राष्ट्रपती मुर्मू यांच्या ‘त्या’ फोटोमुळे पाकिस्तानचा खोटारडा चेहरा जगासमोर उघड

राष्ट्रपती मुर्मू यांनी राफेल लढाऊ विमानातून ३० मिनिटांचे उड्डाण केले पूर्ण

राष्ट्रपती मुर्मू यांच्या ‘त्या’ फोटोमुळे पाकिस्तानचा खोटारडा चेहरा जगासमोर उघड

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी राफेल लढाऊ विमानातून ३० मिनिटांचे उड्डाण पूर्ण केले. यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी अंबाला हवाई दलाच्या तळावर स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांच्यासोबत फोटो काढला. मात्र, हा केवळ एक फोटो नसून यातून पाकिस्तानला कठोर संदेश देण्यात आला असून पाकिस्तानचा खोटा दावाही खोडून टाकण्यात आला आहे.

स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान राफेल विमान उडवले होते. मे महिन्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी पायाभूत सुविधांच्या ठिकाणांवर भारताने अचूक हवाई हल्ले केले आणि दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. यानंतर सुरू असलेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानच्या काही माध्यमांनी राफेल विमानाच्या पायलट असलेल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांना पकडल्याचा दावा केला होता. भारताने हा दावा फेटाळला होता. शिवाय आता थेट राष्ट्रपतींनी स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांच्यासोबत फोटो काढून पाकिस्तानला कठोर संदेश दिला आहे. शिवाय पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर उघड केला आहे.

हे ही वाचा: 

आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत रो‘हिट’!

“भारतासोबतचे युद्ध १० दिवस चालले असते तर…” काय म्हणाले पाकिस्तानी विश्लेषक?

आशियाई युवा स्पर्धेत रुपेरी चमक दाखविणाऱ्या शौर्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक

ममदानीने बेकायदेशीर परदेशी देणग्या घेतल्याचा आरोप

राष्ट्रपती मुर्मू यांनी हरियाणाच्या अंबाला येथील हवाई दलाच्या तळावरून राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केले. “राफेलमधील उड्डाण हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. शक्तिशाली राफेल विमानामधील या पहिल्या उड्डाणाने माझ्या मनात देशाच्या संरक्षण क्षमतेबद्दल अभिमानाची भावना निर्माण केली आहे. हे उड्डाण यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल मी भारतीय हवाई दलाचे आणि अंबाला येथील हवाई दल स्टेशनच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करते,” असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. या उड्डाणासह, मुर्मू भारतीय हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानांमधून उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती बनल्या आहेत. एप्रिल २०२३ मध्ये, त्यांनी आसाममधील तेजपूर हवाई दल तळावरून सुखोई-३० एमकेआयमध्ये उड्डाण केले होते.

Exit mobile version