पहिल्या हायड्रोजन ट्रेनचा प्रवास ८९ किलोमीटर

१७ जुलैपासून सुरू होणार प्रवास

पहिल्या हायड्रोजन ट्रेनचा प्रवास ८९ किलोमीटर

भारतीय रेल्वे हरित आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत आहे. १७ जुलै रोजी देशातील पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी प्रवासी ट्रेन हरियाणातील जींद ते सोनीपत मार्गावर धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाण्याची शक्यता असून, भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

ही हायड्रोजन ट्रेन जींद आणि सोनीपतदरम्यान सुमारे ८९ किलोमीटरचा प्रवास करणार असून, मार्गातील १२ स्थानकांवर थांबणार आहे. पर्यावरणपूरक हायड्रोजन फ्यूल सेल तंत्रज्ञानावर आधारित ही ट्रेन चालणार असल्याने डिझेल इंजिनांच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन जवळपास शून्यावर आणण्यास मदत होईल. ट्रेनमधून केवळ पाण्याची वाफ आणि उष्णता बाहेर पडते, त्यामुळे ही वाहतूक अधिक स्वच्छ आणि पर्यावरणस्नेही ठरणार आहे.
हे ही वाचा:
भारतीय अधिकारी पूजाकुमारी झा यानी बांगलादेशच्या अधिकाऱ्यांना दिला दणका

डोक्यावरील केस कापले, गोमुत्र प्यायला दिले… विनायक राऊतांच्या सुनेची तक्रार

कंपन्यांना मोठा दिलासा! EPFO कडून PF ट्रस्ट नियमांमध्ये मोठी शिथिलता

बुलेट ट्रेनच्या तीन नवीन मार्गांची घोषणा

भारतीय रेल्वेने हरित ऊर्जेचा वापर वाढवण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विकसित केला आहे. हायड्रोजन फ्यूल सेल तंत्रज्ञानामुळे इंधन कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून, भविष्यात अशा ट्रेन देशातील इतर मार्गांवरही सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे. यामुळे रेल्वेचे प्रदूषण कमी होण्याबरोबरच स्वच्छ ऊर्जा वापरालाही मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.

जगातील मोजक्या देशांमध्ये हायड्रोजन ट्रेनचे यशस्वी संचालन होत असताना, भारतानेही या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात दमदार प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या हरित परिवर्तनाला वेग मिळणार असून, भविष्यातील रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने हा एक मैलाचा दगड ठरणार आहे.

Exit mobile version