मालाड-मालवणीत बांगलादेशी, रोहिंग्यांची दादागिरी खपवून घेणार नाही

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा इशारा

मालाड-मालवणीत बांगलादेशी, रोहिंग्यांची दादागिरी खपवून घेणार नाही

मालाडच्या मालवणी येथील मालवणी टाऊनशिप ही शाळा खाजगी संस्थेला दिल्याचा आरोप स्थानिक काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि खासदार वर्षा गायकवाड केला आहे. आज (२३ ऑगस्ट) विरोधी नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शाळेच्या बाहेर निषेध आंदोलन केले. आज या शाळेत मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा कार्यक्रम होता आणि त्यादरम्यान विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले. दरम्यान, यावर मंत्री लोढा यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली. त्यांनी दावा केला की मालाडमध्ये सर्वाधिक सरकारची जमीन होती, त्यावर यांनी कब्जा केला. मालाडमध्ये बांगलादेशी, रोहिंग्या कसे?, त्यांना मदत कोणी केली? त्यांनी जर दादागिरी केली तर फडणवीस सरकार सहन करणार नाही, असा इशारा मंत्री लोढा यांनी यावेळी दिला.

विरोधकांच्या शाळा खाजगी करण्याच्या आरोपाला उत्तर देताना लोढा म्हणाले, महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई पालिकेने एक जीआर काढला होता. जीआर अंतर्गत, महापालिकेच्या शाळा स्वखर्चाने चालवण्यासाठी जर एखादी संस्था पुढे आली तर त्यांना ती देण्यात यावी असे म्हटले गेले होते. त्यानुसार पूर्वी ३०-३२ शाळा संस्थाना देण्यात आल्या आहेत. मालवणी टाउनशिप शाळा देखील संस्थेला देण्यात आली आहे आणि संस्थेने इथे चांगले काम केले आहे. भाजपा नेते ब्रिजेश सिंग यांनी या शाळेसाठी कार्यकर्त्यांची, शिक्षकांची एक मजबूत फळी निर्माण करण्याचे काम केले आहे. तेच या उपक्रमाचे आधारस्तंभ आहेत.

हेही वाचा..

आधारकार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही, यावर न्यायालय ठाम का नाही?

मनीषा हत्याकांड : सीबीआय चौकशीस सरकारला काहीही आक्षेप नाही

दोन पाकिस्तानी महिलांची नावे मतदारयादीत!

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’मुळे देशाचा विकास वेगाने होईल

मागील शाळेचा रिझल्ट पाहिला तर ६० टक्के होता जो आता ८५ टक्क्यांवर पोहोचला आणि पुढे १०० टक्क्यांवर जाईल. विद्यार्थ्यांना चांगले  शिक्षण दिले जाते. विविध उपक्रम राबवले जातात. शिक्षकांना चांगला पगार आहे आणि याची सर्व व्यवस्था संस्था करते. मग आता विरोध कशासाठी हा प्रश्न आहे. ज्यांनी विरोध केला त्यांची मुले आंतरराष्ट्रीय शाळेत शिकतात. सरकारची सर्वात जास्त जमीन ही मालाड-मालवणीमध्ये होती. यांनी त्यावर कब्जा केला. याठिकाणी इथल्या आमदारांनी काय विकास केला, हे सांगावे. विरोधकांकडून जे राजकारण केले जात आहे, त्याचा मी निषेध करतो.

सहपालकमंत्री या नात्याने मी १० दिवसांपूर्वी इथे डीपीडीसी फंडातून १ कोटी रुपयाचा फंड दिला होता. त्या फंडाची कॉपी-पत्र देण्यासाठी याठिकाणी आलो होतो, त्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेतील विविध साहित्यांसाठी, रोबोटिक्स-कॉम्प्युटर लॅबसाठी याचा वापर केला जाणार आहे. तसेच शाळेतील फीसमध्ये वाढ होईल असा चुकीचा प्रचार ते करत आहेत, तसे काहीही होणार नाही.  ते पुढे सवाल उपस्थित करत म्हणाले, मालाड-मालवणीमध्ये सर्वात जास्त बांगलादेशी-रोहिंग्या कसे काय?, कुठून आलेत हे, यांना सहकार्य कोण करतं. यामागे विरोधकांचा हेतू काय आहे आणि त्यांचा हेतू उभा पडण्यासाठी याठिकाणी मी आलो आहे. भारतामध्ये बाहेरचे लोक राहू शकतात पण जर कोणी दादागिरी केली तर देवेंद्र फडणवीस सरकार सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा मंत्री लोढा यांनी दिला.

 

Exit mobile version