केंद्र सरकारने स्वातंत्र्यदिन २०२६च्या निमित्ताने पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि कारागृह सेवांमधील १,०५७ जवानांना शौर्य आणि सेवा पदके देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये ३०१ शौर्य पदके, ९२ राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके (PSM) आणि ६६४ गुणवत्तापूर्ण सेवा पदकांचा (MSM) समावेश आहे. याशिवाय, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) २१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या सेवेसाठी राष्ट्रपती पदक देण्यात येणार आहे.
एकूण ३०१ शौर्य पदकांमध्ये २७२ पोलीस कर्मचारी आणि २९ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक १९७ जवान डाव्या विचारसरणीच्या उग्रवाद अर्थात नक्षलग्रस्त भागात तैनात आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील ५१, ईशान्य भारतातील १२ आणि इतर भागांतील ४१ जवानांना शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. शौर्य पदक हे लोकांचे प्राण वाचवणे, मालमत्तेचे संरक्षण करणे, गुन्हे रोखणे किंवा गुन्हेगारांना पकडताना असामान्य धाडस दाखवणाऱ्या जवानांना दिले जाते.
९२ जवानांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक
सरकारने ९२ जवानांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक (PSM) जाहीर केले आहे. यामध्ये ८३ पोलीस सेवा, ४ अग्निशमन सेवा, ३ नागरी संरक्षण आणि होमगार्ड तसेच २ कारागृह सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पदक सेवेत विशेष आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येते.
६६४ जवानांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक
याशिवाय ६६४ जवानांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक (MSM) देण्यात येणार आहे. यामध्ये ६०६ पोलीस, २८ अग्निशमन सेवा, १८ नागरी संरक्षण आणि होमगार्ड तसेच १२ कारागृह सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्तव्याप्रती समर्पण, उत्कृष्ट कामगिरी आणि उल्लेखनीय सेवेसाठी हे पदक दिले जाते.
सीबीआयच्या २१ अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही सन्मान
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सीबीआयच्या २१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी ६ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, तर १५ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक देण्यात येणार आहे. PSM मिळणाऱ्यांमध्ये शोभा दत्ता, मनोज बॅनर्जी, गिन्नी राणा, संजय कुमार सामल, रमेश चंद आणि मदन लाल धीमान यांचा समावेश आहे. यामध्ये एसपी, एएसपी, डीएसपी आणि एएसआय स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी
एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली विमानावरील नियंत्रण ४ सेकंदांसाठी सुटले होते!
दुबईत लपलेला ड्रग्ज किंगपिन वीरेंद्र सिंग बसोया भारताच्या ताब्यात
टॅरिफ चुकवण्यासाठी चीनकडून भारताचा वापर? ४० देशांवर अमेरिकेचा आरोप
१५ सीबीआय कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक
१५ सीबीआय कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक (MSM) जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये डीएसपी, निरीक्षक, उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल यांच्यासह कायदेविषयक आणि तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी आणि कर्मचारी दिल्ली, मुंबई, लखनऊ, कोलकाता, जयपूर, पटना, चंदीगड, मदुराई आणि बंगळुरू यांसह विविध युनिटमध्ये कार्यरत आहेत. या पुरस्कारांद्वारे तपास, कायदेविषयक कामकाज, तांत्रिक सेवा, प्रशासकीय कामकाज आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील योगदान यांचा गौरव करण्यात येणार आहे. पोलीस आणि इतर सुरक्षा सेवांमधील १,०५७ कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेली ही पदके त्यांच्या शौर्य, कर्तव्याप्रती समर्पण आणि उल्लेखनीय सेवेला दिलेली मान्यता आहे.
