जगात आर्थिक महासत्ता बनायचं असेल, तर केवळ रुंद महामार्ग, भव्य पूल, आधुनिक विमानतळ किंवा बुलेट ट्रेन पुरेशी नसते. एखाद्या देशाची खरी ताकद ठरते ती त्याच्या ऊर्जा सुरक्षेवर, औद्योगिक क्षमतेवर आणि कच्च्या मालाचं उच्च मूल्यवर्धित उत्पादनात रूपांतर करण्याच्या सामर्थ्यावर. कारण इंधन, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स हेच आधुनिक अर्थव्यवस्थेचा कणा मानले जातात.
याच दिशेने भारताने आता एक ऐतिहासिक पाऊल टाकलंय. राजस्थानातील पचपद्रा येथे देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचं उद्घाटन करण्यात आलंय. हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा सुरक्षा, औद्योगिक स्वावलंबन आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला नवी ताकद देणारा एक महत्त्वाकांक्षी औद्योगिक उपक्रम मानला जातोय.
पण हा प्रकल्प इतका खास का आहे? ‘ग्रीनफिल्ड’ म्हणजे नेमकं काय? देशातील इतर रिफायनऱ्यांपेक्षा तो वेगळा कसा आहे? आणि या एका प्रकल्पामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि उद्योगविश्वाला नेमका किती मोठा फायदा होणार आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेणार आहोत.
‘ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स’ हे नाव ऐकायला जरी मोठं आणि क्लिष्ट वाटत असलं, तरी त्यामागची संकल्पना अतिशय सोपी आहे. हा प्रकल्प समजून घ्यायचा असेल, तर तीन संकल्पनांकडे आपल्याला पाहावं लागेल. ग्रीनफिल्ड, रिफायनरी आणि इंटिग्रेटेड पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स. या तीन संकल्पना समजल्या, की हा प्रकल्प भारतासाठी इतका महत्त्वाचा का मानला जातो, हेही सहज लक्षात येईल.
तर सर्वात आधी पाहूया, ‘ग्रीनफिल्ड’ म्हणजे नेमकं काय?
ग्रीनफिल्ड म्हणजे पूर्णपणे नव्याने, रिकाम्या जागेवर उभारला जाणारा प्रकल्प. याआधी त्या ठिकाणी कोणताही औद्योगिक प्रकल्प अस्तित्वात नसतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामग्री आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संपूर्ण प्रकल्पाची उभारणी करता येते. याउलट, आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रकल्पाचा विस्तार किंवा आधुनिकीकरण केलं जातं, त्याला ‘ब्राऊनफिल्ड’ प्रकल्प म्हणतात.
आता समजून घेऊया रिफायनरी म्हणजे नेमकं काय? कच्चं खनिज तेल थेट वापरता येत नाही. त्यावर विविध प्रक्रिया केल्यानंतर त्यातून पेट्रोल, डिझेल, एटीएफ, एलपीजी, बिटुमेन आणि इतर अनेक इंधन उत्पादने तयार केली जातात. हे काम ज्या ठिकाणी होतं, त्याला रिफायनरी म्हणतात.
पण पचपद्रा प्रकल्पाची खरी ताकद ही वेगळी आहे. याच ठिकाणी या प्रकल्पाचं वेगळेपण दिसून येतं. कारण सुरुवातीपासूनच त्याची उभारणी ‘इंटिग्रेटेड रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स’ म्हणून करण्यात आली आहे. म्हणजेच, कच्च्या तेलापासून इंधन तयार केल्यानंतर उरणाऱ्या घटकांपासून प्लास्टिक, सिंथेटिक फायबर, रसायने, पॅकेजिंग मटेरियल, ऑटोमोबाईल पार्ट्स, औषध उद्योगासाठी लागणारा कच्चा माल आणि शेकडो प्रकारची मूल्यवर्धित उत्पादनं याच ठिकाणी तयार केली जातील. म्हणजे कच्च्या तेलाचं जास्तीत जास्त मूल्य एका ठिकाणीच निर्माण होईल.
एक साधं उदाहरण घेऊया. समजा एका शेतातून ऊस आला. त्यातून फक्त साखर तयार केली, तर एक उत्पादन मिळालं. पण त्याच उसापासून गूळ, इथेनॉल, वीज आणि इतर उपपदार्थ तयार केले, तर त्याच कच्च्या मालातून अधिक मूल्य निर्माण होतं. अगदी हाच सिद्धांत या प्रकल्पात वापरण्यात आला आहे. कच्च्या तेलातून फक्त पेट्रोल-डिझेलच नाही, तर शेकडो पेट्रोकेमिकल उत्पादनेही तयार केली जाणार आहेत.
