पोलिसांना दगड, फुलदाण्या, चपलांनी मारले! नातेवाईकांनी सांगितली विदारक कहाणी

पत्रकार परिषद घेऊन जंतर-मंतर हिंसाचारावर दिली माहिती

पोलिसांना दगड, फुलदाण्या, चपलांनी मारले! नातेवाईकांनी सांगितली विदारक कहाणी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे २० जुलै रोजी झालेल्या ‘चलो संसद’ आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत घटनाक्रमाची माहिती दिली. यावेळी आंदोलनात गंभीर जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही माध्यमांसमोर आणण्यात आले.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, २० जुलै रोजी जंतर-मंतरवर आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, आंदोलकांनी अटींचे उल्लंघन करून संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की, दगडफेक व पोलिसांवर हल्ले झाल्याचा दावा करण्यात आला. या हिंसाचारात १३० पोलिस कर्मचारी आणि अधिकारी, तसेच ६५ आंदोलनकर्ते जखमी झाले. या प्रकरणी आतापर्यंत १५ एफआयआर नोंदविण्यात आले असून तपास सुरू आहे.

पत्रकार परिषदेत जखमी पोलिस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. जंतर-मंतर आंदोलनात जखमी झालेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाच्या (SI) मुलीने सांगितले की, तिच्या वडिलांची मुख्य आंदोलनस्थळी, बॅरिकेड्सजवळ आघाडीवर नियुक्ती करण्यात आली होती. “२० जुलै रोजी हिंसक जमावाने वडिलांना जंतर-मंतरच्या मुख्य मंचाजवळ फरफटत नेले आणि मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते जवळपास चार तास बेशुद्ध होते. त्याच रात्री त्यांचे सहकारी त्यांना घरी घेऊन आले, तेव्हा त्यांचा गणवेश रक्ताने माखलेला होता,” असा दावा तिने केला.

पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या जखमी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या (ASI) पत्नीनेही आंदोलनकर्त्यांवर गंभीर आरोप केले. “माझे पती गेली ३३ वर्षे दिल्ली पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यांनी कॉन्स्टेबल म्हणून सेवेला सुरुवात केली होती आणि सध्या ते एएसआय आहेत. २० जुलै रोजी ते जंतर-मंतर येथे कर्तव्यावर गेले होते. सकाळी सुमारे ११ वाजता त्यांनी फोन करून मोठी गर्दी झाल्याचे आणि आंदोलक संसदेकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. संध्याकाळी ते एलएनजेपी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याचे समजले. त्यांनी मला सांगितले की जमाव हिंसक झाला होता. आंदोलकांकडून पोलिसांवर फुलदाण्या, दगड, चप्पल आणि बूट फेकण्यात आले. संसदेच्या सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेड्सही तोडण्यात आले,” असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

भिवंडीत चार मजली इमरात कोसळून ९ जणांचा मृत्यू

पाकिस्तानमधील ब्रॉड पीकवर हिमस्खलन; १० गिर्यारोहक बेपत्ता

पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; तरुणीविरोधात एफआयआर

ऑगस्टमध्येही बरसणार मान्सून; पावसाची तूट कमी होऊन १४ टक्क्यांवर

दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत काही व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजही सादर केले. या फुटेजमध्ये आंदोलकांकडून पोलिसांवर धक्काबुक्की, बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न आणि हिंसाचार झाल्याचा दावा करण्यात आला. काही आंदोलकांनी पोलिसांचे हेल्मेट, ढाली आणि इतर साहित्य हिसकावून घेतल्याचाही आरोप करण्यात आला. पोलिसांनी या सर्व घटनांचे डिजिटल पुरावे तपासाचा भाग म्हणून जतन केल्याचे सांगितले.

Exit mobile version