सूर्यकुमार यादवकडून स्पर्धेचे मानधन पहलगाम पीडितांच्या कुटुंबियांना आणि सैन्याला

आशिया कप स्पर्धेतील विजयानंतर कर्णधाराचा निर्णय

सूर्यकुमार यादवकडून स्पर्धेचे मानधन पहलगाम पीडितांच्या कुटुंबियांना आणि सैन्याला

बहुचर्चित अशा आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला नमवत चषकावर नाव कोरले. यंदा ही स्पर्धा अनेक कारणांनी चांगलीच चर्चेत राहिली. विजयानंतरही संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि पाकिस्तानमध्ये सरकारी मंत्री म्हणून नक्वी यांची दुहेरी भूमिका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने सामन्याच्या शुल्कासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सूर्यकुमार यादव याने सांगितले की, या स्पर्धेतील आपली संपूर्ण मॅच फी तो भारतीय सशस्त्र दलांना आणि २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यातील पीडितांना देणार आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्याने आपली भूमिका स्पष्ट केली. अंतिम सामन्यातील विजयानंतर सूर्यकुमार यादवने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “मी या स्पर्धेतील माझी संपूर्ण मॅच फी आपल्या सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. जय हिंद.”

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना टी-२० फॉरमॅटमध्ये प्रत्येक सामन्यासाठी ४ लाख रुपये मॅच फी मिळते. सूर्यकुमार या स्पर्धेत सात सामने खेळला आहे. त्यामुळे त्याला मिळणार एकूण २८ लाख रुपयांची मॅच फी तो पहलगाम हल्ल्यातील पीडीत आणि सैन्यासाठी देणार आहे. भारताच्या विजयानंतर लगेचच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी २१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

हे ही वाचा:

आशिया कप ट्रॉफी, भारतीय खेळाडूंची पदके हरलेल्या पाकने चोरली!

आशिया कप: भारताच्या विजयानंतर मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची करून दिली आठवण

भारताचे ऑपरेशन सिंदूरनंतर ऑपरेशन ‘तिलक’

कंप्यूटर आणि मोबाईलमुळे वाढतेय सर्व्हायकल पेनची समस्या

दरम्यान, रविवारी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. विजेत्यांनी ट्रॉफी आणि पदकाशिवाय त्यांचे यश साजरे केले. पत्रकारांशी बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “मी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून, क्रिकेटचे अनुसरण करायला सुरुवात केल्यापासून, चॅम्पियन संघाला ट्रॉफी नाकारली जाते हे मी कधीही पाहिले नाही. तेही कष्टाने मिळवलेले, आम्हाला ते सहज मिळाले असे नाही. ही कष्टाने मिळवलेली स्पर्धा होती. आम्ही चौथ्या सामन्यापासून येथे आहोत, सलग दोन चांगले सामने खेळलो. मला वाटते की आम्ही पात्र होतो.” तो पुढे म्हणाला, “मला ट्रॉफींबद्दल विचारले तर, माझ्या ट्रॉफीज ड्रेसिंग रूममध्ये आहेत. सर्व १४ खेळाडू, सर्व सपोर्ट स्टाफ हेच खरे ट्रॉफी आहेत ज्यांचा मी या प्रवासात खूप मोठा चाहता आहे.

Exit mobile version