विश्वचषक तयारीस संजीवनी; महिला प्रीमियर लीग

विश्वचषक तयारीस संजीवनी; महिला प्रीमियर लीग

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने महिला प्रीमियर लीगचे आयोजन हे महिला टी–२० विश्वचषक २०२६ पूर्वतयारीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. विश्वचषकाआधी मिळणारी ही स्पर्धात्मक संधी भारतीय महिला संघासाठी मोठा फायदा ठरेल, असे पठाण म्हणाला.

एका मुलाखतीत बोलताना इरफान पठाण म्हणाला की, महिला प्रीमियर लीगमुळे भारतीय खेळाडूंना भरपूर सामने खेळण्याची संधी मिळते. सातत्याने सामने झाल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो आणि संघासाठी पर्यायी खेळाडू तयार होतात. दुखापतीसारख्या परिस्थितीत संघाकडे सक्षम पर्याय उपलब्ध राहतात.
“सध्याचा भारतीय महिला संघ ज्या पद्धतीने खेळतोय, त्यांचा संघ इतका मजबूत वाटतो आहे, की तो गेल्या दहा वर्षांत कधीच पाहायला मिळाला नव्हता,” असेही त्याने स्पष्ट केले.

पठाणच्या मते, प्रीमियर लीगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही स्पर्धा थेट विश्वचषकाआधी खेळवली जातेय. त्यामुळे खेळाडूंना सामन्यांचा सराव आणि आत्मविश्वास दोन्ही मिळतात. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये पटकन जुळवून घेण्याची क्षमता आता महिला संघात निर्माण झाली आहे. त्यांचा आक्रमक खेळ अधिक प्रभावी झाला असून, इंग्लंडमधील परिस्थितीशी लवकर जुळवून घेतल्यास भारतासाठी आव्हान फारसे कठीण ठरणार नाही, असेही त्याने सांगितले.

दरम्यान, माजी भारतीय वेगवान गोलंदाज वरुण आरोन याने सांगितले की, भारताने जिंकलेला एकदिवसीय विश्वचषक हा संघासाठी मानसिक अडथळा दूर करणारा ठरला आहे. त्यामुळे संघात आत्मविश्वास आणि सकारात्मक गती निर्माण झाली आहे. चाहत्यांचा आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा पाठिंबा मिळाल्याने महिला संघाला टी–२० विश्वचषक जिंकण्याची मोठी संधी आहे.

महिला प्रीमियर लीगची सुरुवात ९ जानेवारीपासून होत असून अंतिम सामना ५ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. लिलावानंतर होणारी ही स्पर्धा अधिक चुरशीची ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महिला टी–२० विश्वचषक २०२६ चे आयोजन १२ जून ते ५ जुलै या कालावधीत इंग्लंडमध्ये होणार आहे. पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर आता भारतीय महिला संघाचे लक्ष्य पहिला टी–२० विश्वचषक जिंकण्याचे आहे.

Exit mobile version