कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार व मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांच्यावतीने डायरो या गुजराती लोकगीतांच्या श्रवणीय कार्यक्रमाचे आयोजन मालाड येथील रामलीला मैदानात करण्यात आले होते. प्रसिद्ध लोकगीतकार, गायक राजबा गढवी यांच्या टीमने यावेळी बहारदार लोकगीते सादर करून उपस्थितांना डोलायला लावले. रामलीला मैदान या लोकगीत कार्यक्रमासाठी खचाखच भरले होते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाचे आयोजन होत असल्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळे महत्त्व आहे, असे सांगितले. शिवाय, डायरोसारख्या लोकगीतांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना प्रेरणा मिळते. ही लोकगीते आपली शक्ती आहेत. प्रभू श्रीरामाच्या शब्दांमुळे जशी त्यांची सेना प्रेरित होत असे तसेच या लोकगीतांचेही आहे, अशा शब्दांत या कार्यक्रमाचे कौतुकही केले.

फडणवीस म्हणाले की, या कार्यक्रमात मी सहभागी झालो याचा आनंद आहे. हा कार्यक्रम श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आला आहे. अटलजींनी नव्या भारताचा पाया रचला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या भारताची ओळख निर्माण केली. आज जो भारत कुणासमोर झुकत नाही, कुठेही थांबत नाही असा भारत मोदींनी उभा केला आहे.
फडणवीस यांनी सांगितले की, आदरणीय अटलजींची खिल्ली उडवताना एकदा विरोधी पक्षाचे लोक म्हणाले होते, राम मंदिर बांधण्याबद्दल तुम्ही बोलत होतात, ३७० कलम हटविण्याबद्दलचा विश्वास तुम्ही व्यक्त करत होतात, पण आता तुमचेच सरकार आहे. मग आता ते करून दाखवा. तेव्हा अटलजी म्हणाले की, मी २२ पक्षांना सोबत घेऊन चालत आहे, पण मी विश्वासाने सांगतो की, माझ्या पक्षाचे सरकार येईल तेव्हा ३७० कलमही हटेल, राम मंदिरही निर्माण होईल. मोदींचे सरकार आले आणि त्यांनी ते करून दाखवले. ३७० हटले आणि प्रभू श्रीरामाचे मंदिर तोडून बाबरी ढाचा रचला होता. त्या बाबरी ढाच्याला ६ डिसेंबर १९९२या दिवशी कारसेवकांनी उद्ध्वस्त केले, त्याच जागेवर आता प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. २२ जानेवारीला हा सोहळा होतो आहे. ५००-६०० वर्षे हा संघर्ष चालला, कित्येकांनी आपली आहुती दिली. पण हा संघर्ष यशस्वी करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

हे ही वाचा:
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रत्येक घरी देणार निमंत्रण!
बारामतीतील प्रकल्पासाठी २५ कोटी देणाऱ्या अदानींचे पवारांकडून कौतुक
प्रियांका वड्रा, सचिन पायलट यांना बदलले!
कृषीमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण!
फडणवीस म्हणाले की, हे केवळ एका मंदिराचे निर्माण नाही. हे एका नव्या विचाराची सुरुवात आहे, नव्या भारताचा प्रारंभ आहे. हा भारत सनातनला सोबत घेऊन वाटचाल करणार आहे, समाजातला शेवटचा घटक आणि राजा यांच्यात भेद करत नाही. दोघांनीही समपातळीवर पाहणाऱ्या रामराज्याची निर्मिती मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्याची सुरुवात २२ जानेवारीला होत आहे.
फडणवीसांनी या कार्यक्रमाची स्तुती करताना सांगितले की, आज डायरोसाठी उपस्थित आहोत याचा आनंद आहे. आपल्या लोकगीतांमध्ये मोठी शक्ती आहे. प्रभू श्रीरामांच्या शब्दांनी त्यांची सेना प्रेरित होत असे. अशीच लोकगीतांची ताकद आहे. मी लोकगीतकारांचे अभिनंदन करतो. राजबा गढवी यांचे स्वागत करतो. ते म्हणाले की, अतुल भातखळकर यांचेही अभिनंदन. अतुल भातखळकर हे अत्यंत अनुभवी आमदार आहेत. अभ्यासू आणि आपल्या मागण्या नेहाने पूर्ण करून घेणाऱ्या विरळा आमदारांपैकी ते आहेत. गोपाळ शेट्टीही इथे उपस्थित आहेत, जे सर्वसामान्य माणसाचे खासदार आहे.
या कार्यक्रमाला विधान परिषदेतील आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते.







