28 C
Mumbai
Sunday, September 20, 2026
घरसंपादकीयमराठा आंदोलन बरबटलंय?

मराठा आंदोलन बरबटलंय?

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

अखेर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले. प्रत्येक वेळेला आंदोलनाची हाक दिली जाते. कधी मुंबईला धडकणार, कधी वर्षावर जाणार अशी हाकाटी दिल्यानंतर प्रत्यक्षात तो दिवस येतो तोपर्यंत आंदोलनातली हवा निघून गेलेली असते आणि काही मागण्या मान्य झाल्याचा आनंद व्यक्त करत आंदोलन मागे घेतले जाते, गुलाल उधळल्याचे समाधान मानले जाते. हाच शिरस्ता गेली काही वर्षे सुरू आहे. त्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन मागे घेतले. मुंबईत ते आलेच नाहीत.

या सगळ्या प्रकारामुळे लोकांच्या मग ते मराठा असोत की मराठेतर एक शंका नक्कीच निर्माण झालेली आहे. आंदोलनातून नेमके मराठ्यांच्या हाती काय लागते आहे? खरोखरच गरीब, गरजवंत मराठ्यांच्या मागण्या पूर्ण तरी होतायत की नाही? की प्रत्येक वेळेला केवळ आंदोलनाचे निमित्त करायचे, मीडियात जरांगे यांच्या प्रकृतीची, त्यांच्या आक्रमकपणाची, त्यांनी केलेल्या शिवीगाळीची चर्चा घडवून आणायची नंतर आणखी काही महिन्यांनी पुन्हा आंदोलन. हे सगळे सांगण्यामागचे कारण म्हणजे आता या आंदोलनावर होत असलेले आरोप. हे आरोप साधेसुधे नाहीत गंभीर स्वरूपाचे आहेत. त्या आरोपांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. कारण हा काही मनोज जरांगे आणि त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांच्या प्रश्न नाही. हा सगळ्या मराठा समाजाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यासाठी उभे राहिलेले हे आंदोलन आहे. पण ते या मूळ मागणीपासून दूर जात असेल आणि वेगळ्याच काही उद्देशांसाठी राबवले जात असेल तर त्याची चर्चा होणे आवश्यक आहे, त्याचा सोक्षमोक्ष लागणे आवश्यक आहे.

याआधी मनोज जरांगेंवर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप झालेले आहेत. आताही होत आहेत. पण त्यात न जाता या आंदोलनावर शंका उपस्थित करणारे आरोप होत असतील तर त्याची चौकशी व्हावी, त्यामागचे गौडबंगाल काय आहे, याची शहानिशा व्हावी अशी मागणी जर केली जात असेल तर त्यात गैर काय आहे? मराठा आरक्षण विषयाचे अभ्यासक अजय बारस्कर यांनी नव्याने मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या आरोपांपैकी एक म्हणजे या आंदोलनस्थळी ठेकेदारांचे काय काम? किशोर बालंडे हा ठेकेदार त्या आंदोलनस्थळी काय करतो, त्याचे तिथे काय काम असेल, यांना कंत्राटे मिळण्यासाठी तर या आंदोलनाचा उपयोग होत नाही ना, त्यासाठीच आंदोलनाचे नाटक केले जात नाही ना, असा सवाल बारस्कर यांनी विचारला आहे. असाच आरोप अमोल खुणे नावाच्या एकेकाळच्या जरांगे यांच्या सहकाऱ्यानेही केला आहे.

या ठेकेदारांचे आणि जरांगेंचे काय संबंध आहेत. बारस्कर म्हणतात की या बलांडेवर ईडीची कारवाई होणार असल्याची माहिती आहे. ती मागे घ्यावी यासाठी आंदोलन मागे घेतले आहे का? अशी शंका का घेऊ नये? उपोषण सोडताना हे ठेकेदार, कंत्राटदार तिथे काय करत असतात, त्यांच्या माध्यमातून काय मॅनेज केले जाते, असा हा सवाल आहे. त्यामुळे वैयक्तिक आरोपांपलिकडे हे आरोप आंदोलनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. हे सगळे केवळ आरोप नाहीत तर फोटोंच्या, व्हीडिओच्या माध्यमातून ही कंत्राटदार मंडळी तिथे उपस्थित दिसतात, त्यामुळे जर आरोप खरे असतील तर त्याचे उत्तर जरांगेंनी दिले पाहिजे. केवळ दुसऱ्यांना शिव्या देऊन, समोर बसलेल्यांकडून शिट्ट्या, टाळ्या वाजवून प्रश्न संपणार नाही.

