भारत आपल्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेबाबत कोणतीही तडजोड करत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे आयोजित करण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय परराष्ट्र धोरण परिषदेत मोठा वाद निर्माण झाला. या कार्यक्रमादरम्यान भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरचा पाकिस्तानचा भाग म्हणून नकाशामध्ये उल्लेख करण्यात आला. भारतीय उच्चायुक्तालयातील एका तरुण राजनैतिक अधिकाऱ्याने ही चूक तत्काळ ओळखली.
स्क्रीनवर हा चुकीचा नकाशा दिसताच, ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयातील द्वितीय सचिव पूजा कुमारी झा यांनी क्षणाचाही विलंब न लावता कार्यक्रम अर्धवट थांबवला आणि त्यावर ठाम आक्षेप नोंदवला. त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कठोर शब्दांत संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अविच्छेद्य भाग असल्याचा संदेश जगासमोर ठेवला.
ही संपूर्ण घटना ढाका येथे ‘बांगलादेश इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (BIISS) आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान घडली. या परिषदेचा विषय होता, “विश्वासाची पुनर्स्थापना आणि प्रादेशिक ऐक्याची नव्याने उभारणी : सार्कला पुन्हा कसे सक्रिय करावे?”
या परिषदेला विविध देशांचे राजनैतिक अधिकारी, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ आणि परराष्ट्र धोरणातील तज्ज्ञ उपस्थित होते. बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शमा ओबैद या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
हे ही वाचा:
कंपन्यांना मोठा दिलासा! EPFO कडून PF ट्रस्ट नियमांमध्ये मोठी शिथिलता
रशियन तेल खरेदीत भारताचा नवा विक्रम
व्हिएतनाममध्ये १५ भारतीय पर्यटकांच्या मृत्यूशी लाव्हा मोबाईलचा काय संबंध?
सूरांचा अमर स्वर हरपला; दिग्गज गायिका एस. जानकी यांचे निधन
यावेळी भारतातील बांगलादेशचे माजी उच्चायुक्त आणि वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अहमद तारीक करीम आपले सादरीकरण करत होते. त्यांच्या सादरीकरणातील दक्षिण आशियाच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर हा पाकिस्तानचा भाग दाखवण्यात आला होता. हे पाहताच भारतीय राजनैतिक अधिकारी पूजा कुमारी झा यांनी तात्काळ हस्तक्षेप करत कार्यक्रम आयोजकांना आक्षेप नोंदवला. त्यांनी अहमद तारीक करीम यांना उद्देशून म्हटले, “सर, येथे दाखवलेला भारताचा नकाशा चुकीचा आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि हा नकाशा वस्तुस्थितीला धरून नाही. हा भारताच्या सार्वभौमत्वाविरुद्ध आहे.”
भारतीय अधिकाऱ्यांची ठाम भूमिका पाहून सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अहमद तारीक करीम यांनी व्यासपीठावरून स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, हा नकाशा केवळ प्रतीकात्मक स्वरूपात वापरण्यात आला असून कोणत्याही देशाच्या वास्तविक सीमा किंवा राजकीय दाव्यांना धक्का देण्याचा उद्देश नव्हता.
मात्र पूजा कुमारी झा या या स्पष्टीकरणाने समाधानी झाल्या नाहीत. त्यांनी पुन्हा स्पष्ट शब्दांत सांगितले, “सर, मी आपला मुद्दा समजते. पण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि येथे तो चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. त्यामुळे मी याकडे आपले लक्ष वेधत माझा अधिकृत आक्षेप नोंदवत आहे.”
यानंतर अहमद तारीक करीम यांनी त्यांना विचारले की त्या भारतातून आहेत का. त्यावर पूजा झा यांनी स्वतःची ओळख देत सांगितले की त्या ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयात द्वितीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर अहमद तारीक करीम यांनी त्यांचा आक्षेप नोंदवून घेत असल्याचे सांगितले आणि आपले सादरीकरण पुढे सुरू ठेवले.
पूजाकुमारी यांची चर्चा
या घटनेनंतर पूजा कुमारी झा यांच्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली. भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठामपणे मांडणाऱ्या या तरुण अधिकाऱ्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. पूजा कुमारी झा या २०२२ बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी आहेत. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी या प्रतिष्ठित सेवेत प्रवेश केला. सध्या त्या ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयात द्वितीय सचिव (राजकीय आणि माहिती) म्हणून कार्यरत आहेत.
ढाका येथे नियुक्ती होण्यापूर्वी त्यांचे राजनैतिक प्रशिक्षण तैवानमध्ये झाले होते. त्या मूळ बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील पुर्णिया गावच्या असून त्यांचे कुटुंब सध्या दिल्लीत राहते. २०२१ च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात अखिल भारतीय ८२ वा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्यांची भारतीय परराष्ट्र सेवेसाठी निवड झाली.
सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या पूजा झा यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, “मी ज्या समाजातून आले आहे, तिथे या परीक्षेत यश मिळवण्याचे स्वप्न पाहणेही मोठी गोष्ट मानली जाते.”
वडील म्हणत आयएएस होऊ नको, बाकी काहीही हो!
त्यांचे वडील गेली जवळपास ४० वर्षे गुरुग्राममधील एका खासगी कंपनीत कार्यालयीन सहाय्यक म्हणून काम करत आहेत, तर आई गृहिणी आहेत. पूजा यांनी सांगितले होते की, त्या मोठी स्वप्ने पाहू लागल्या की त्यांचे वडील विनोदाने किंवा काळजीपोटी म्हणायचे, “तू काहीही हो, पण बॉलिवूड अभिनेत्री, खगोलशास्त्रज्ञ किंवा आयएएस अधिकारी होण्याचा विचार करू नकोस.”
कारण गरीब कुटुंबातील मुलीसाठी अशा मोठ्या पदांवर पोहोचणे अशक्य असल्याचे त्यांना वाटत होते. पूजा या त्यांच्या आई-वडिलांच्या पाच मुलींमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या धाकट्या आहेत. त्यांच्यानंतर एक धाकटा भाऊ आहे. पूजा म्हणाल्या होत्या, “माझ्या धाकट्या भावाच्या जन्मानंतर माझ्या कुटुंबाची मुलाची इच्छा पूर्ण झाली. मी ज्या समाजातून आले आहे, तिथे मुलाच्या जन्माला खूप महत्त्व दिले जाते. मुलगी जन्माला आली तर कोणताही आनंद साजरा केला जात नाही, पण मुलगा झाला की मोठा उत्सव केला जातो. ही मानसिकता बदलण्यासाठी मला अनेक वर्षे संघर्ष करावा लागला.”







