विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीमुळे बेंगळुरूच्या संघाने पंजाबवर मात करून आयपीएलच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये हा सामना रंगला.
विराटचा झेल जॉन बेअरस्टॉ याने सोडला आणि त्याने याचा पुरेपूर लाभ घेऊन पंजाबच्या गोलंदाजांची पिसे काढली. त्यानंतर महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक यांनी चार विकेट हाताशी असताना बेंगळुरूला शेवटच्या षटकापर्यंत थरारक झालेल्या सामन्यात विजय मिळवून दिला. बेंगळुरूच्या गोलंदाजांनीही पंजाबच्या फलंदाजांना रोखण्याची चांगली कामगिरी केली, मात्र कोहलीच या सामन्याचा खरा हिरो ठरला.
डूप्लेसिस आणि कॅमरॉन ग्रीन झटपट बाद झाले. त्यानंतर आलेला रजत पाटीदारही चांगली खेळी करून दाखवू शकला नाही. त्याला हरप्रीत ब्रार याने बाद केले. त्यानंतर ब्रारने ग्लेन मॅक्सवेलची विकेट घेतली. त्यानंतर अनुज रावत मैदानावर उतरला. समोरचे फलंदाज एकामागोमाग एक तंबूत परतत असताना कोहलीने टी -२० क्रिकेटमधील ५०हून अधिक धावांचा १००वा टप्पा पार केला. विराटने ७७ धावा केल्या. त्यानंतर रावतही बाद झाला. महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक मैदानावर उतरले. १८वे षटक अर्शदीपचे होते. मात्र लोमरोरने एक षटकार आणि एक चौकार ठोकला. बेंगळुरूला आता जिंकण्यासाठी २३ धावा हव्या होत्या. कार्तिकने १९व्या षटकात एक षटकार व एक चौकार खेचून बेंगळुरूला विजयाच्या समीप नेले.
हे ही वाचा:
‘मोदी मोदीचा गजर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कानशिलात लगावा’
“भारत माता की जय, जय हिंद हे नारे रचणारे मुस्लीम होते”
सीबीआयकडून विझाग बंदरावर २५ हजार किलो कोकेन मिश्रित यीस्ट जप्त
काँग्रेसच्या सहाव्या यादीतून पाच उमेदवार जाहीर
बेंगळुरूच्या गोलंदाजांनीही शिस्तबद्ध गोलदांजीचे दर्शन घडवले. सिराजने बेअरस्टोची विकेट घेतली. त्यानंतर पंजाबकडून प्रभसिमरन आणि शिखर धवन यांनी परिस्थिती सांभाळली आणि त्यांनी ५५ धावांची भागीदारी केली. मात्र मॅक्सवेलने प्रभसिमरन याला बाद करून ही जोडी फोडली आणि पुन्हा खेळावर वर्चस्व मिळवले. लिव्हिंगस्टोन आणि धवनच्या भागीदारीमुळे पंजाबची धावसंख्या १२.१ षटकांत चार बाद ९८ झाली होती. त्यानंतर जितेश आणि कुरन यांनी ही धावसंख्या १५०पर्यंत नेण्यात यश मिळवले. यश दयाल याने चार षटकांत २३ धावा देऊन एक विकेट घेतली. पंजाबच्या शशांक सिंगने अल्झारीच्या गोलंदाजीवर २० धावा कुटल्यामुळे पंजाबला २० षटकांत १७६ धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र हे आव्हान बेंगळुरूने सहजच पार केले.