30 C
Mumbai
Wednesday, May 31, 2023
घरराजकारणबोका हरामी...

बोका हरामी…

Google News Follow

Related

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या त्यांच्या ताज्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना ‘बोको हराम’ आणि ‘इस्लामिक स्टेट्स’शी केली आहे.

खुर्शीद हे जुने जाणते काँग्रेस नेते आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून शिकलेले आहेत. अनेक वर्षे ते नेहरू-गांधी परिवाराच्या कृपेमुळे सत्तेच्या परिघात वावरले आहेत. त्यांच्या विचारसरणीवर नेहरू-गांधी परिवाराचा प्रगाढ प्रभाव आहे.
अलिकडे निवडणुकांचा बिगुल वाजू लागला की, काँग्रेस नेते राहुल गांधी कपाळी भस्म लावून मंदिराच्या वाऱ्या करतात, प्रियांका गांधी मंदिरात जाऊन ध्यानस्थ बसतात. आम्ही जनेऊधारी आहोत, पंडीत आहोत याचा उच्चारवाने गजर करतात, हे आपण पाहिले असले तरी या परिवाराचे अंतरंग हिंदू द्वेषाचेच राहीले आहेत. खुर्शीद यांच्यासारख्या नेत्यांना हे अंतरंग पुरेपूर ठाऊक आहेत.

याच गांधी-नेहरू परिवाराने हिंदू धर्म, हिंदू धर्माचे आराध्य श्रीराम, त्यांचा इतिहास सांगणारे रामायण, त्या इतिहासाच्या पाऊलखुणा असलेला रामसेतू या सर्वच गोष्टी कायम नाकारल्या, त्यांची खिल्ली उडवली. राम जन्मभूमीवर असलेले मंदीर उद्ध्वस्त करून उभारलेले बाबराचे थडगे टिकवण्यासाठी कायम आपली शक्ती खर्च केली. मंदिरे उद्ध्वस्त करणारे मुघल यांचे इतिहासपुरूष राहिले आहेत. काँग्रेसच्या काळात भारताचा देदीप्यमान इतिहास हिरव्या रंगात रंगवण्याचे कर्तृत्व त्यांचेच. परंतु हिंदू समाजाच्या सुदैवाने आणि रा.स्व.संघाच्या कैक दशकांच्या तपश्चर्येमुळे देशाच्या राजकारणात रुजलेल्या काँग्रेस नावाच्या हिंदूविरोधी वाळवीचे उच्चाटन होत आहे. हिंदूविरोध करणाऱ्या मानसिकतेला धिक्कारून देशाच्या जनतेने कपाळाला गंध आणि हाती आरतीचे तबक घेऊन पतितपावनी गंगेसमोर नतमस्तक होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात देशाच्या सत्तासनावर बसवला. या बदलामुळे काँग्रेससोबत खुर्शीद यांच्यासारखे नेतेही रस्त्यावर आले आहेत.
धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली वर्षोनुवर्षे जपलेला हिंदूविरोध देशवासियांच्या लक्षात आल्यामुळे राजकीय क्षेत्रात ही क्रांती झाली. हिंदुत्वविरोधकांचे तोंड काळे झाले. त्यांची शक्ती क्षीण झाली.

देशातील हिंदू जागा झाला केवळ या मजबुरीपायी रामायण काल्पनिक असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना दर निवडणुकीच्या आधी मंदिराच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. परंतु हे पाखंड हिंदू समाजाला नवे नाही. माता सीतेचे हरण करायला आलेला रावणही ऋषी रुप धारण करून भगव्या वस्त्रात आलेला होता हे त्यांना माहिती आहे. काँग्रेस नेते अपवादात्मक परीस्थितीत, केवळ नाईलाजास्तव मंदीर आणि मंदिरातील देवांसमोर नतमस्तक होत असले तरी त्यांच्या रक्तात मुरलेला हिंदूद्वेष अधेमध्ये उसळी घेतोच. त्यातून सलमान खुर्शीद सारखे बाजार उठलेले नेते हिंदुत्वाच्या विरोधात गरळ ओकत असतात. काँग्रेसचा खरा चेहरा उघड करत असतात.

‘बोको हराम’ ही नायजेरीयातील इस्लामिक दहशतवादी संघटना, ‘इस्लामिक स्टेट्स’चा उगम इराकमध्ये झाला. जगावर इस्लामची राजवट प्रस्थापित करणे हे दोन्ही संघटनांचे ध्येय. इस्लामी धर्मग्रंथ हीच त्यांची प्रेरणा. परंतु खुर्शीद यांच्यासारखे लबाड बोके ना या संघटनांच्या ध्येयाबाबत भाष्य करत, ना या संघटनांच्या प्रेरणास्त्रोतांबाबत. हे छुपे कट्टरवादी आहेत. उद्या भारतात इस्लामी राजवट आली, तर एका क्षणात धर्मनिरपेक्षतेचा झेंडा भिरकावून ते कट्टरतावाद्यांच्या कळपात जाऊन उभे राहतील.

