यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने देशभरात पावसाची मोठी तूट निर्माण झाली होती. मात्र जुलैच्या उत्तरार्धात मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून आता ऑगस्ट महिन्यातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे.
सध्या महाराष्ट्रावरून पुढे सरकणाऱ्या खोल दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामुळे देशातील एकूण पावसाची तूट कमी होऊन ती १४ टक्क्यांवर आली आहे. पुढील काही दिवस चांगला पाऊस झाल्यास ही तूट आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा तसेच दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. मान्सून सक्रिय झाल्याने शेती क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला रखडलेली खरीप पिकांची पेरणी आता वेगाने होत असून भात, सोयाबीन, कापूस आणि मका यांसारख्या पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरत आहे.
हे ही वाचा:
मोदींच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणी मेटा इंडियाच्या प्रमुखांविरोधात गुन्हा
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्यात आढळला पाकिस्तानी फुगा
दीपके मोदींनाच भिडू लागला…पंतप्रधानपद सोडा, इन्फ्लुएन्सर बना!
पाकिस्तानात पोलिस चौकीवर झालेल्या हल्ल्यात नऊ पोलिसांचा मृत्यू
हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा एल निनोचा अपेक्षित परिणाम फारसा दिसून आला नाही. जुलैमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मात्र हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप अधिक अनिश्चित होत असल्याने पुढील काळात मान्सूनचा अंदाज वर्तवणे अधिक आव्हानात्मक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
