आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने रविवारी, १३ जुलै रोजी, आपला दीर्घकालीन जोडीदार पारुपल्ली कश्यपपासून वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केला. सायनाने इंस्टाग्रामवर एक छोटी पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. जवळपास सात वर्षांच्या वैवाहिक आयुष्यांनंतर दोघे वेगळे होत आहेत.
सायना आणि पारुपल्ली यांनी हैदराबादमधील पुल्लेला गोपीचंद अकादमीतून एकत्र बॅडमिंटन प्रवास सुरू केला होता. सायनाने ऑलिंपिक कांस्यपदक जिंकून आणि जागतिक क्रमांक १ बनून जागतिक ओळख मिळवली, तर कश्यपने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकत आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत स्वतःचं स्थान निर्माण केलं.
“कधी कधी जीवन आपल्याला वेगवेगळ्या दिशांमध्ये घेऊन जातं. खूप विचार करून, मी आणि कश्यप पारुपल्लीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शांतता, स्वतःची प्रगती आणि या घटनेतून सावरण्यासाठी हा मार्ग निवडत आहोत. या आठवणींसाठी मी कृतज्ञ आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद,” असं सायनाने रविवारी रात्री आपल्या आश्चर्यकारक घोषणेत म्हटलं.
दुसरीकडे, कश्यपने या विधानावर अजून प्रतिक्रिया दिली नव्हती किंवा वेगळं होण्याची अधिकृत घोषणा केली नव्हती.
सायना आणि पारुपल्लीने २०१८ मध्ये विवाह केला होता. त्याआधी ते तब्बल एक दशक एकत्र नात्यात होते.
स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्त झाल्यावर पारुपल्लीने प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली आणि सायनाला तिच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात मार्गदर्शन केलं. पार्टनर ते प्रशिक्षक अशी त्यांची भूमिका बदलली, यावरून त्यांच्या नात्यातील गहिरेपण दिसून येतं.
सायनाने २०१९ च्या राष्ट्रीय स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला हरवून चमक दाखवली होती, तेव्हा कश्यप तिला मार्गदर्शन करत होते.
हे ही वाचा:
गझलांचा शहेजादा, साजातून भावना रचणारा जादूगार…
वाहतूक विभागाचे सहाय्यक फौजदार यांची गळफास घेऊन आत्महत्या
हर्षवर्धन श्रृंगला यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
२०१६ नंतर आलेल्या जखमांमुळे सायनाच्या कामगिरीवर परिणाम झाला होता. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करताना कश्यप कायम तिच्या सोबत होते. स्पर्धांच्या वेळी कश्यप तिच्या बाजूला बसून तिला तांत्रिक सूचना देत आणि मानसिक पाठिंबा देत असल्याचं वारंवार पाहायला मिळालं.
सायनाने शेवटचा व्यावसायिक सामना जून २०२३ मध्ये खेळला. मात्र, तिने अजून अधिकृत निवृत्तीची घोषणा केलेली नाही.







