राज्याच्या राजकारणातील ‘दादा’ व्यक्तिमत्त्व हरपले! कशी होती राजकीय कारकीर्द?

बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू

राज्याच्या राजकारणातील ‘दादा’ व्यक्तिमत्त्व हरपले! कशी होती राजकीय कारकीर्द?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. विमान बारामतीमध्ये उतरत असताना हा अपघात झाला आणि विमानाला आग लागली. अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभांसाठी जात होते. या घटनेनंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून अजित पवारांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकारणातील ‘दादा’ व्यक्तिमत्त्व गेल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

अजितदादा पवार म्हटलं की, त्यांची विशेष ओळख म्हणजे धारदार आवाज आणि स्पष्टवक्तपणा. समोरच्याचे काम होत असेल तर करणार आणि होत नसेल तर त्याला नाही म्हणून तोंडावर सांगणारा नेता म्हणजे अजित पवार. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवार यांचे नाव आवर्जून घेतले जाते. वक्तशीरपणा, प्रशासनावर मजबूत पकड आणि निर्णयक्षमता यामुळे त्यांची स्वतःची विशेष ओळख होती.

खासदार ते तब्बल सात वेळा उपमुख्यमंत्रीपद सांभाळणारे सक्षम नेते अशी अजित पवारांची राजकीय कारकीर्द होती. अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते पुतणे. यानंतर त्यांनी त्यांची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. त्यांनी १९९१ मध्ये राज्य विधानसभेत प्रवेश केला आणि अनेक वेळा बारामतीचे आमदार बनले, सातत्याने पदोन्नती करत, अनेक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री बनले.

हे ही वाचा:

“जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते अजित पवार”

चांदीला चढा भाव! २१,००० रुपयांची उसळी

बारामतीमध्ये विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू

बारामतीत लँडिंग दरम्यान विमानाला अपघात; अजित पवार गंभीर जखमी

अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सुरुवातीचे वर्ष सहकारी संस्थेत घालवले ज्याने पुणे, कोल्हापूर, सांगली, बारामती आणि इतर पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात आणि राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. येथेच त्यांनी एक नेटवर्क निर्माण केले, त्यांची प्रतिष्ठा निर्माण केली आणि राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. २००४ ते २०२५ पर्यंत त्यांनी अनेक मंत्रीपदे सांभाळली आहेत. २००४ मध्ये त्यांनी सिंचन आणि जलसंपदा खात्याचे नेतृत्व केले, दोन वेळा (२०१०-२०१४, २०१९-२०२२) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पुन्हा २०२३ पासून राज्याचे अर्थमंत्रीपद भूषवले. तसेच अनेक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. अर्थमंत्री असताना त्यांनी राज्याचे अर्थसंकल्प तयार करण्यात, वित्तीय शिस्त राखण्यात आणि महाराष्ट्राचे वित्तीय धोरण घडवण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली.

भल्या पहाटे कामाला सुरुवात करणारा, फाईल्सवर थेट निर्णय घेणारा आणि कठोर प्रशासक अशी त्यांची प्रतिमा होती. चार दशकांहून अधिक काळाचा अनुभव, रणनीतीची जाण आणि संघटनात्मक ताकद यामुळे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते मानले जातात.

Exit mobile version