अर्थात, अशी एकात्मिक व्यवस्था उभारणं काही सोपं नव्हतं. त्यासाठी केवळ एक रिफायनरी उभारून भागत नाही, तर त्यामागे जागतिक दर्जाचं नियोजन, अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक लागते. आणि इथूनच सुरू होते पचपद्रा प्रकल्पाच्या खऱ्या भव्यतेची कहाणी.
राजस्थानच्या वाळवंटात, जिथे काही वर्षांपूर्वी फक्त मोकळी जमीन होती, तिथे आज तब्बल ४,४०० एकरांवर पसरलेलं भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी औद्योगिक संकुल उभं आहे. जवळपास ३२ किलोमीटरच्या औद्योगिक परिसरात विस्तारलेला हा प्रकल्प ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल उद्योगाचं एक विशाल एकात्मिक औद्योगिक संकुल आहे, ज्यामध्ये रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उत्पादन व्यवस्था एकाच ठिकाणी उभारण्यात आली आहे. हा मेगा प्रकल्प उभारण्यासाठी ७९,४५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त भागीदारीत साकारलेला हा प्रकल्प भारताच्या औद्योगिक इतिहासातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड गुंतवणुकांपैकी एक मानला जातो.
या प्रकल्पाची खरी व्याप्ती मात्र आकडे ऐकल्यावरच समजते. आणि हे आकडे अक्षरशः थक्क करणारे आहेत. या प्रकल्पासाठी तब्बल १५ दशलक्ष घनमीटर माती हलवण्यात आली. हा आकडा इतका प्रचंड आहे की, तो इजिप्तच्या गिझाच्या ग्रेट पिरॅमिडच्या एकूण घनफळापेक्षा जवळपास सहा पट अधिक आहे.
बांधकामासाठी तब्बल १.६ दशलक्ष घनमीटर काँक्रीट वापरण्यात आलं. हा आकडा इतका मोठा आहे की, दुबईतील बुर्ज खलिफाच्या बांधकामात वापरलेल्या काँक्रीटपेक्षा तो जवळपास पाच पट अधिक आहे. याशिवाय या प्रकल्पात ३ लाख मेट्रिक टन स्टील वापरण्यात आलं. हे प्रमाण आयफेल टॉवरच्या लोखंडी संरचनेच्या वजनापेक्षा जवळपास ४० पट अधिक आहे.
पण एवढ्यावरच या प्रकल्पाची भव्यता संपत नाही.
संपूर्ण संकुलात तब्बल २८ हजार किलोमीटर लांबीचं विद्युत केबल नेटवर्क टाकण्यात आलं आहे. ही लांबी पृथ्वीच्या परिघाच्या जवळपास ७० टक्के इतकी आहे. तर रिफायनरीतील १२५ मीटर उंच कोक डोम हा स्वतःच आधुनिक औद्योगिक अभियांत्रिकीचा एक वेगळा नमुना आहे.
आता एवढी गुंतवणूक करून भारताला नेमकं मिळणार काय?
दरवर्षी ९ दशलक्ष मेट्रिक टन कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याची क्षमता या रिफायनरीमध्ये आहे. म्हणजेच लाखो टन कच्च्या तेलाचं पेट्रोल, डिझेल, एटीएफ, एलपीजी आणि इतर इंधनांमध्ये रूपांतर इथे होणार आहे. या प्रकल्पाचं खरं वैशिष्ट्य केवळ इंधन उत्पादन नाही. याच संकुलात दरवर्षी २.४ दशलक्ष मेट्रिक टन पेट्रोकेमिकल्स तयार केले जाणार आहेत. म्हणजे कच्च्या तेलापासून केवळ इंधनच नाही, तर प्लास्टिक, सिंथेटिक फायबर, औद्योगिक रसायने आणि शेकडो मूल्यवर्धित उत्पादनेही तयार होतील. त्यामुळे एका कच्च्या मालातून जास्तीत जास्त आर्थिक मूल्य निर्माण करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.
