भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना आणि गायक पलाश मुच्छल यांचा रविवारी होणारा विवाह समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. मंधानाच्या वडिलांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांच्या व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांनी दिली.
मिश्रा म्हणाले, “सकाळी नाश्ता करत असताना स्मृती मंधानांच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडू लागली. आम्ही काही वेळ वाट पाहिली की कदाचित प्रकृती सुधारेल, पण सुधारणा न दिसल्याने त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.”
ते पुढे म्हणाले, “स्मृती मंधाना आपल्या वडिलांची लाडकी आहे, त्यामुळे वडील पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांनी विवाह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.”
हे ही वाचा:
पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्या, प्रेयसीवरून झाला वाद
कढीपत्ता : आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी वरदान
जपानच्या पंतप्रधान ताकाइची यांच्या विरोधात आंदोलन तीव्र
सांगलीतील समडोली रोडवरील मंधाना फार्म हाऊस येथे रविवारी सायंकाळी ४ वाजता विवाह सोहळा होणार होता. या विवाहासाठी मंधाना कुटुंबाने मोठ्या तयारीने व्यवस्था केली होती. अनेक दिवसांपासून लग्नाच्या विविध विधी सुरू होते. महिला क्रिकेट संघातील बहुतेक खेळाडू सध्या सांगलीत उपस्थित आहेत. मंधानाच्या विवाहासाठीचा संगीत सोहळाही आदल्या दिवशीच झाला होता आणि त्या कार्यक्रमातील अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
लग्न पुढे ढकलल्यानंतर पाहुण्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि सजावट काढण्याचे कामही सुरु आहे. मंधानांच्या वडिलांची तब्येत पूर्णपणे सुधारल्यानंतर नव्या तारखेची घोषणा करण्यात येईल.
