वेंगसरकर अकादमी आणि स्पोर्टसफिल्ड यांच्यात विजेतेपदासाठी लढत

१० वी संतोषकुमार घोष (१६ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धा

वेंगसरकर अकादमी आणि स्पोर्टसफिल्ड यांच्यात विजेतेपदासाठी लढत

बलाढ्य वेंगसरकर अकादमी आणि स्पोर्टसफिल्ड या दोन संघादरम्यान १० व्या संतोषकुमार घोष (१६ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेतेपदासाठी मुकाबला होईल. दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीने मुंबई पोलीस जिमखान्याविरुद्धच्या सामन्यात केवळ ६३ षटकांत ४ बाद २७३ धावा कुटल्या. पोलीस संघाचा पहिला डाव केवळ ८९ धावांत आटोपल्याने त्यांनी सामना सोडून दिला. अकादमीच्या रोहन करंदीकर (९३) याचे शतक हुकल्यानंतर, कर्णधार हर्ष आघाव (नाबाद ५१), देवांश राय (५५) आणि दर्श मुरकुटे (४०) यांनी चौफेर टोलेबाजी करत प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणले.

माजी कसोटी खेळाडू अरुंधती घोष यांच्या स्पोर्टिंग युनियनने कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस् फाऊंडेशनसह आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्पोर्टसफिल्डने दादर पारशी कॉलनीचा पहिला डाव १५९ (५८.३ षटके) धावांवर संपविला. अभिनव साहा (५६) आणि एकलव्य खाडे (३९) हे खेळपट्टीवर असेपर्यंत दादर संघाला प्रतिस्पर्ध्यांच्या २४३ या धावसंख्येला पार करण्याच्या आशा वाटत होत्या, पण डावखुरा फिरकी गोलंदाज चिराग मोडक (४०-४) आणि ऑफस्पिनर आर्य गायकवाड (५६-३) यांनी त्याला सुरुंग लावला.

स्पर्धेची अंतिम लढत ८-९ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर होत असून मुंबई क्रिकेटचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल काळे, सचिव अजिंक्य नाईक आपल्या अन्य पदाधिकाऱ्यांसह पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी असणार आहेत.

स्कोअरबोर्ड

मुंबई पोलीस जिमखाना- ४४.४ षटकांत ८९ (शाह मेहबूब आलम २१, हर्ष आधाव ३०-६, अगस्त बंगेरा ३५-२) पहिल्या डावावर पराभूत वि. दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी ६३ षटकांत ४ बाद २७३ (रोहन करंदीकर ९३, देवांश राय ५५, दर्श मुरकुटे ४० हर्ष आघाव नाबाद ५१, साद खान ७१-२) सामनावीर-  हर्ष आघाव.

स्पोर्टसफिल्ड क्रिकेट क्लब ६५.२ षटकांत २४३ (वसीम खान ६४, यासीन सौदागर ४१, आर्य गायकवाड ३०, अखिलेश बराई ६६-५) विजयी वि. दादर पारशी कॉलनी ५८.३ षटकांत १५९ (अभिनव साहा ५६, एकलव्य खाडे ३९, चिराग मोडक ४०-४, आर्य गायकवाड ५६-३) सामनावीर – चिराग मोडक.

Exit mobile version