आकार आणि उत्पादन क्षमता ही या प्रकल्पाची एक बाजू झाली. पण एखादी रिफायनरी खरोखर किती आधुनिक आहे, हे कसं ठरतं? तर, याचं उत्तर मिळतं ‘नेल्सन कॉम्प्लेक्सिटी इंडेक्स’मधून. पचपद्रा रिफायनरीचा हा निर्देशांक तब्बल १७ आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं, तर हा निर्देशांक जितका जास्त, तितकी रिफायनरी अधिक प्रगत तंत्रज्ञान वापरणारी, विविध प्रकारच्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करणारी आणि त्यातून अधिक मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यास सक्षम मानली जाते. त्यामुळेच पचपद्राची गणना जगातील अत्याधुनिक रिफायनऱ्यांमध्ये केली जाते. म्हणजेच ही रिफायनरी आजच्या गरजांसाठीच नव्हे, तर पुढील अनेक दशकांच्या औद्योगिक मागण्या लक्षात घेऊन उभारण्यात आली आहे.
या संकुलात १३ प्रक्रिया युनिट्स आहेत—त्यापैकी ९ रिफायनरी आणि ४ पेट्रोकेमिकल युनिट्स. प्रत्येक युनिटची रचना अशी करण्यात आली आहे की, कच्च्या तेलातील प्रत्येक थेंबाचा जास्तीत जास्त उपयोग होईल. पण इतका मोठा प्रकल्प उभारणं पुरेसं नसतं. त्याला अखंडपणे चालू ठेवण्यासाठी तितकंच सक्षम लॉजिस्टिक्स नेटवर्कही आवश्यक असतं. आणि पचपद्रामध्ये त्याचीही अत्यंत बारकाईने व्यवस्था करण्यात आली आहे.
राजस्थानच्या मंगला तेलक्षेत्रातून दरवर्षी सुमारे १.५ दशलक्ष मेट्रिक टन कच्चं तेल येथे येईल. उर्वरित ७.५ दशलक्ष मेट्रिक टन कच्चं तेल गुजरातच्या मुंद्रा बंदरातून विशेष पाइपलाइनद्वारे थेट रिफायनरीपर्यंत आणलं जाईल. आणि इथून तयार होणारे पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादने एचपीसीएलच्या पाइपलाइन, तसेच रेल्वे आणि इतर वितरण व्यवस्थेद्वारे देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचतील. म्हणजेच, पचपद्रा हा कच्च्या तेलाच्या आयातीपासून त्याच्या शुद्धीकरणापर्यंत, पेट्रोकेमिकल उत्पादनांपासून अंतिम वितरणापर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी (Value Chain) एकत्र आणणारा आधुनिक एकात्मिक औद्योगिक परिसंस्था प्रकल्प आहे. त्यामुळे हा केवळ भारतातील २४ वा रिफायनरी प्रकल्प म्हणून ओळखला जाणार नाही, तर भारताच्या औद्योगिक परिवर्तनाचा नवा अध्याय म्हणूनही लक्षात राहील.
मात्र, पचपद्रा प्रकल्पाचं महत्त्व एवढ्यावरच मर्यादित राहत नाही. आतापर्यंत आपण या प्रकल्पाचा आकार, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमता पाहिली. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न— भारतात आधीच अनेक रिफायनऱ्या असताना पचपद्रा इतरांपेक्षा वेगळा कसा आहे?
याचं उत्तर या प्रकल्पाच्या संकल्पनेत दडलं आहे… सुरुवातीपासूनच त्याची रचना एकात्मिक औद्योगिक संकुल म्हणून करण्यात आली आहे. भारतातील बहुतांश रिफायनऱ्यांचं मुख्य काम म्हणजे कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि एटीएफसारखी इंधनं तयार करणं. काही ठिकाणी कालांतराने पेट्रोकेमिकल प्रकल्प जोडले गेले. मात्र पचपद्रा प्रकल्पाची उभारणी सुरुवातीपासूनच एकात्मिक रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स म्हणून करण्यात आली आहे. म्हणजेच, इथे केवळ इंधननिर्मिती होत नाही, तर कच्च्या तेलातील प्रत्येक उपयुक्त घटकाचा अधिक कार्यक्षम वापर करून त्याचं जास्तीत जास्त आर्थिक मूल्य निर्माण केलं जातं. त्यामुळे पचपद्रा हा भारतातील २४वा रिफायनरी प्रकल्प असला, तरी त्याचं वेगळेपण त्याच्या एकात्मिक रचनेत आहे. ऊर्जा सुरक्षा, मूल्यवर्धित उत्पादन आणि आधुनिक औद्योगिक मूल्यसाखळी या तिन्ही आघाड्यांवर हा प्रकल्प भारतासाठी महत्त्वाचा ठरतो.
