वसई का तुंबली? कारण आलं समोर

महापुराची भीषणता दर्शवणारी घटना

वसई का तुंबली? कारण आलं समोर

१ जुलै रोजी वसई-विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले, तर काही भागांमध्ये आलेल्या पुराच्या तडाख्यात नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या महापुराची भीषणता दर्शवणारी एक घटना आता समोर आली आहे.

वसईतील राजीवली येथील वाघराळपाडा परिसरात नाल्यात वाहून गेलेली मारुती इको कार तब्बल १२ दिवसांनी बाहेर काढण्यात आली आहे. वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात नाल्यातील मोठमोठ्या दगडांना आणि इतर वस्तूंना धडकल्यामुळे या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. गाडीचा केवळ एक लोखंडाचा सांगाडा उरला असून, गाडी ओळखणेही कठीण झाले आहे.

महापुराच्या वेळी वसई-विरारमध्ये दोन चारचाकी आणि तीन दुचाकी वाहून गेल्याची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी ही इको कार सापडली असली, तरी दुसरी चारचाकी अद्यापही नाल्यातच अडकून असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर तिचा शोध सुरू असला, तरी ती बाहेर काढण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. दुसरीकडे, पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तीन दुचाकींचा अजूनही कोणताही मागमूस लागलेला नाही. नाल्यात साचलेला गाळ, झाडांच्या फांद्या आणि इतर अवशेषांमुळे शोधकार्याला अडथळे येत आहेत.

हे ही वाचा:

डोक्यावरील केस कापले, गोमुत्र प्यायला दिले… विनायक राऊतांच्या सुनेची तक्रार

बुलेट ट्रेनच्या तीन नवीन मार्गांची घोषणा

विम्बल्डनची नवी राणी नोस्कोव्हाला आली आईची आठवण!

‘ताज’ हॉटेलला बॉम्बची धमकी; मध्यरात्री सुरक्षा यंत्रणांची धावपळ

दरम्यान, या घटनेमुळे शहरातील नालेसफाई, पावसाळ्यापूर्वीची तयारी आणि पूरनियोजनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अशा घटना टाळण्यासाठी नाल्यांची नियमित साफसफाई, अतिक्रमण हटविणे आणि जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version