एशियन अंडर-२३ ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी भारताच्या आनंद सिंहने पुरुष भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. आनंदने कारकिर्दीत प्रथमच ८० मीटरचा टप्पा पार करत ८०.५७ मीटरची सर्वोत्तम फेक नोंदवली.
चीनमधील ओरडोस येथे झालेल्या या स्पर्धेत २२ वर्षीय आनंद सिंहने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी केली. त्याने ८०.५७ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम (पर्सनल बेस्ट) फेक करत सुवर्णपदक जिंकले. यापूर्वीच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा तब्बल २.८९ मीटरने सुधारणा करत त्याने प्रथमच ८० मीटरची मर्यादा ओलांडली.
उत्तर प्रदेशचा हा भालाफेकपटू २८ जून रोजी भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ऍथलेटिक्स स्पर्धेत ७७.६८ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम फेक नोंदवून या स्पर्धेत उतरला होता. त्या स्पर्धेत त्याने अखेरच्या सहाव्या प्रयत्नात ही कामगिरी केली होती. मात्र, रोहित यादव, यशवीर सिंह आणि सचिन यादव यांच्या मागे त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच पटियाला येथे झालेल्या इंडियन ओपन थ्रो स्पर्धेतही आनंदने ७६.९४ मीटरची फेक करत उपविजेतेपद मिळवले होते. दरम्यान, ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय)ने ९ ते १२ जुलैदरम्यान ओरडोस येथे झालेल्या एशियन अंडर-२३ ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी ५४ सदस्यीय भारतीय संघाची निवड केली होती.
हे ही वाचा:
यास्तिकाच्या शतकाने इतिहास रचला
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्तास पाणीकपात नाही
अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचारप्रकरणी टेनिस प्रशिक्षक निर्दोष
भारतीय पुरुष संघात विभास्कर कुमार, सॅम वसंत एस, हर्ष संतोष राऊत, मोहम्मद शान पी, लौकिक अनंत मेल्गे, अनिकेत नलवाडे, अभय सिंह, जे. पांडियन, आस्तिक प्रधान, सेतू मिश्रा, अमन चौधरी, शरण एम., साहिल मलिक, तरणदीप सिंह, शकील, विनोद कुमार भनोट, साकीर, ऋतिक देयोल, शिवाजी परशुराम, विनोद सिंह, शैलेश कुशवाह, शाहरुख खान, सुदीप, मोहम्मद मुहासिन, देव कुमार मीणा, कुलदीप कुमार, मोहम्मद अत्ता साजिद, भरतप्रीत सिंह, शिवम लोहाकरे, आनंद सिंह, हर्षित कुमार, अभिजीत भोसले आणि सचिन जी यांचा समावेश होता.
महिला संघात किरुथिका, अक्षया एस., व्ही. सुदीक्षा, संजना, अबिनया राजराजन, हुइड्रोम भूमेश्वर, वैष्णवी रावल, श्रेया राजेश, सबिता टोप्पो, प्राची देवकर, नितिका अनुप अकारे, शैली सिंह, विधी, अनुप्रिया व्हीएस, प्रिया, श्रावणी सचिन सांगले, नोफिसा खातून, ताहुरा खातून, भूमीका नेहते, सँड्रा मोल साबू, सी. जेनिस स्टेला, अनामिका केए आणि आरती यांचा समावेश होता.







