नागपुरात झालेल्या हिंसाचारा प्रकरणी नागपूर पोलिसांनी बुधवारी अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) स्थानिक नेता फहीम शमीम खान याला अटक केली आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून १७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारमागे फहीम शमीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी फहीम शमीम खानला २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गणेशपेठ पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एफआयआरमध्ये फहीम शमीम खानचे नाव अधिकृतपणे समाविष्ट झाल्यानंतर काही तासांतच त्याला अटक करण्यात आली. आदल्या दिवशी पोलिसांनी त्याचे छायाचित्र आणि हिंसाचार सुरू होण्यापूर्वी खान कथितपणे प्रक्षोभक भाषण देत असल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. यामध्ये तो चिथावणीखोर भाषण देताना दिसत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, प्राथमिक तपास आणि व्हिडिओ पुराव्यांवरून असे दिसून येते की खानच्या चिथावणीखोर भाषणामुळे तणाव वाढला आणि त्यामुळे परिसरातील समुदायांमध्ये संघर्ष सुरू झाला.
नागपूरमधील तणावाबाबत पोलिसांनी ५१ लोकांवर एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये फहीम शमीम खान याचे नाव आघाडीवर आहे. फहीम खाननेच सगळ्यातआधी सकाळी ११ वाजता ३० ते ४० जणांना जमा केले आणि पोलिसांना निवेदन देण्यास गेला. यावेळी विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांविरोधात त्याने तक्रार पोलिसांकडे केली. यानूसार पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. मात्र त्यानंतरदेखील फहीम खानने पुन्हा जमाव एकत्र केला आणि तणाव निर्माण करण्यास सुरुवात केली. पोलीस हिंदु समाजाचे आहेत, आपली मदत ते करत नाही, असे सांगत फहीम खान आंदोलनकर्त्यांना भडकवत होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अखेर त्याला अटक केली आणि न्यायालयात हजर केले असता २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा :
पाकिस्तानमध्ये पतीने पेट्रोल टाकून पत्नीला पेटवले
भारतातील ऑटो घटक निर्यातीत मजबूत वाढ
लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी लालूप्रसाद यादव ईडी कार्यालयात
सुनीता विल्यम्स यांच्या पुनरागमनानंतर झुलासन गावात जल्लोष
दरम्यान, अटक करण्यात आलेला फहीम खानने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रतिनिधित्व केले होते. उल्लेखनीय म्हणजे, त्याने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती, परंतु त्याला ६.५ लाखांहून अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला.
