विभाजनवादी शक्तींना शीख समाज थारा देत नाही, आम्ही मोदींच्या पाठीशी

खलिस्तान समर्थक पन्नूच्या विधानाला कसून विरोध

विभाजनवादी शक्तींना शीख समाज थारा देत नाही, आम्ही मोदींच्या पाठीशी

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर खलिस्तानी चळवळीचा नेता गुरुपतवंत सिंग पन्नू याने भारतातील शीख समाजाने पाकिस्तानला सहकार्य करण्याची भाषा केल्यानंतर महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीच्या अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष बल मलकीत सिंग यांनी पन्नूच्या या वक्तव्याचा निषेध करताना संपूर्ण शीख समाज हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे.

मलकीत सिंग यांनी याबाबत केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शीख समाज हा पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. शीख पंथ हा त्याग, निष्ठा आणि मानवता या तत्वांच्या पायावर उभा आहे. विदेशातून ज्या परकीय शक्ती आमच्या पंथाचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. शीख समाजाचा आत्मा हा भारतीय राष्ट्रीयत्वाशी एकरूप झालेला आहे. तो कुणाच्या खोट्या प्रचारामुळे वेगळा होऊ शकत नाही. आम्ही देशाच्या आणि देशाच्या नेतृत्वाच्या नि:संदिग्धपणे पाठीशी आहोत.

मलकीत सिंग म्हणतात की, पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेची चमचेगिरी करणाऱ्या पन्नूचे वक्तव्य दिशाभूल करणारे आहेच पण शीख समुदाय ते कधीही स्वीकारणार नाही. त्याची कथित चळवळ ही नामशेष झालेली आहे आणि त्याला कुणाचाही पाठींबा नाही. शीख विचारांचा तो प्रतिनिधी नाही कारण हा विचार राष्ट्रीयत्वाला मानतो, लोकशाही मूल्याना मानतो.

हे ही वाचा:

आयात-निर्यात बंदीचा निर्णय योग्य

शमीला चोपून काढले, तीन षटकात ४८ धावा

“शुभमन गिल आणि विराट कोहली: समान शैलीत धावांचा सूर”

“शुभमन गिल आणि विराट कोहली: समान शैलीत धावांचा सूर”

मलकीत त्या निवेदनात लिहितात की, शीख समाज नेहमीच राष्ट्रीय आपत्ती, नैसर्गिक आपत्ती, युद्ध यात आघाडीवर राहिलेला आहे. ज्यांनी सीमेपलीकडून येत भारतातील निष्पाप नागरिकांना ठार मारले, ती विचारसरणी शीखांच्या मानवतावादी मूल्यांच्या पूर्ण विरुद्ध आहे. आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो.

पन्नूने म्हटले होते की, पाकिस्तानशी युद्ध झाले की पंजाब वेगळा होण्याची सुरुवात होईल. शिखांनी पाकिस्तानला मदत करावी कारण हा देश स्वतंत्र पंजाबशी मित्रत्वाचे नाते ठेवेल.

Exit mobile version