भारताच्या आर्थिक प्रज्ञेचे भाष्यकार

भारताच्या आर्थिक प्रज्ञेचे भाष्यकार

‘नवा भारत’ केवळ पोकळ घोषणांवर नाही, तर ठोस धोरणांवर आणि आपल्या गौरवशाली आर्थिक इतिहासाचे पुनर्निर्माण करतो आहे. एका बाजूला इराण युद्धामुळे जागतिक अर्थकारणाबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना भारत यातूनही तावून सुलाखून बाहेर पडेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.  अर्थकारणाला आलेल्या या मजबूतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पडद्यामागे काम करणारी काही मोजकी चमकदार नावे समोर येतात, त्यात संजीव सन्याल यांचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (EAC-PM) सदस्य म्हणून सन्याल केवळ आकडेवारीचे खेळ मांडत नाहीत, तर भारताच्या आर्थिक भविष्याची कुंडली मांडतायत. संजीव सन्याल यांची ओळख केवळ एक ‘अर्थतज्ज्ञ’ म्हणून करणे त्यांच्यावर अन्याय ठरेल. ते एक उत्तम इतिहासकार, लेखक आणि शहर नियोजन विषयातील तज्ज्ञ आहेत. डॉईश बँकेत ग्लोबल स्ट्रेटेजिस्ट म्हणून काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव घेतल्यांनंतर त्यांनी मातृभूमीत परतण्याचा निर्णय घेतला. तुम्ही त्यांना जेव्हा ऐकत असता तेव्हा त्यांच्या विचारांमध्ये तुम्हाला स्वदेशी विचार आणि जागतिक दृष्टिकोनाचा सुरेख संगम पाहायला मिळतो.

भारतीय इतिहासाकडे पाहण्याचा सन्याल यांचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. आधीच्या अनेक इतिहासकारांच्या विचारांना आव्हान देणारा आहे. कारण ते कायम भारतीय दृष्टीकोनातून पाहात असतात. जगाकडे पाहण्याचा त्यांचा चष्मा पूर्णपणे भारतीय आहे. त्यांच्या ‘The Ocean of Churn’ आणि ‘Land of the Seven Rivers’  ही पुस्तके वाचली की लक्षात येते की भारताचा इतिहास हा केवळ आक्रमणांचा आणि पराभवांचा इतिहास नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या साहसाचा, आर्थिक यशाचा आणि व्यापारी प्रगतीचा गौरवशाली प्रवास आहे.

त्यांचे अलीकडचे पुस्तक ‘Revolutionaries’ हे तर डोळ्यांत अंजन घालणारे आहे. अहिंसक लढ्यासोबतच ज्या सशस्त्र क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना इतिहासात योग्य स्थान मिळवून देण्याचे काम सन्याल यांनी केले आहे. राष्ट्रवाद हा त्यांच्या विचारांचा गाभा आहे, हे तुम्हाला त्यांच्या पुस्तकात ठायी ठायी जाणवत असते. परंतु तो विचार प्रचारकी नाही, तो त्यांचा अंर्तनाद आहे.

पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून काम करताना सन्याल यांनी केवळ मोठ्या घोषणांवर भर न देता, छोट्या पण प्रभावी ‘प्रोसेस रिफॉर्म्स’ वर भर दिला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी जुन्या ‘पंचवार्षिक योजनांच्या’ जड जटील चौकटीतून बाहेर काढून ‘एजिल’ (Agile) कार्यपद्धतीकडे नेले आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार धोरणात लवचिकता आणणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. अशी अर्थव्यवस्था जी कोणत्याही प्रकारचा बदल रिचवू शकते.

केवळ मागणी वाढवून अर्थव्यवस्था सुधारत नाही, तर पुरवठा साखळी मजबूत करणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी मांडले. आजच्या काळात ते किती यथार्थ आहे, हे आपल्या लक्षात येते आहे.

त्यांच्या भाषणांतील आणि लिखाणातील काही वाक्ये आपल्याला विचार करायला भाग पाडतात. “इतिहास हा नेहमी जिंकणाऱ्यांकडून लिहिला जातो, पण आता वेळ आली आहे की भारतीयांनी आपला इतिहास आपल्या दृष्टीकोनातून लिहावा.”

“भारत केवळ एक बाजारपेठ नाही, तर ती एक महान संस्कृती आहे जी आता आपल्या आर्थिक शक्तीचा पुनरुद्धार करत आहे.” एकेकाळी विदेशी विचारवंतांची नक्कल करणाऱ्या कथित विचारवंतांची फौज देशात निर्माण झाली. ज्यांच्या मनात  स्वत्वाबाबत हीनतेची भावना होती. आपले ते सगळे वाईट, पश्चिमेमकडून आलेले सगळेच चांगले, हाच त्यांचा दृष्टीकोन होता. या वैचारीक जोखडात अडकलेल्या भारताच्या इतिहासाला अर्थकारणाला मोकळा श्वास घेण्यासाठी ज्यांनी अनुकूल वातावरण निर्मिती केली, अशा लोकांमध्ये मला संजीव सन्याल हे खूप आश्वासक वाटतात.

संजीव सन्याल यांच्यासारखे महानुभाव केवळ पाश्चात्य सिद्धांतांची नक्कल करत बसले नाहीत,  त्यांना भारताच्या मातीची ताकद माहित होती. इथल्या गरजा ओळखून त्यांनी  धोरणे आखली. जागतिक व्यासपीठावर ही भूमिका त्यांनी आग्रहाने मांडली. त्यामुळे हा विचार समजून घेण्याची गरज आहे. कारण हा या मातीतला विचार आहे. ज्या मातीचा गंध आजही कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात दरवळतो आहे.

(संजीव संन्याल हे एक प्रख्यात अर्थतज्ज्ञ, लेखक आणि धोरणतज्ज्ञ आहेत. ते २०२२ पासून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत. ते यापूर्वी २०१७ ते २०२२ या कालावधीत अर्थमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होते.)

Exit mobile version