34 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरसंपादकीयप्रेयसीच्या पतीने जेन्सेनला हनीट्रॅप केले...

प्रेयसीच्या पतीने जेन्सेनला हनीट्रॅप केले…

Google News Follow

एनव्हिडियाचे (Nvidia) सीईओ जेन्सेन हुआंग यांना हनीट्रॅप करण्यात आले आहे, या शक्यतेवर आता शिक्कामोर्तब होत चालले आहे. या प्रकरणात दररोज होणाऱ्या नव्या गौप्यस्फोटांमुळे अमेरिका प्रचंड हादरली आहे. जगात सुरू असलेल्या चिप युद्धाची तीव्रता यामुळे चव्हाट्यावर आलेली आहेच, शिवाय कॉर्पोरेट जगतात नीतिमूल्यांचा झालेला कडेलोटही स्पष्ट झालेला आहे. ज्या ॲलिस हुआंगशी जेन्सेन यांचे संबंध असल्याचे उघड झाले आहे, तिला तिचा पती कांग वेईनेच जेन्सेनपर्यंत नेले होते. पत्नीच्या अवैध संबंधांबाबत तिच्या पतीला माहिती होती. त्याने ते केवळ स्वीकारलेच नव्हे, तर आपल्या व्यवसायाला चमकवण्यासाठी तो या संबंधांचा वापर करत होता. जेन्सेन यांच्या या प्रकरणामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही चांगलेच रगडले जात आहेत.

‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने (The Wall Street Journal) १२ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या या विशेष तपास अहवालात या प्रकरणाचे अनेक धक्कादायक पैलू उघड केले आहेत. चिनी उद्योगपती कांग वेई (वय ५१) आणि जेन्सेन हुआंग हे गेल्या सुमारे १० वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. २०१० च्या दशकात जेव्हा कांग वेई चीनमधील व्हिडिओ गेम कंपन्या विकत घेत होते, तेव्हा त्या दोघांमध्ये व्यावसायिक संबंध निर्माण झाले होते. त्या काळात गेमिंग कंपन्यांसाठीच एनव्हिडियाच्या ग्राफिक्स चिप्सचा पुरवठा केला जायचा. कांग वेई यानेच स्वतः जेन्सेन हुआंग यांची ओळख आपली पत्नी ॲलिस हुआंग हिच्याशी करून दिली होती. त्याला आपली पत्नी ॲलिस आणि जेन्सेन हुआंग यांच्यातील प्रेमसंबंधांची पूर्ण कल्पना होती. धक्कादायक म्हणजे, त्याने याला विरोध करण्याऐवजी ते स्वीकारले होते.
हे ही वाचा:
सोलापूर विमानतळावर प्रशिक्षणादरम्यान विमानाचे हार्ड लँडिंग

रोहित-विराटचा नबीला कानमंत्र

आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान भिडणार!

स्पेसएक्स अंतराळात उभारणार एआय डेटा सेंटर

कांग वेई आणि ॲलिस हुआंग हे व्यावसायिक भागीदारही होते. त्यांनी शांघायमध्ये ‘हेक्सी इन्व्हेस्टमेंट’ नावाची कंपनी सुरू केली होती. कांग वेई आपल्या क्लायंट्स आणि गुंतवणूकदारांसमोर, “माझ्या पत्नीचे एनव्हिडियाच्या सीईओसोबत अत्यंत जवळचे संबंध आहेत,” अशी जाहिरातबाजीही करायचा. या प्रभावाचा वापर करून त्या दोघांनी आग्नेय आशिया आणि शांघायमधील डेटा सेंटर प्रकल्पांसाठी कोट्यवधी डॉलर्सचा निधी उभारला होता. ॲलिस हुआंग सिंगापूरस्थित ‘मेगास्पीड’ या कंपनीत वरिष्ठ पदावर होती. कांग वेई आणि ॲलिस यांनी गुंतवणूकदारांना असा विश्वास दिला होता की, अमेरिकी निर्बंधांवर मात करून एनव्हिडियाच्या चिप्स चीनमध्ये आणण्याचे मार्ग त्यांच्याकडे आहेत. मे २०२४ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान मेगास्पीडने सुमारे ४.८ अब्ज डॉलर्स किमतीच्या चिप्स एनव्हिडियाकडून विकत घेतल्या. त्यातील मोठा भाग मलेशियातील डेटा सेंटरमध्ये वळवून चिनी कंपनी अलिबाबाला बळ दिले, तर काही सर्व्हर थेट चीनमधील ‘सेंच्युरी लिटोंग’ या कांग वेईच्या जुन्या ओळखीच्या कंपनीला पाठवले गेले.

