पुणेकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत अलीकडील मुसळधार पावसानंतर समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने सध्या शहरात कोणतीही पाणीकपात लागू केली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांना दररोज नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार असून, दिवसाआड पाणीपुरवठा पुन्हा सुरू होणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत घेतला जाणार आहे.
यापूर्वी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने ७ ते १२ जुलैदरम्यान लागू असलेली पाणीकपात स्थगित केली होती. ही मुदत संपत आल्याने सोमवारपासून पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होणार, अशी भीती पुणेकरांमध्ये होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली असून खडकवासला धरणसाखळीतील एकूण पाणीसाठा सुमारे १६.६४ ते १६.७७ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे तातडीने पाणीकपात करण्याची गरज नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हे ही वाचा:
व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेनंतर स्पीडबोट चालक ताब्यात
यास्तिकाच्या शतकाने इतिहास रचला
ब्रह्मपुत्रावर चीनचा ‘टाईम बॉम्ब’?
ब्रेकनंतर मान्सूनचे दणक्यात पुनरागमन होणार
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की, धरणांतील सद्यस्थिती, आगामी पावसाचा अंदाज आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील आठवड्यात सर्वपक्षीय बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत पुणेकरांना नियमित आणि अखंड पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.
गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, यामुळे शहराच्या पाणीटंचाईच्या चिंतेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला असून, यंदाच्या मान्सूनमुळे शहराचा पाणीपुरवठा अधिक स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