पचपद्रा प्रकल्पाची कहाणी इथेच संपत नाही. उद्योग, गुंतवणूक किंवा उत्पादन क्षमतेच्या पलीकडे जाऊन या प्रकल्पाकडे पाहिलं, तर आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत, पश्चिम आशियातील प्रत्येक घडामोड पचपद्रा प्रकल्पाचं महत्त्व अधिक अधोरेखित करते. कारण या प्रकल्पाचा संबंध केवळ उद्योगाशी नाही, तर भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी थेट जोडलेला आहे. याचं कारण म्हणजे भारत आपल्या कच्च्या तेलाच्या एकूण गरजेपैकी ८५ टक्क्यांहून अधिक कच्चं तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीतील कोणताही मोठा अडथळा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर थेट परिणाम करतो. भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा सौदी अरेबिया, इराक, यूएई, कुवेत आणि इतर पश्चिम आशियाई देशांतून येतो. त्यामुळे त्या प्रदेशातील प्रत्येक भू-राजकीय घडामोडीचा परिणाम भारतावरही होतो.
गेल्या काही वर्षांत आपण हे वारंवार पाहिलं आहे. इराण-इस्रायल- अमेरिका संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव, हौथी हल्ले आणि जहाज वाहतुकीतील अडथळे— या प्रत्येक घटनेमुळे जागतिक तेलबाजारात अस्थिरता निर्माण होते. कारण होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा व्यापार सर्वाधिक होतो आणि या भागातील संघर्षाच्या झाला या सामुद्रधुनीवर बसतात म्हणजे बसतात. या मार्गात काही दिवसांचाही अडथळा निर्माण झाला, तरी जगभरातील कच्च्या तेलाच्या आणि इंधनाच्या किमतींवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
अशा परिस्थितीत भारताकडे अत्याधुनिक, लवचिक आणि उच्च क्षमता असलेल्या रिफायनऱ्या असणं ही केवळ औद्योगिक गरज राहत नाही, तर ती देशाच्या ऊर्जा सुरक्षेचाही महत्त्वाचा भाग बनते. पचपद्रा रिफायनरीची सर्वात मोठी ताकद म्हणजे ती विविध दर्जाच्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करू शकते. त्यामुळे एखाद्या देशातून पुरवठा विस्कळीत झाला, तरी इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करून इंधन आणि पेट्रोकेमिकल उत्पादन सुरू ठेवणं शक्य होतं. यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत होते.
एकूणच पाहिलं, तर भारताने ही रिआफायनरी उभारून… जगाने गेल्या काही दशकांत स्वीकारलेल्या औद्योगिक मॉडेलच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं म्हणता येईल. आज जगातील आघाडीच्या औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रातील देशांकडे पाहिलं, तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. केवळ कच्चं तेल असणं किंवा त्याची निर्यात करणं पुरेसं नसतं. त्या कच्च्या तेलाचं उच्च मूल्याच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांमध्ये रूपांतर करणं, हीच आधुनिक औद्योगिक अर्थव्यवस्थेची खरी ताकद असते.
उदाहरणार्थ, सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. मात्र तो केवळ कच्चं तेल निर्यात करत नाही. गेल्या दोन दशकांत सौदी अरेबियाने रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल उद्योगात मोठी गुंतवणूक करून त्याच तेलापासून अधिक मूल्याची रसायने, प्लास्टिक आणि औद्योगिक उत्पादने तयार करण्यावर भर दिला आहे.
दुसरीकडे, सिंगापूरकडे स्वतःचे तेलसाठे जवळजवळ नाहीत. तरीही तो जगातील सर्वात मोठ्या रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल केंद्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. कारण आयात केलेल्या कच्च्या तेलाचं उच्च मूल्याच्या उत्पादनांमध्ये रूपांतर करून तो जगभर निर्यात करतो.
