ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक गुड न्यूज असून चिमूर तालुक्यातील पळसगाव बफर झोन अंतर्गत बेलारा गोंडमोहाडी-पळसगाव जंगलात पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या वीरा नामक वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघांची संख्या मोठी आहे. बेलारा गोंडमोहाळी-पळसगाव जंगलात वाघांचा नेहमीच संचार असतो. याच जंगलात वीरा नावाची वाघीण संचार करत असल्याचे अनेक पर्यटकांनी पाहिले. ती या भागात प्रख्यात आहे. झायलो वाघासाबत ती अनेकदा दिसली आहे. तिने सुमारे १ महिन्यांपूर्वी दोन बछड्यांना जन्म दिला असून अलीकडे ८ दिवसांपासून ती २ बछड्यांसोबत बाहेर येऊन पर्यटकांना दिसत असल्याची माहिती वन परिक्षेत्राधिकारी योगिता आत्राम यांनी हिंदुस्थान समाचारशी बोलताना दिली.
हे ही वाचा:
आमदार भातखळकरांच्या प्रयत्नांमुळे कांदिवली स्थानकातला सरकता जिना होणार सुरू
काँग्रेसची दोन हजारांची योजना; सासू-सुनांमध्ये तू तू मै मै!
स्वीडन युरोपमधील पहिला ‘धूम्रमुक्त’ देश होणार
‘साक्षी साहिलचा उल्लेख करायची, आम्ही तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगायचो’
झायलो नामक रूबाबदार वाघ त्या बछड्यांचा पिता असल्याची माहिती सूत्राने दिली. दोन बछड्यांचा जन्म झाला असल्याचे शुभसंकेत आहेत. ताडोबात आता वाघांचे कुटुंब चांगलेच फुलू लागल्याची चर्चा परिसरातील नागरिक व पर्यटकांमध्ये सुरू झाली आहे. वीरा वाघिणीचा एक बछडा तिच्या पाठीवर बसून मस्त खेळत आहे. तर एक दिमाखात समोर बघत आहे. आनंदाची बाब म्हणजे तिचा बछडा एक मादी आणि एक नर असल्याचे माहिती आहे.