शेअर बाजारातील घपले आणि बेकायदेशीर व्यवहारांच्या आरोपाखाली चिनी पोलिसांनी २०२६ च्या सुरुवातीलाच कांग वेई याला गुन्हेगारी कोठडीत टाकले. चिनी नियामक मंडळाने त्याच्यावर लाखो युआनचा दंड ठोठावला होता. कदाचित चिनी प्रशासन कांगच्या गळ्यावर सुरी ठेवून ॲलिसला ब्लॅकमेल करत असण्याची शक्यता आहे. सिंगापूरच्या अधिकाऱ्यांनी मेगास्पीडची चौकशी सुरू केल्यापासून ॲलिस हुआंग सार्वजनिकरीत्या गायब झाली. ऑक्टोबर २०२५ पासून तिने आपले फोन, ईमेल आणि वीचॅट अकाऊंट्स बंद केले असून, ती सध्या चीनमध्ये लपून बसल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

थोडक्यात सांगायचे तर, हा केवळ एक विवाहबाह्य संबंध नसून, चिनी दाम्पत्याने जाणीवपूर्वक जेन्सेन हुआंग यांच्याशी जवळीक साधून त्याद्वारे अमेरिकेच्या अत्यंत संवेदनशील एआय चिप्स मिळवण्यासाठी आणि अब्जावधी डॉलर्स कमावण्यासाठी रचलेले एक मोठे व्यावसायिक व राजकीय जाळे असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

जेन्सेन प्रकरणानंतर अनेक गुंतवणूकदारांनी न्यायालयात एनव्हिडियाच्या विरोधात दावे ठोकले आहेत. मीडियातून दररोज होणाऱ्या नवनव्या गौप्यस्फोटांमुळे कंपनीचा शेअर सतत घसरत आहे. त्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळाने जेन्सेन यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे सोपे नाही. जेन्सेन यांनीच कंपनीचा डोलारा उभा केला आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे कंपनीचा पसारा वाढला. अमेरिकेच्या ‘मॅग्निफिसंट ७’ कंपन्यांमध्ये एनव्हिडियाचा समावेश झाला. कंपनीचे बाजारमूल्य भारताच्या जीडीपीएवढे आहे. ‘जेन्सेन वजा एनव्हिडिया’ हे समीकरण कंपनीला आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे, असे दिसत नाही.

अमेरिकेची सध्याची खंगलेली आर्थिक परिस्थिती पाहता, तंत्रज्ञानावर अमेरिकेचा असलेला वरचष्मा हीच एकमेव बाब त्यांना चीनपेक्षा वरचढ बनवते. परंतु अमेरिकेतील हनीट्रॅप प्रकरणामुळे चीनला काय-काय मिळाले आहे, चिप उद्योगातील अमेरिकेच्या प्रभावाचे किती नुकसान झाले आहे, हे पुरते उघड झालेले नाही. सध्याच्या या प्रकरणामध्ये अधिकृत तपास अहवालांमध्ये मुख्यत्वे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल्स, सुपरकॉम्प्युटर्स, क्लाउड सर्व्हिसेस आणि चिनी लष्करी संशोधन संस्था यांच्यासाठी या चिप्सचा वापर झाल्याचे उघड झाले आहे.

अमेरिकन सिनेटर्सपैकी एक आणि ‘कमिशन ऑन यूएस क्वांटम प्रिमसी’चे सह-अध्यक्ष असलेले सिनेटर बेन रे लुजान यांची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर या प्रकरणातील गांभीर्य आपल्या लक्षात येऊ शकते. त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, अशा संवेदनशील आणि प्रगत तंत्रज्ञानाची चोरटी देवाणघेवाण केवळ सामान्य व्यावसायिक वापरासाठी नसून, यामुळे अमेरिकेचे सामरिक शत्रू क्वांटम आणि संरक्षण तंत्रज्ञानात अमेरिकेला मागे टाकू शकतात. म्हणूनच या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