या देशात धर्मनिरपेक्षतेच्या मुखवट्याआड इस्लामचा कट्टरतावाद काँग्रेसने पद्धतशीरपणे जोपासला. दाढी नसलेले, गुळगुळीत शेव्ह करणारे, सुधारवादी चेहरा असलेले मुस्लीम नेतृत्व उभे केले असले तरी त्यांचे अंतरंग मात्र कट्टरवादी आणि मदरसाछापच राहीले. काँग्रेसचा धर्मनिरपेक्षतावाद काँग्रेसमधील मुस्लीम नेत्यांच्या सोयीचा राहिला. याच धर्मनिरपेक्षतावादाच्या आड इफ्तारच्या पार्ट्या, झोडायच्या स्कल कॅप घालून मजारीवर चादरी चढवायच्या, बाबरी मशिदीचा उदो उदो करायचा, रामायण-महाभारताची खिल्ली उडवायची हे सर्व प्रकार व्यवस्थित सुरू राहिले. परंतु हिंदुत्ववाद्यांनी रामजन्मभूमी आंदोलन उभारून देशावर लादलेल्या बेगडी धर्मनिरपेक्षतेविरुद्ध शंखनाद केला. या विषयावर उघड चर्चा सुरू करून काँग्रेसचा खरा चेहरा लोकांसमोर आणायला सुरूवात केली. रामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रारंभापासून आजतागायत या मुखवट्यावर असे जबरदस्त प्रहार झाले की, हा मुखवटा आता जर्जर झाला आहे. त्या मागचा भेसूर चेहरा लोकांना स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळे नेतृत्वाने जनेऊ दाखवत हिंडायचे आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी कट्टरतावादाची नखे दाखवत फिरायचे असा प्रकार सुरू झाला आहे.

अयोध्या हा या धर्मनिरपेक्षवाद्यांच्या बर्बादीचा केंद्र बिंदू आहे. खुर्शीद यांनी त्यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकातून हिंदुत्वावर केलेले प्रहार याच पोटशूळातून केले आहेत. पुस्तकात खुर्शीद यांनी अयोध्या प्रकरणात काँग्रेसची भूमिका (फसलेली), कोर्टबाजी, हिंदुत्वाबाबत काँग्रेसमध्ये सुरू असलेला नवा विचार(?) याबाबत विचार व्यक्त केले आहेत. अयोध्या विवादप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे समर्थन करून अयोध्या वादात काँग्रेस चुकीच्या बाजूला उभी होती हेही त्यांनी आडून कबूल केले आहे. हिंदुत्वाची तुलना इस्लामी दहशतवादी संघटनांशी करताना काँग्रेसमधील एक गट हिंदुत्वाकडे वळण्यास इच्छुक असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. म्हणजे एकीकडे हिंदुत्वाची बोको हरामशी तुलना करायची आणि त्याचवेळी काँग्रेस ‘सॉफ्ट हिंदुत्व’ स्वीकारते आहे अशी पुडी सोडायची असा हा प्रकार. ‘गुड हिंदुत्व’ आणि ‘बॅड हिंदुत्व’ अशी फाळणी करायची आणि हिंदुत्ववाद्यांमध्ये लावून द्यायची, हिंदुत्ववाद्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा अशी रणनीती यामागे दिसते. हिंदुत्वाचा प्रभाव लक्षात घेऊन काँग्रेसमधील थिंक टॅंक कामाला लागली आहे.

 

हे ही वाचा:

मुंबईला पुढे न्यायला भाजपा तत्पर

पंजाबमधील एसटी चालकाला २५ हजार आणि महाराष्ट्रात फक्त १२ हजार…

महिंद्रा म्हणतात, मोदी सरकारमुळे पद्म पुरस्काराचे रूप पालटले

‘हे सरकार कायमचं निलंबित करण्याची वेळ आली आहे’

 

काँग्रेसमधील एक गट हिंदुत्वाकडे वळण्यास इच्छुक आहे हे खरेच आहे. कारण हिंदुत्वाचे राजकारण आता आतबट्ट्याचे राहिलेले नाही, राहुल गांधीनी नव्या दत्तात्रय गोत्राचा शोध लावून गंध टिळे लावायला सुरूवात केली ते त्यामुळेच.
परंतु काँग्रेसची मूळ प्रवृत्ती त्यांना पुन्हा पुन्हा मुस्लीम अनुनयाकडे खेचून नेणार हे अटळ सत्य आहे. उत्तर प्रदेशातील कासगंज येथे अल्ताफ नावाच्या एका तरुणाची पोलिस कोठडीत हत्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली. खुर्शीद काही काँग्रेस नेत्यांसोबत अल्ताफच्या घरी जाऊन आले. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी त्यांनी त्याच्या कुटुंबियांना दाखवली.

खुर्शीद हे काँग्रेसच्या राजकारणाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. गंध-टिळे आणि जानवे दाखवून हिंदूना गाजर दाखवायचे. परंतु राजकारण करायचे ते फक्त अल्पसंख्याक मतांसाठी. काँग्रेसच्या राज्यात दलित-मुस्लिमांवर अत्याचार झाले की तोंडात मळी भरायची आणि भाजपाशासित राज्यात काही घडले की आग पेटवायला पळायचे असे राजकारण काँग्रेस करते आहे.
मुस्लीम मतांसाठी राजकारण करायचे आणि हिंदूंना भ्रमित करून या मतांमध्ये फूट पाडायची हीच काँग्रेसची रणनीती आहे.
परंतु खुर्शीद किंवा काँग्रेस यांना ती फळेल याची शक्यता कमीच. हिंदू दहशतवादाचे अस्तित्वात नसलेले भूत उभे करून सुशील कुमार शिंदे, पी.चिदंबरम हे नेते जसे अडगळीत गेले त्यापेक्षा खुर्शीद यांच्यासारख्यांची वेगळी स्थिती होईल, असे मानण्याचे कारण नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
75,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा