राज्यात सध्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची चर्चा असून या प्रकरणात नव्याने खुलासे होत आहेत. पूजा खेडकर हिचे महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी थांबवण्यात आले होते. तसेच राज्य सरकारकडून तसे निर्देश देऊन मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत तिला बोलावण्यात आले होते. २३ जुलै रोजी त्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पूजा खेडकर ही मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये (LBSNAA) हजर झाली नाही.
पूजा खेडकर हिला आयएएस प्रशिक्षण केंद्रात हजर राहण्याची अंतिम मुदत २३ जुलै होती. मात्र, पूजा खेडकर हिने हाही आदेश धुडकावल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र खोटे केल्याप्रकरणी तिच्यावर आरोप आहे. १६ जुलै रोजी पूजा खेडकर हिचे प्रशिक्षण स्थगित करण्यात आले होते. तिला महाराष्ट्र राज्य सरकारच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त करण्यात आले होते. मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने आपल्या पत्रात म्हटले होते की, पूजा दिलीप खेडकरचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांना पुढील आवश्यक कारवाईसाठी त्वरित परत बोलावले आहे.
पूजा खेडकर आणि तिचे कुटुंबीय चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यांनी केलेल्या गैरव्यवहारांची तपासणी सुरू असतानाच आता युपीएससीने प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर विरुद्ध बनावट ओळख सादर केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे, तसेच त्यांची उमेदवारी रद्द करण्याच्या हालचाली देखील सुरू असल्याची माहिती आहे. पूजा खेडकर हिच्यावर फौजदारी खटल्यासह तिच्याविरुद्ध अनेक कारवाई सुरू केल्या आहेत.
हे ही वाचा:
मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारला दिली मुदतवाढ
चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग होत असतानाचं जाणवला भूकंपाचा धक्का
बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी सोडणारा ससूनचा डॉक्टर निलंबित
पत्रकार प्रदीप भंडारी आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते !
नेमकं प्रकरण काय आहे?
पूजा खेडकर हिचे प्रशिक्षण ३ जून २०२४ पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाले होते. पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावत महाराष्ट्र शासन असे लिहिले होते. याबाबत वाद झाल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांची तत्काळ वाशीम येथे बदली झाली होती. वाशीममध्ये दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी होता; मात्र आता यावर स्थगिती देण्यात आली होती. खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरणे यामुळे प्रशिक्षणावर असलेल्या पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप झाला, त्याबाबत चौकशी सुरू होती. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली होती. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचा आरोप आहे.







