गणपतीची अनेक नावं आपण ऐकतो; पण ‘ऋणहर्ता’ हे नाव थेट माणसाच्या एका मोठ्या चिंतेशी जोडलेलं आहे. ‘ऋण’ म्हणजे कर्ज किंवा देणं आणि ‘हर्ता’ म्हणजे दूर करणारा. त्यामुळे कर्जातून सुटका व्हावी, आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, या भावनेने श्री ऋणहर्ता गणेश स्तोत्राचा पाठ केला जातो. या स्तोत्रातही “ऋण-नाशं करोतु मे” — म्हणजे “माझे ऋण दूर करावे” — अशी थेट प्रार्थना केली आहे. मात्र, या स्तोत्राचं वैशिष्ट्य केवळ कर्जमुक्तीपुरतं मर्यादित नाही. या स्तोत्रात गणेशाच्या पूजेचे अनेक पौराणिक संदर्भ आहेत. सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाने फलसिद्धीसाठी गणेशाची पूजा केली, तर त्रिपुरासुराच्या वधापूर्वी भगवान शिवाने त्यांची आराधना केली, असा उल्लेख येतो. त्याचप्रमाणे, हिरण्यकश्यपु आदींच्या वधासाठी विष्णूंनी, महिषासुराच्या वधासाठी देवीने आणि तारकासुराच्या वधापूर्वी कुमाराने गणेशाची पूजा केल्याचे स्तोत्रात सांगितले आहे. पुढे सूर्याने तेजप्राप्तीसाठी, चंद्राने कांतीवृद्धीसाठी आणि विश्वामित्राने तपस्येच्या पालनासाठी गणेशाची आराधना केल्याचा उल्लेख आहे.