मीडिया रिपोर्ट्स आणि आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, सिंगापूर आणि इतर आशियाई देशांमधील खाजगी मध्यस्थांमार्फत आणि काळ्या बाजारातून तब्बल २ लाख ४० हजार ते ६ लाख ६० हजार उच्च-क्षमतेच्या चिप्स, ज्यात एच१०० आणि आधुनिक ब्लॅकवेल सिरीजचा समावेश आहे, बेकायदेशीर मार्गाने चीनपर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. या संपूर्ण तस्करी आणि व्यवहाराचे मूल्य सुमारे ७.५ अब्ज डॉलर्स (सुमारे ६३,००० कोटी रुपये) पेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. तपासात असेही समोर आले आहे की, चीनच्या लष्कराशी थेट संबंध असलेल्या आणि अमेरिकेच्या काळ्या यादीतील विद्यापीठांनी व संशोधन संस्थांनी देखील या प्रतिबंधित चिप्स मिळवल्या आहेत. अमेरिकेने चीनवर कडक निर्बंध आणल्यामुळे चीनची एआय क्षेत्रातील गती मंदावेल अशी अमेरिकेची अपेक्षा होती; ती साफ पाण्यात बुडाली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टरच्या जगात अमेरिकेचे जे जागतिक वर्चस्व होते, त्याला चीनने या मार्गाने मोठा झटका दिला आहे. अमेरिकेचे निर्बंध कागदावरच राहिल्याचे यामुळे सिद्ध होते. जोपर्यंत स्वदेशी चायनीज चिप्स बाजारात येत नाहीत, तोपर्यंत अमेरिकेच्या या उच्च क्षमतेच्या चिप्सचा वापर करून चीन आपल्या सर्वोच्च एआय लॅब्स अव्वल स्थानी टिकवून ठेवण्यास यशस्वी होत आहे. थोडक्यात, अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकून चीनने या चिप्स मिळवल्यामुळे, चीनची एआय आणि लष्करी तांत्रिक शर्यत अधिक मजबूत झाली आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे.

ॲलिस हुआंग यांचे प्रकरण अजून थंड झालेले नसताना जेन्सेन यांची आणखी एक भानगड बाहेर आली आहे. त्यांच्याच कंपनीतील एक विवाहित महिला अधिकारी किंबरली पॉवेल यांच्याशी देखील त्यांचे प्रकरण असल्याचे उघड झाले आहे.

या संपूर्ण प्रकरणात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनाही मीडिया आणि लोकप्रतिनिधींकडून रगडले जात आहे. ते सीईओ जेन्सेन हुआंग यांच्याबाबत नरमाईची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. ट्रम्प यांचे दोन्ही बाजूंनी मरण आहे. एनव्हिडिया ही आज जगातील सर्वात मूल्यवान आणि प्रगत एआय चिप्स बनवणारी अमेरिकन कंपनी आहे. ट्रम्प यांच्या मते, जेन्सेन हुआंग हे अमेरिकेच्या टेक उद्योगाचे एक महत्त्वाचे स्तंभ आहेत. जर अशा सर्वोच्च कंपनीचा सीईओ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला किंवा कंपनीचे नुकसान झाले, तर अमेरिकेचे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील वर्चस्व धोक्यात येऊ शकते. अमेरिकेत कारखाने उभारणे, अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आणणे आणि देशांतर्गत रोजगार वाढवणे यामध्ये एनव्हिडियाचे मोठे योगदान आहे. टेक जगतातील मोठ्या उद्योगपतींचा रोष ओढवून घेणे ट्रम्प यांना राजकीय किंवा आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. जेन्सेन हुआंग हनीट्रॅपमध्ये अडकले असले तरी एनव्हिडियाला फटका म्हणजे अमेरिकन शेअर बाजाराला फटका, याची ट्रम्प यांना जाणीव आहे. म्हणूनच जेन्सेन हुआंग यांच्या वैयक्तिक चुकांमुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असला, तरी अमेरिकेची आर्थिक महासत्ता म्हणून असलेली ओळख आणि एनव्हिडिया टिकवून ठेवण्याच्या धोरणात्मक अपरिहार्यतेमुळे ट्रम्प त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई करण्याऐवजी नरमाईचे धोरण स्वीकारताना दिसत आहेत.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा