पेड राजकीय मोहिमेचा बळी ठरत असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी का केला?

सियामच्या ६५ व्या वार्षिक अधिवेशनात बोलताना केले वक्तव्य

पेड राजकीय मोहिमेचा बळी ठरत असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी का केला?

सरकारच्या इथेनॉल-मिश्रित इंधन कल्पनेला टीका सहन करावी लागत असताना केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नितीन गडकरी यांनी गुरुवारी “पेड राजकीय मोहिमेचा” बळी ठरत असल्याचा दावा केला.

दिल्लीतील सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या ६५ व्या वार्षिक अधिवेशनात बोलताना गडकरी म्हणाले की, पारंपारिक इंधनात २० टक्के इथेनॉल मिसळणाऱ्या E20 पेट्रोलबद्दलच्या चिंता या अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने दाखवल्या जात आहेत. त्यांनी असे प्रतिपादन केले की हे इंधन सुरक्षित आहे. शिवाय याला नियामक आणि वाहन उत्पादक दोघांचाही पाठिंबा आहे. सर्वोच्च न्यायालयाने E20 कार्यक्रमाबाबत स्पष्टता दिली आहे. पुढे नितीन गडकरी म्हणाले की, मला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठी सोशल मीडियावर एक मोहीम सुरू होती. ती एक पैसे देऊन केलेली मोहीम होती, त्यामुळे त्याकडे लक्ष देऊ नका, असे ते म्हणाले.

इथेनॉल मिश्रण आणि E20 पेट्रोलच्या अनिवार्य विक्रीवरून सोशल मीडियावर टीका केली जात होती. वाहन मालकांचा दावा आहे की इंधनामुळे मायलेज कमी होते आणि जास्त इथेनॉल मिश्रणासाठी न बनवलेल्या जुन्या वाहनांचे नुकसान होते. उद्योग तज्ञ आणि काही सेवा गॅरेजनी २०२३ पूर्वीच्या मॉडेल्सच्या मालकांकडून तक्रारी नोंदवल्या आहेत. परंतु नितीन गडकरी यांनी सातत्याने त्याची कार्यक्षमता आणि फायदे सांगितले आहेत.

गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी विरोधकांना E20 मुळे वाहनाचे नुकसान झाल्याचे एकतरी उदाहरण दाखवण्याचे आव्हान दिले होते. दरम्यान, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) किंवा SIAM ने हानीचे कोणतेही असे प्रकरण नोंदवलेले नाही. या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानेही याला हिरवा झेंडा दाखवत सरकारच्या स्वच्छ-ऊर्जा धोरणातील कायदेशीर अडथळा दूर करून केली होती.

हेही वाचा..

राहुल गांधी परदेश दौऱ्यात प्रोटोकॉल मोडतात… सीआरपीएफ हतबल

नेपाळ सारखे जनआंदोलन भारतात व्हावं; तृणमूलचे आमदार बरळले

नेपाळ तुरुंगातून फरार ६० कैद्यांना सशस्त्र सीमा बलाने केली अटक!

मेंदू खाणाऱ्या अमीबामुळे आणखी एकाचा मृत्यू

यामुळे तेल आयात कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असा सरकारचा दावा आहे . शेतकऱ्यांसाठी नवीन उत्पन्नाच्या संधी उपलब्ध असल्याचा दावा गडकरी यांनी पुन्हा एकदा केला. मक्यापासून इथेनॉल तयार करण्याचा निर्णय घेतला असून परिणामी, उत्तर प्रदेश, बिहार आणि देशभरात मक्याची लागवड तिप्पट झाली आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. ऊर्जा आणि वीज क्षेत्रात शेतीचे हे विविधीकरण शेतकऱ्यांना थेट फायदा देते आणि अर्थव्यवस्था मजबूत करते, यात काहीही गैर नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

Exit mobile version