पुणे तिथे काय उणे असे म्हणतात आणि पुणेरी पाट्या तर नेहमीच चर्चेचा विषय असतात. आता त्यात भर पडली आहे ती पुणे महापालिकेच्या (PMC) संकेतस्थळावरील विजयी उमेदवारांच्या यादीची. नुकतीच जाहीर झालेली ही यादी पाहून अनेक पुणेकरांच्या चेहऱ्यावर हसू उमटले, कारण इंग्रजीत नावे प्रसिद्ध करताना काही मराठी नावांचे थेट शब्दशः भाषांतर झाले आणि त्यातून विनोद निर्माण झाला.
पीएमसीच्या पोर्टलवर मराठी नावे इंग्रजीत रूपांतरित करताना ‘ट्रान्सलेशन’ आणि ‘ट्रान्सलिटरेशन’ यांचा गोंधळ झाल्याचे स्पष्टपणे दिसते. उदाहरणार्थ, ‘आनंदी’ हे नाव थेट ‘जॉय’ असे झाले. ‘स्वप्नील दुधाणे’ यांचे नाव अधिकच मजेशीर पद्धतीने ‘ड्रिम ऑफ बाय मिल्क’ असे दिसले. ‘सुतार’ आडनाव असलेले उमेदवार ‘कारपेंटर’ बनले, तर ‘जंगल उज्वला सुभाष’ हे नाव थेट ‘द फॉरेस्ट्स आर ब्राइट’ असे झळकले.
हे ही वाचा:
राज ठाकरेंचा फायदा इतरांना, पण मनसेची झोळी रिकामीच
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत; काय आहेत वैशिष्ट्ये?
लुंगीने वाजवली पूंगी, अण्णामलाईंचा मुंबईत झाला फायदा
ही नावे वाचून अनेकांना क्षणभर वाटले की ही एखादी कविता आहे की विनोदी लिखाण! मात्र प्रत्यक्षात हा प्रकार बहुधा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्वयंचलित भाषांतर प्रणालीमुळे घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मराठी नावे इंग्रजीत लिहिताना त्यांचे उच्चार जसेच्या तसे ठेवणे अपेक्षित असते; मात्र येथे त्यांच्या शब्दार्थालाच प्राधान्य देण्यात आले.
या गोंधळामुळे विशेषतः मराठी वाचू न शकणाऱ्या नागरिकांचा संभ्रम उडाला. “हा उमेदवार आहे की एखादा घोषवाक्य?” असा प्रश्न काहींना पडला. सोशल मीडियावर या नावांचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत असून, पुणेकर आपल्या खास शैलीत या प्रकारावर टोमणे मारत आहेत.
पीएमसी प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आले नसले, तरी भविष्यात अशा याद्या प्रसिद्ध करताना मानवी तपासणी आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा पुढच्या वेळी आनंदी फुले जिंकून आल्यावर त्यांना ‘हॅप्पी फ्लॉवर’ किंवा सत्यविजयला ‘व्हिक्टरी ऑफ ट्रुथ’ झाले, तर नवल वाटायला नको!