सरकारचीही यात काय भूमिका आहे, असा सवालही बारस्कर करतात. सरकारला खरे तर जरांगेंचे आंदोलन नको आहे की हवे आहे हादेखील प्रश्न आहे. त्या आंदोलनाच्या आडून कंत्राटदारांची कामे करून घेतली जातात का, असा सवाल जर विचारला जात असेल तर त्याचे उत्तर सरकारकडून दिले गेले पाहिजे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथे विखे पाटील, आमदार प्रसाद लाड वगैरे उपस्थित होते, मग त्यांनीही या सगळ्याचा विचार करायला हवा.
गमतीचा भाग म्हणजे मंत्री विखे पाटील यांच्यावर जरांगे यांनी अत्यंत खालच्या भाषेत आरोप केलेले आहेत. त्यांना शिवीगाळ केलेली आहे. पण आंदोलन मागे घेत असताना त्याच विखे पाटलांवर प्रेम करावे असा संदेशही ते समोर बसलेल्या मराठ्यांना देतात, यात काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न का पडू नये. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असा काही प्रकार तर इथे नाही ना, अशी शंका का घेतली जाऊ नये. सर्वसामान्य, गरीब मराठ्यांनी याचा काय अर्थ घ्यायचा, जरागेंनी कुणाला शिव्या घातल्या तर टाळ्या वाजवायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर प्रेमही करायला कशी काय सुरुवात करायची, याचे उत्तर जरांगे यांनी द्यायला हवे.

२०२३ला कंपनी स्थापन केलेल्यांना कंत्राटे कशी मिळतात, इतक्या कमी काळात ही माणसे श्रीमंत कशी होतात, त्यांना आंदोलनाच्या जागी वावरण्याची संधी कशी काय मिळते, असे बारसकरांचे सवाल आहेत. या आंदोलनाचे नेते म्हटले जाणाऱ्या जरांगेंकडे महागडी गाडी कशी येते, त्यांच्या मुलाकडे महागडा मोबाईल कसा येतो, असाही बारस्करांचा सवाल आहे. हे वैयक्तिक आरोप असले तरी त्यामागील कारणमीमांसा व्हायला हवी आहे. जरांगे हे पहिल्यापासून आपल्या लेकरांसाठी आंदोलन करत असल्याचे म्हणत आले आहेत. पण या इतक्या वर्षात या लेकरांच्या हाती काहीही लागलेले नाही, हेदेखील वास्तव आहे. मग नेमके या आंदोलनातून काय साध्य झाले, असा प्रश्न सर्वसामान्य, गरीब मराठ्यांनाही पडलेला आहे. या आंदोलनातून मराठ्यांना काय मिळाले हे कळलेले नाहीच पण मराठे आणि ओबीसी यांच्यात संघर्षाची वेळ मात्र वारंवार येऊन ठेपलेली आहे.

हे ही वाचा:

दीड फुटांचा बाप्पा… भक्ती मात्र आभाळाएवढी!

ट्रॉफी जिंकलीच; पण अय्यरने मनंही जिंकली!

