गोव्यातील लैराई देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू

३० हून अधिक भाविक जखमी

गोव्यातील लैराई देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू

उत्तर गोव्यातील शिरगाव येथे श्री लैराई जत्रेदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली.

श्री लैराई जत्रा ही गोव्यात अत्यंत प्रसिद्ध असून शुक्रवारी जत्रा सुरू झाली. गोव्यातील शिरगाव येथील श्री लैराई देवी मंदिरात ही यात्रा दर वर्षी साजरी केली जाते आणि राज्यभरातून, परदेशातून भाविक देवी पार्वतीचे रूप मानल्या जाणाऱ्या लैराई देवीच्या दर्शनासाठी इथे जमतात. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपारिक धोंडाची जत्रा, ज्यामध्ये हजारो भाविक जळत्या निखाऱ्यावरून अनवाणी चालतात. सुमारे ४० ते ५० हजार भाविक जत्रेत सहभागी होतात.

हे ही वाचा  : 

‘लव्ह जिहाद’च्या आरोपाखाली असलेल्या लोकांची नसबंदी करा!

पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे युट्युब अकाउंट भारतात ब्लॉक

डॉलरच्या तुलनेत रुपया चमकला, सात महिन्यांतली उच्चतम पातळी गाठली!

नाले सफाई आणि अंतर्गत रस्त्यांची कामे पावसाळ्याआधी पूर्ण करा!

माहितीनुसार, एका ठिकाणी उतार असताना गर्दीतील लोक वेगाने चालू लागले आणि त्यामुळे गर्दीत गोंधळ निर्माण झाला. पुढे चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत सात जणांनी आपले प्राण गमावले तर ३० जन जखमी झाले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक्सवरील पोस्टमध्ये शोक व्यक्त केला आणि सांगितले की ते वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आणि स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात व्यवस्था केल्याचे सांगण्यात येत आहे. यात्रेदरम्यान कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विशेष पोलिस पथकही तैनात करण्यात आले होते. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून ड्रोनचा वापरही केला जात होता.

Exit mobile version