दक्षिण कोरिया आणि चीन यांनीही गेल्या दोन दशकांत अत्याधुनिक एकात्मिक रिफायनरी-पेट्रोकेमिकल संकुलं उभारली. त्यामुळे त्यांनी केवळ इंधन उत्पादनातच नव्हे, तर प्लास्टिक, सिंथेटिक फायबर, विशेष रसायने आणि इतर पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या जागतिक बाजारातही मजबूत स्थान निर्माण केलं.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. आजच्या जागतिक स्पर्धेत एखाद्या देशाची ताकद त्याच्याकडे किती कच्चं तेल आहे यावर ठरत नाही; तर त्या तेलातून तो किती जास्त मूल्य निर्माण करू शकतो, यावर ठरते. पचपद्रा प्रकल्पाच्या माध्यमातून भारतानेही नेमकी याच दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. त्यामुळे भारताची भूमिका भविष्यात.., केवळ मोठा इंधन ग्राहक किंवा रिफायनिंग करणारा देश इतकीच मर्यादित राहणार नाही. मूल्यवर्धित पेट्रोकेमिकल उत्पादन, उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाचा पुरवठा आणि निर्यातक्षम औद्योगिक अर्थव्यवस्था उभारण्याच्या दिशेने हा प्रकल्प भारताला नवी दिशा देऊ शकतो.
हे ही वाचा:
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; १५ जणांचा मृत्यू
“काश्मीरमध्ये आमचेच दहशतवादी लढले आणि…”, हिजबुल कमांडरच्या कबुलीने पाकची नाचक्की
एकेकाळी ‘नकोशी’ असणारी वाघीण बनली गिरडच्या जंगलाची ‘राणी’
भारतीय नौदलाला नवे बळ! अत्याधुनिक ‘आयएनएस महेंद्रगिरी’ ताफ्यात
या प्रकल्पामुळे संपूर्ण औद्योगिक साखळीला नवी चालना मिळणार आहे. पचपद्रामध्ये तयार होणाऱ्या पेट्रोकेमिकल उत्पादनांचा थेट फायदा प्लास्टिक, पॅकेजिंग, ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल्स, वस्त्रोद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण आणि रसायन उद्योगांना होईल. आज या उद्योगांसाठी लागणाऱ्या अनेक महत्त्वाच्या कच्च्या मालाची आयात करावी लागते. मात्र देशांतर्गत उत्पादन वाढल्याने आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, पुरवठा अधिक सुलभ होईल आणि भारतीय उद्योगांची जागतिक स्पर्धात्मकताही वाढेल.
तसेच परकीय चलनाची बचत, उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक, निर्यातवाढ आणि रोजगारनिर्मिती या सर्वांनाही या प्रकल्पामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे. राजस्थानमध्ये पूरक उद्योग विकसित होतील, नवीन औद्योगिक क्लस्टर उभे राहतील आणि संपूर्ण प्रदेश एका मोठ्या औद्योगिक परिसंस्थेत विकसित होण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.
याशिवाय इतक्या मोठ्या औद्योगिक संकुलामुळे हजारो प्रत्यक्ष आणि लाखो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. बांधकाम, अभियांत्रिकी, देखभाल, वाहतूक, लॉजिस्टिक्स, रसायन उद्योग, पॅकेजिंग, सेवा क्षेत्र आणि लघु-मध्यम उद्योगांना या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळेल. रिफायनरीभोवती पूरक उद्योग विकसित होत गेल्याने राजस्थानमध्ये नवीन औद्योगिक क्लस्टर उभे राहतील आणि संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक विकासाला दीर्घकालीन गती मिळेल.
एकूणच पाहिलं, तर पचपद्रा हा भारताच्या ऊर्जा सुरक्षा, औद्योगिक विकास आणि मूल्यवर्धित उत्पादन क्षमतेला नवी दिशा देणारा एक धोरणात्मक औद्योगिक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे हजारो रोजगार, पूरक उद्योगांची निर्मिती, निर्यातवाढ, परकीय चलनाची बचत आणि राजस्थानसह देशाच्या औद्योगिक विकासाला दीर्घकालीन चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पचपद्रा प्रकल्प हा केवळ एका रिफायनरीचा प्रकल्प नाही, तर भारताच्या औद्योगिक परिवर्तनाचं प्रतीक आहे. ऊर्जा सुरक्षा, मूल्यवर्धित उत्पादन, औद्योगिक स्वावलंबन आणि जागतिक स्पर्धात्मकता या चारही आघाड्यांवर भारताला पुढे नेण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. त्यामुळे पचपद्रा येथील ‘ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स’ प्रकल्प हा येत्या काही दशकांत भारताला जागतिक पेट्रोकेमिकल आणि उत्पादन क्षेत्रात अधिक सक्षम बनवणारा महत्त्वाचा औद्योगिक मैलाचा दगड ठरू शकतो.