टाटा समूहात अंतर्गत संघर्ष पुन्हा उघड

सोने विकून पतीने बायकोला घेतला आयफोन १८ प्रो

खरे तर जरांगे यांच्यावर बारस्करांनी आरोप केले त्याची शहानिशा होतानाच जरांगे हे ऐन मोक्याच्या क्षणी आंदोलन मागे का घेतात, हाही लाखमोलाचा प्रश्न आहे. मागे ते मुंबईत येणार होते, वर्षा बंगल्यावर धडक मारणार होते, मात्र त्यांनी आधीच पळ काढला. नंतर गेल्या वर्षी ते मुंबईत धडकले आणि इथे किती गोंधळ घातला गेला हे आपण पाहिले. ऐन गणेशोत्सवात आंदोलन करण्याचा ध्यास जरांगे यांनी घेतलेला आहे. त्यावेळीही त्यांनी कोर्टाकडून दणका बसल्यावर आंदोलनस्थळाहून पळ काढला. पण आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्याचा आनंद व्यक्त करत जल्लोषही केला. यावर्षी पुन्हा एकदा त्यांनी त्याच आंदोलनाची पुनरावृत्ती केली. पण हळूहळू आंदोलनातली हवा निघून गेलेली आहे, हे जरांगेंच्या एकूण वागणुकीवरून, देहबोलीवरून दिसून येते. चार दिवस उपोषण केलेला माणूस भूकेने कासावीस होत असला तरी जरांगे मात्र २०-२० दिवस कसे काय उपोषण करतात, तरीही ते उठून बसतात, तास-तासभर भाषण करतात, हे कळायला मार्ग नाही, हासुद्धा बारस्करांपासून अनेकांचा आरोप आहे.

यावेळीही त्यांनी आपण मुंबईवर काहीही करून धडक मारणार अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली होती. आपल्याला गोळ्या घाला, मारा अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला, पण कुठे काय झाले? ते मुंबईला येण्यापूर्वीच आपल्याला परवानगी दिली जाणार नसेल तर आपण ५-५० लोकांसह येऊ मग तुम्ही कसे आपल्याला अडवणार अशी माघारीची भाषा बोलू लागले. पण त्यात अभिनिवेश असा होता की, जरांगे यांना अडवणे आता शक्य नाही. हा खेळ आता लोकांच्या लक्षात आलेला आहे. अर्थात, आधीपासूनच हा खेळ कसा खेळला जात आहे, हे लक्षात येत होतेच, पण त्यावेळी मीडियाने जरांगे यांची संघर्षयोद्धा अशी प्रतिमा उभी करून त्यांना महाराष्ट्रापेक्षाही मोठे केले. त्यामुळे लाखांच्या सभा, १०० एकरावरील आंदोलन असे प्रकार होऊ लागले. आता सोबत ५-५० लोकही येत नाहीत अशी स्थिती आहे. मराठा समाजातील लोकांना खरोखरच हे आंदोलन पटते आहे का, अजय बारस्करांची भूमिका बाजूला ठेवा, पण समस्त मराठा समाजाला खरोखरच वाटते आहे का, की आपल्याला अशा आंदोलनातून काही हाती लागते आहे? जर तसे काही हाती लागत नसेल तर त्यातून जरांगेंचा होत असलेला फायदा सोडला तर मराठा समाजाचा कोणताही फायदा होताना दिसत नाही.

आजकाल आंदोलन हा एक सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, हे सिद्ध झालेले आहे. आंदोलन करा, थोडावेळ मीडियात चमका, त्याचे व्हीडिओ रील शेअर करा, मनाला येईल ते बोला, कुणालाही शिवीगाळ करा, हेच आंदोलनाचे स्वरूप बनले आहे. प्रश्न सोडविण्यापेक्षा आपण प्रश्न निर्माण करू शकतो, हाच आंदोलनांमागील उद्देश बनला आहे. मराठा समाजातही सूज्ञ मंडळी आहेत, त्यांनी यासंदर्भात आपले विवेचन करावे, खरोखरच मराठा समाजाला आरक्षण मिळणे शक्य आहे का, त्यावर कोणते मध्यममार्ग आहेत, याचा एकदा लेखाजोखा मांडला गेला पाहिजे. तो याआधी मांडण्याचा प्रयत्न झालेला नाही असे नाही, पण आता ती निकराची वेळ आलेली आहे. नाहीतर आंदोलनाच्या या खेळात मराठा समाज केवळ एका प्रेक्षकाच्या भूमिकेतच राहील फक्त टाळ्या वाजवत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा