अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांच्या जावयाला गांजाच्या तस्करीप्रकरणी अटक करून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली होती. आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी अटक करून त्यांनी उच्चभ्रू वर्तुळात ड्रग्जने केलेल्या शिरकावाचा भांडाफोड केला. यानंतर बड्यांच्या कॉलरला हात घालण्याची हिंमत दाखवणाऱ्या जिगरबाज वानखेडे यांची बदनामी करून त्यांना खच्ची करण्याचे षडयंत्र राबवले जात आहे.
मलिक यांचा जावई गांजाच्या तस्करीप्रकरणात आठ महिने तुरुंगात होता. राज्यात कॅबिनेट मंत्री पदावर असताना त्यांना ही नामुष्की सहन करावी लागली. एखाद्या सासऱ्याने याप्रकरणी जावयाचे कान ओढले असते, परंतु नबाब मलिक यांनी जावई जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याची जोरदार पाठराखण सुरू केली.
जेव्हा नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर टीका करत होते तेव्हा ते राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून बोलतायत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून बोलतायत की बेलवर बाहेर आलेल्या जावयाचे सासरे म्हणून बोलतायत याबाबत संभ्रम होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पत्रकार परीषदेत वानखेडे यांच्यावर दुगाण्या झाडल्या त्यानंतर हा संभ्रम संपला. शरद पवार मैदानात उतरल्यांनंतर शिवसेना कशी मागे राहील?
शिवसेनेबाबत आश्चर्य वाटण्याचे दिवस कधीच सरले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणारी शिवसेना कोणाचेही समर्थन करू शकते, कोणालाही समर्थन देऊ शकते. शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे मलिक यांच्या बाजूने मैदानात उतरले. केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग होतोय हे तुणतुणे वाजवत त्यांनी याप्रकरणी वानखेडे यांच्यावर निशाणा साधला.
वानखेडे हे मराठी अधिकारी आहेत. कोणत्याही दबावासमोर न झुकणारे, कोणाचाही मुलाहीजा न बाळगणारे अधिकारी असा त्यांचा लौकीक आहे. त्यांनी मलिक यांच्या जावयाच्या पाठोपाठ आर्यन खानला अटक केल्यानंतर शिवसेनेने एक मराठी अधिकारी म्हणून त्यांची पाठराखण करण्याची गरज होती. परंतु शिवसेनेने मलिकांची री ओढत वानखेडे यांच्यावर तोफ डागली.
अंमली पदार्थ, ड्रग्ज जिहादमुळे देशातील अनेक तरुण-तरुणींचे आयुष्य करपलेले आहे. ड्रग्जच्या विरोधात एक देश म्हणून सर्वानी उभे ठाकण्याची गरज असताना ड्रग्जच्या कारभाराविरुद्ध उभे ठाकलेल्या वानखेडेंना खच्ची करण्याचे काम सुरू आहे. ते हिंदू की मुस्लीम यावर खल सुरू आहे, त्यांचा बाप काढला जातोय. शेलक्या भाषेत नबाव मलिक त्यांचा पाणउतारा करतायत, या विषयाशी काडीचाही संबंध नसलेल्या त्यांच्या पत्नीला या सगळ्या प्रकऱणात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ड्रग्जच्या धंद्यात प्रचंड फायदा आहे. त्यामुळे या धंद्याविरुद्ध कारवाई करणाऱ्यांना कायम धोक्याच्या छायेत वावरावे लागते. एनसीबी ही एजन्सी अत्यंत गोपनीय पद्धतीने काम करते. मुंबईत त्यांच्या कार्यालयाबाहेर तुम्हाला बोर्ड सुद्धा सापडणार नाही. इथे पोस्टींग देताना अत्यंत मेहनती आणि स्वच्छ रेकॉर्ड असलेले अधिकारी निवडले जातात. वानखेडेंचा ट्रॅक रेकॉर्डही तसाच आहे. याच ट्रॅक रेकॉर्डमुळे त्यांना यापूर्वी ‘डीआरआय’ आणि ‘एनआयए’ सारख्या संवेदनशील विभागात पोस्टींग मिळाल्या. परंतु आता ज्या प्रकारे त्यांना लक्ष्य केले जातेय ते पाहून एखादा दुसरा अधिकारी ड्रग्जच्या धंद्यातील बड्या माशांना हात लावण्याचा प्रयत्न करू शकेल काय?
नवाब मलिकांनी त्यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आणि तकलादू आहेत. वानखेडे यांच्या वडीलांचे नाव दाऊद वानखेडे आहे, हा त्यातलाच एक आरोप. स्वत: समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कागदपत्रासह या आरोपांची चिरफाड केली. परंतु समीर यांच्या बदनामीची सुपारी घेतली असल्यामुळे खोटे उघडे पडल्यानंतरही पत्रकार परीषदांमध्ये आरोपांची राळ उडवण्याचे काम जारी ठेवले. त्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस पत्रकारांना नाही. एखाद्याने जर प्रयत्न केलाच तर मॅनेजमेंटला फोन जातात. नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी मिळते. या प्रकरणात सातत्याने ट्वीटरवर मत मांडणाऱ्या एका पत्रकाराला हाच अनुभव आला. सत्याच्या बाजूने बोलणाऱ्यांची गळचेपी करण्याचे काम सुरू आहे.
वानखेडे यांनी आर्यन खानप्रकरणी २५ कोटींचे डील केले होते, असा ठपका ठेवण्यात आला आहे. हे डील जर झाले असते तर आर्यन खान आतापर्यंत बाहेर असता. अशाच प्रकारचे डील नबाव मलिकांनी त्यांच्या जावयासाठी केले असते आणि त्याला गांजा तस्करीप्रकरणी आठ महिने तुरुंगात सडण्याची वेळ आली नसती. परंतु या दोघांवर कारवाई झाली याचे एकमेव कारण म्हणजे समीर वानखेडे हे वाझे नाहीत. साम आणि दाम नीतीने त्यांना खरेदी करणे शक्य झाले नाही म्हणून त्याच्याविरोधात दंड आणि भेद नीतीचा वापर होतोय.
एनसीबीच्या कारवाईतील एक पंच प्रभाकर साईल याने कोणाला तरी मोबाईवर या २५ कोटीच्या डीलबाबत बोलताना ऐकले. साईल बोलतानाचा व्हीडीयो एकदा पाहा. तो किती दबावाखाली बोलतोय ते शेंबड्या पोरालाही लक्षात येईल. चार वाक्य खरीं बोलताना घशाला कोरड पडत नाही, त्यामुळे सारखं पाणी प्यावं लागत नाही.
हे ही वाचा:
समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?
‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे
पाकिस्तान जिंकल्याच्या जल्लोषात शिक्षिकेने गमावली नोकरी!
मुंबईतून २४ किलो चरस जप्त; चार आरोपींना अटक
असं कोण तरी कुठे तरी कोणाशी मोबाईलवर बोलला म्हणून आरोप आणि कारवाई झाली तर सगळे ठाकरे मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल. कोर्टात असे आरोप टीकत नाहीत. नबाब मलिक यांच्याक़डे समीर वानखेडे यांच्या विरोधात इतके पुरावे असते तर ते पत्रकार परीषदा घेऊन वातावरण निर्मिती करत बसले नसते. थेट कोर्टात जाऊन त्यांनी वानखेडेंचे वस्त्रहरण केले असते. परंतु मलिक यांनी तसे केले नाही कारण, कोर्टाचे कामकाज आणि पत्रकार परीषदांमध्ये फरक असतो. तिथे ऐकीव माहीतीला केराची टोपली दाखवली जाते.
नबाब मलिक आपल्या जावयाचे उट्टे काढतायत. पण शिवसेना त्यांच्या मागे का फरफटते आहे हे कळण्याच्या पलिकडचे आहे. राज्यात काही वर्षांपूर्वी घडलेल्या एमपीएससी घोटाळ्यात अनेक मराठी अधिकाऱ्यांना विनाकारण गोवल्यानंतर याप्रकरणाचा तपास करणाऱ्या सुधाकार पुजारे या अधिकाऱ्याला सामनातून प्रचंड झोडण्यात आले होते. तेलगी प्रकरणात गोवण्यात आलेल्या अनेक मराठी पोलिस अधिकाऱ्यांसाठी सामनाने बॅटींग केली होती. सामनाने वानखेडे यांच्याविरोधात ओकलेली गरळ वाचून हा इतिहास आठवल्याशिवाय राहात नाही.
अर्णब गोस्वामी, कंगणा रनौत यांच्या विरोधात सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवल्याबद्दल उच्च न्यायालयाने ज्या ठाकरे सरकारला चपराक लावली ते वानखेडे प्रकरणी केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करतायत. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग होत असेल तर तोंडाच्या वाफा दवडण्याची गरज काय? तोंडपाटीलकी करणारे मलिक, राऊत आणि अन्य नेते मंडळी याप्रकरणी कोर्टात दाद का मागत नाहीत?
अलिकडेच आय़कर खात्याने काही बडे बिल्डर आणि नेत्यांच्या नातेवाईकांविरुद्ध मोठी कारवाई केली. सुमारे हजार कोटींचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आणले, तेव्हाही शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परीषदा घेऊन आय़कर खात्याविरुद्ध भडीमार केला. परंतु या अन्यायाविरुद्ध त्यांनी कोर्टात दाद मागितली नाही. कोर्टात गेलो तर तोंड फुटेल याची पुरेपुर जाणीव असल्यामुळे पत्रकार परीषदा घेऊन मनातली भडास काढली जाते. पत्रकारांनाही अमक्या तमक्याला दणका असे मथळे देता येतात.
दमबाजी आणि दबावाचे राजकारण करून घपले लपतील, अशा गैरसमजात कोणी राहू नये. सेटलमेंटच्या राजकारणाचे दिवस आता संपले. ज्यांनी घोटाळे, घपले केलेत त्यांचा न्याय नक्की होणार. कोणाचा बाप काढून, धर्म काढून सुटका होईल या गैरसमजात कोणी राहू नये. वानखेडेंच्या बाजूने महाराष्ट्रातील न्यायप्रिय जनता आहे. ते एकटे आहेत, या गैरसमजातून महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी बाहेर यावे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)