायचे, कोणाचे जोडे उचलायचे आणि कोणाला जोडे मारायचे हे जेवढे कॉग्रेसवाल्यांना कळते तेवढे कोणालाच नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी दिपके आणि कंपनीला कर्नाटकात उपोषणाला या, आंदोलन करा असे निमंत्रणच दिले आहे.

राज्यकर्त्यांना माज असू नये, असलाच तरी तो दाखवू तरी नये, अशी जनता जनार्दनाची अपेक्षा असते. काँग्रेसवाले असल्या तुच्छ गोष्टींना फारशी किंमत देत नाहीत. ते आपल्याच टेचात असतात. त्यामुळे अनावधानाने टेचात असलेल्या त्यांच्यासारख्या अनेकांचा कडेलोट करत असतात. केंद्र सरकारच्या विरोधात जंतर मंतरवर केलेल्या आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिजीत दिपकेचा कडेलोट बहुधा काँग्रेसने मनावर घेतलेला  आहे.

प्रियांक खरगे हे कर्नाटकचे गृहमंत्री आहेत. कर्नाटकात पोलीस शिपाई भरतीच्या परीक्षेत भानगडी झालेल्या आहेत. परीक्षार्थी त्यामुळे प्रचंड संतप्त आहेत. ३९९१ पदांसाठी सुमारे ४.५ लाख तरुणांनी या परीक्षेसाठी तयारी केली होती. परीक्षा प्रक्रियेत मोठा गोंधळ झाला आहे. विजयपुरा जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी परीक्षेवर बहीष्कार टाकला आहे. कर्नाटकमध्ये झालेल्या या गोंधळानंतर राजीनामा देणार काय, असा सवाल प्रियांक खरगे यांना विचारण्यात आला तेव्हा आधी उपोषण होऊ द्या, लाठीचार्ज होऊ द्या नंतर मी राजीनामा देईन असे वक्तव्य प्रियांक खरगे यांनी केले आहे.

उपोषणाचे हे निमंत्रण अर्थातच कॉक्रोच जनता पार्टीला आहे. खरगे यांना ठाम खात्री आहे. दिपके याला काय उपोषण झेपणार नाही. आपण नरेंद्र मोदी नसल्यामुळे तो काही आंदोलन करणार नाही. दिपकेने हा विश्वास मोठ्या मेहनतीने मिळवला आहे. झारखंडमध्ये जेपीएससी परीक्षाप्रकरणी आंदोलन पेटले आहे. ३०० पैकी २९९ गुण मिळवूनही नोकरी मिळत नाही. ४० लाख दिले की, लगेच नोकरी, अशी परिस्थिती आहे. आंदोलन त्याला बोलावून थकले दिपके तिथे फिरकायला तयार नाही. कोणी अगदीच गळ्यात पडले तर टायफॉईडची ढाल पुढे करतो. पंजाबमध्ये फार्मसीच्या परीक्षेत घोटाळा झाला.

हे ही वाचा:

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे, स्वदेश घाणेकर यांना पुरस्कार

शेअर बाजाराला ब्रेक! सेन्सेक्स २१० अंकांनी घसरला

ओल्ड मॉन्क, रॉयल चॅलेंजवर FSSAI चा दणका

दिपकेला यापैकी काहीही दिसत नाही. कारण त्याचा अजेंडा कधी विद्यार्थी हा नव्हताच. त्याचे चालक मालक केजरीवाल आहेत, त्यांनी त्याला मोदींच्या विरोधात सोडलेला आहे. कॉक्रोच आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या संतापाचा राजकीय वापर कऱण्यासाठी झाले, त्याचा विद्यार्थ्यांशी संबंध नाही.

सीजेपीचा प्रवक्ता सौरव दास याने काल आणखी एका विजयाची घोषणा केली. या विजयाचाही विद्यार्थ्यांशी काही संबंध नाही. सर्वोच्च न्यायालयाने जंतर मंतर प्रकरणी दिलेल्या अंतरिम आदेशात विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करू नये असे आदेश दिले होते. दाखलेबाज गुंडांना मात्र अभय दिले नव्हते. ताज्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने जंतर मंतर प्रकरणी गुन्हे मागे घेण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे. त्यात फक्त गंभीर गुन्ह्यांचा अपवाद केला आहे. ज्यांच्यावर आधीचे गुन्हे आहेत, परंतु जे गंभीर नाहीत, त्यांच्यावर जंतर मंतर प्रकरणी दाखल केले जाणारे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत, असे सर्वोच्च न्यायालायने आदेश दिले आहेत.

हाच आपल्या भूमिकेचा विजय आहे, असा दावा सौरव दास याने केला आहे. खून आणि बलात्कारासारखे गुन्हे असलेले लोक वगळता, बाकी आंदोलकांना कायद्याच्या कचाट्यातून जावे लागणार नाही, असे तो म्हणाला आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या अजेंड्या प्रमाणे दास पुन्हा एकदा लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करतो आहे. दिल्ली पोलिसांनी जी माहिती उघड केली आहे, त्या माहिती अंतर्गत जे २८७३ दाखलेबाज या आंदोलनात सहभागी होते, त्यात खून आणि बलात्काराशिवाय खूनाचा प्रय़त्न, अपहरण, ड्रग्ज, बालकांचे लैंगिक शोषण, शस्त्र बाळगणे आदी गुन्हे सामील आहेत. सौरव दासला फक्त खून आणि बलात्कार हे गुन्हे गंभीर वाटत असतील तरी ती त्याची समस्या आहे. परंतु कोणते गुन्हे गंभीर आणि कोणते नाही, हे ठरवण्याचा अधिकारही राज्य सरकारांना आहे. त्यामुळे न्यायालयाने आधी अंतरिम आदेश देताना घेतलेली भूमिका आणि आताची भूमिका यात फार फरक नाही.

