38 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरधर्म संस्कृतीअदृश्य सुरक्षा चक्र श्री गणेश कवच!

अदृश्य सुरक्षा चक्र श्री गणेश कवच!

Google News Follow

Related

“श्री गणेश कवच” याविषयी बोलताना कवच म्हणजे एक कठीण, अभेद्य आवरण जे अस्त्र, शस्त्र, संकटे यापासून संरक्षण देते. गणपतीची आराधना, उपासना करताना विघ्ने हरणारा विघ्नहर्ता, मंगल करणारा मंगलमूर्ती आणि बुद्धीची देवता असणारा बुद्धीदाता हीच रूपे समोर येतात. मात्र उपासनेच्या परंपरेत गणेशाकडे केवळ विघ्न दूर करणारा देव इतकेच नाही, तर शरीर, मन आणि सभोवतालचे रक्षण व्हावे या भावनेचाही अंतर्भाव दिसून येतो. याच संकल्पनेचे शब्दरूप म्हणजे “श्री गणेश कवच.”

कोणतेही कवच हे संरक्षणात्मक आवरण होय. धार्मिक परंपरेत देवतेच्या नामस्मरण व स्तवन स्तोत्रातून साधकाची आर्थिक अडचणी, अरिष्ट्ये यातून सुटका होते. मात्र गणेश कवचाच्या रचनेतून साधकाच्या शरीराचे, जीवनातील महत्त्वाच्या अंगांचे आणि दिशांचे रक्षण होण्याची संकल्पना दिसते. महर्षी कश्यपांनी हे कवच मुद्गल ऋषींना आणि त्यांनी पुढे मांडव्य ऋषींना सांगितल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे त्याला विशिष्ट ऋषी परंपरेचा संदर्भही लाभला आहे. श्री गणेश कवचाचा उल्लेख गणेश पुराणातील उत्तरखंडात बालक्रीडा विभागाच्या ८६ व्या अध्यायात आढळतो आणि तिथे त्याचा समारोप होतो. उपलब्ध पाठाच्या अखेरीस ‘गणेशपुराणे उत्तरखंडे बालक्रीडायां षट्‌शीतितमेऽध्याये गणेशकवचं सम्पूर्णम्’ असा निर्देश आहे. त्यामुळे ही आधुनिक काळातली रचना नसून गणेश पुराणाशी संबंधित पारंपरिक कवच रचना असल्याचा ग्रंथीय संदर्भ मिळतो.

कवचाच्या सुरुवातीला गौरी आणि मुनी यांच्यातील संवाद येतो. बालगणेशाच्या संरक्षणाची चिंता व्यक्त झाल्यानंतर त्याच्या संरक्षणासाठी उपाय सांगितला जातो. त्यानंतर गणेशाचे ध्यान आणि त्याच्या विविध रूपांचा उल्लेख येतो. या कवचाचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशाच्या विविध नामरूपांना शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या संरक्षणाशी जोडले आहे. डोळे, कपाळ, डोके, नाक, कान, मुख, कंठ, हृदय, उदर, पाठ, हात आणि पाय अशा अवयवांसाठी गणेशाच्या विविध नावरूपांचे उच्चारण व आवाहन केले जाते. म्हणजेच संपूर्ण शरीर गणरायाच्या संरक्षणाखाली असावे अशी या रचनेची कल्पना आहे.

ही संरक्षणाची व्याप्ती शरीरापुरती मर्यादित न राहता पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर आणि ईशान्य अशा दिशांसाठीही गणेशाच्या विविध रूपांचं स्मरण करून केली जाते. दिवस, रात्र आणि संध्याकाळ यांचाही उल्लेख येतो. त्यामुळे शरीरासोबतच सभोवतालचा अवकाश आणि काळही गणेशाच्या संरक्षणाखाली असावा अशी धार्मिक संकल्पना इथे दिसते. पुढे ज्ञान, धर्म, लक्ष्मी, कीर्ती, कुटुंब, धन, धान्य, संतती आणि मित्र-परिवार यांच्या कल्याणाची प्रार्थना केली आहे. त्यामुळे ‘रक्षण ‘म्हणजे केवळ संकटांपासून बचाव नव्हे, तर जीवनाच्या विविध अंगांचे कल्याण अशी व्यापक मांडणी आहे.

श्री गणेश कवच हे जरी स्तोत्ररुपी रचनेत असले तरी याचा धागा हा बहुदा ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपतीच्या युद्धकलेत निपुण असण्याच्या गुणवैशिष्ट्याशी जुळलेला वाटतो. कारण स्वतः युद्धामध्ये स्व-संरक्षण करताना तो हे कवच पठण करणाऱ्या साधकांनाही संरक्षण देणारच हा विश्वास , दिलासा मिळतो.याच्या नियमित पठणामुळे भूत, प्रेत, राक्षस, शत्रू किंवा अन्य कोणत्याही संकटाची बाधा होत नाही. कवचाच्या फलश्रुतीत प्रवास निर्विघ्न होणे, युद्धात विजय मिळणे आणि विशिष्ट पद्धतीने पठण केल्याने फलप्राप्ती होणे असे पारंपरिक उल्लेख आहेत.

गणेशाची अनेक स्तोत्रे त्याचं रूप, गुण आणि महिमा सांगतात. मात्र गणेश कवचाची रचना अतिशय वेगळी. त्यामुळेच मानवी शरीर, आजूबाजूच्या चराचरातील दिशा आणि जीवनातील विविध अंगांना गणेशाच्या नामरूपांशी जोडणारी संकल्पना पूर्ण होते. तर असे हे अदृश्य सुरक्षा चक्र किंवा ढाल बनू शकणारे “श्री गणेश कवच” पठणासाठी अंगीकारणे हा चांगला पर्याय ठरेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा