आयर्लंड प्रजासत्ताकातील दाट जंगलात सिंहासारखा मोठा प्राणी दिसल्याची चर्चा होती पण अखेर त्याला पूर्णविराम मिळाला आहे. आयरिश पोलिसांनी या रहस्यमय प्राण्याची ओळख पटवली आहे.
२९ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर एका व्हिडिओमध्ये काउंटी क्लेअरच्या जंगलात सिंह पाहिल्याचा दावा करण्यात आला होता आणि त्याबाबत तक्रारही पोलिसांकडे आली होती.
मात्र, मंगळवारी पोलिसांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले की तो सिंह नसून ‘माउस’ नावाचा न्यूफाउंडलँड जातीचा मोठा कुत्रा होता. किलालू विभागातील पोलिसांनी विनोदी शैलीत लिहिले, “आज तुम्ही जंगलात गेलात तर सिंह नाही, तर अतिशय मैत्रीपूर्ण न्यूफाउंडलँड कुत्रा ‘माउस’ तुम्हाला दिसेल.”
हे ही वाचा:
मोदीजी तुम्ही इतके ‘ग्लो’ कसे काय करता?
पुढील वर्षी ट्रम्प भारत दौऱ्यावर? काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
औषधांपेक्षा कमी नाही देशी गुलाब
रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; गाड्या रखडल्या, ट्रॅकवर उतरून चालणाऱ्या दोघांचा मृत्यू
म्हणून तो दिसत होता सिंहासारखा
पोलीसांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये माउस नावाचा तपकिरी रंगाचा मोठा कुत्रा दिसत आहे. त्याच्या बहुतांश शरीरावरील केस कापलेले होते, तर मान, डोके आणि शेपटीच्या टोकाकडे दाट केस होते. त्यामुळे अनेकांनी त्याला सिंह समजून चुकीचा निष्कर्ष काढला.
तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला आणि प्राणी हा कुत्राच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस म्हणाले की, माउसला त्याच्या व्हिडिओमुळे मिळालेली प्रसिद्धी फार आवडली आहे.
न्यूफाउंडलँड जातीचे केस कापणे उचित नाही
न्यूफाउंडलँड जातीच्या कुत्र्यांना दुहेरी केसांचा थर असतो आणि तो त्यांच्या शरीराच्या तापमान नियंत्रणासाठी तसेच त्वचेच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्यांचे केस कापणे योग्य नसते.
प्राण्यांबद्दलच्या क्रूर वागणुकीविरुद्ध काम करणाऱ्या संघटनेच्या ऑपरेशन्स प्रमुख सिओभान मॅकहॅफी म्हणाल्या, “माउसचे केस कापले गेले हे आम्हाला ठाऊक नाही. परंतु वैद्यकीय कारणाशिवाय न्यूफाउंडलँडचे केस कापणे योग्य नाही.”
त्या पुढे म्हणाल्या, “दुहेरी केसांचा थर सूर्याच्या किरणांपासून त्वचेचा बचाव करतो आणि शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवतो. केस कापल्यास सनबर्न, शरीराचे अतितापमान, आणि इतर त्वचारोग होऊ शकतात.”