सीजेपीची ही सगळी बनवाबनवी दोन कारणांसाठी सुरू आहे. २०२७ रोजी उत्तर प्रदेशची निवडणूक. धुरंधर या सिनेमात एक डायलॉग आहे, हिंदुस्तान की सत्ता रास्ता उत्तर प्रदेश से जाता है… उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का देण्यासाठी ही कसरत सुरू झाली आहे. निवडणुका होईपर्यंत ती सुरू राहणार. दुसरा उद्देष अनेक आंदोलकांनी आंदोलना दरम्यान बोलून दाखवला आहे. त्यांना मोदींनी सत्तेवरून हटवायचे आहे. त्यांना भारतात नेपाळ किंवा बांगलादेश करायचा आहे.

कॉन्झर्वेटीव्ह पक्षाचे माजी खासदार रॉरी स्टुअर्ट यांनी त्यांच्या एका पॉकास्टमधून हा इशारा दिला आहे, जंतर मंतरवर झालेले आंदोलन नेपाळ-बांगलादेश सारख्या आंदोलनाची सुरूवात असू शकते. बांगलादेशच्या पंतपधान शेख हसीना यांचे आसनही या आंदोलनाच्या आधी अत्यंत मजबूत वाटत होते, प्रत्यक्षात त्यांना देश सोडून पळून जावे लागले. मोदी झुकणारे नेते आहेत, असे वाटत होते, परंतु त्यांना माघार घ्यावी लागली. एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. पूर्वीच्या आंदोलनात हे डाव्यांचे, इस्लामी कट्टरवाद्यांचे आंदोलन आहे, असे सांगून हात झटकता येत होत, आता तशी परीस्थिती नाही, असे स्टुअर्ट म्हणतात.

यांचा इतिहास लक्षात घ्या. स्टुअर्ट भारतविरोधी किंवा पाकिस्तान प्रेमी म्हणून ओळखले जात नाहीत. परंतु त्यांच्यावर एक आरोप अनेकदा होत राहीला आहे. ते खासदार असतानाही ते ब्रिटीश इंटेलिजन्स एजन्सी एमआय-६ साठी काम करतायत, असा आरोप त्यांच्यावर व्हायचा. यामागे त्यांचे वडील ब्रायन स्टुअर्ट हे एमआय-६ चे वरीष्ठ अधिकारी होते, एवढेच मर्यादीत कारण नव्हते. माँटेनेग्रो, इराक, इंडोनेशिया येथे ब्रिटीश परराष्ट्र मंत्रालयाचे मुत्सद्दी म्हणून रॉरी काम करत होते. हे केवळ आवरण होते, काम एमआय-६ चेचे होते, असा दावा ब्रिटीश पत्रकार आणि राजकीय नेत्यांनी वारंवार केला. रॉरी यांनी त्याचे कधीच थेट उत्तर दिले नाही. आरोप फेटाळले नाहीत. एजन्सीमध्ये काम करणारे लोक ही बाब कधीच मान्य करत नाही, असे सांगून आरोपकर्त्यांना बुचकळ्यात टाकण्याचे काम मात्र वारंवार केले.

अशी व्यक्ती जेव्हा भारतात नेपाळ बांगलादेश प्रमाणे जेन झी क्रांति होणार असा दावा करते, तर त्यामागे उघड उघड एक एजेंडा काम करत असतो. भारत कायम अस्थिर राहावा, ही युरोप अमेरिकेची जुनी मानसिकता आहे. हा अजेंडा आंतरराष्ट्रीय आहे. त्यासाठी येणारा पैसाही विदेशी आहे. देशातूनही पैशाची ही कुमक सुरू आहे. त्याच कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका ठरलेली आहे.

ही भूमिका भाजपाच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रियांक खरगे यांच्या सारख्या नेत्याने कितीही खिल्ली उडवली. अभिजीत दिपकेला उपोषणाची, आंदोलनाची कितीही निमंत्रणे दिली तरी दिपके तिथे फिरकणार नाही. तिथल्या आंदोलक विद्यार्थ्यांनी अगदी निमंत्रणाचा नारळ दिला तरीही दिपके इथे फिरकणार नाही. फिरकलाच तर चेहरा दाखवून जाईल. जो विखार तो मोदींच्या विरोधात दाखवतो, त्याचा अंश मात्र खरगे किंवा हेमंत सोरेन याच्या विरोधात दाखवणार नाही. कधी टाईफॉईडच्या नावाखाली, कधी पोट खराब आहे, असे सांगून तो कायम पळ काढेल. पत्रकारांनी फारच अडचणीचा प्रश्न विचारला तर त्यातून मार्ग काढण्यासाठी राहुल गांधी यांनी एक रामबाण उपाय काढला आहे. भाजपा के हो क्या, असा प्रश्न विचारून समोरच्याला गप्प बसलायचे आणि वेळही मारून न्यायची. दिपकेला अशाच वाटा शोधाव्या लागतील.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा