काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल यांच्याशी संबंधित २,१६१ कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (१८ जुलै) सकाळी त्यांच्या भिलाई येथील निवासस्थानी छापे टाकले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कर्मचाऱ्यांच्या मदतीने ईडीचे पथक सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास तीन वाहनांमधून भिलाई येथील घरात पोहोचले. घरात ईडीची चौकशी सुरू आहे.
विधानसभा अधिवेशनादरम्यान सहसा रायपूर येथील त्यांच्या निवासस्थानी राहणारे भूपेश बघेल हे छापे टाकण्यास सुरुवात झाली तेव्हा भिलाई येथील निवासस्थानी उपस्थित होते. या घटनेला दुजोरा देताना माजी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर हिंदीमध्ये पोस्ट केली कि: “ईडी आ गयी” (ईडी आली आहे). एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये बघेल यांनी असेही निदर्शनास आणून दिले की छत्तीसगड विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छापे टाकण्यात आले.
चैतन्य बघेल यांच्यावर ईडीची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी मार्चमध्ये, एजन्सीने त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले होते, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रांसह सुमारे ३० लाख रुपये रोख जप्त करण्यात आले होते. भूपेश बघेल यांच्या कार्यकाळात सरकारी दुकानांमधून बेहिशेबी दारू विकण्यासाठी डुप्लिकेट होलोग्राम आणि बाटल्यांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे राज्याच्या तिजोरीतून मोठा महसूल बुडाला, असा आरोप अधिकाऱ्यांनी केला.
हे ही वाचा :
टीआरएफला जागतिक दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे भारताकडून स्वागत!
दिल्ली: २० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या!
वांद्रे येथे तीन मजली चाळ कोसळली!
तेलंगणातील १४ गावे महाराष्ट्रात येणार!
दरम्यान, भूपेश बघेल किंवा त्यांच्या कुटुंबावर ईडीने कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मार्च २०२५ मध्ये, ईडीने चैतन्य बघेल यांच्या दुर्ग जिल्ह्यातील घर आणि त्यांचे जवळचे सहकारी लक्ष्मी नारायण बन्सल उर्फ पप्पू बन्सल यांच्याशी संबंधित मालमत्तांसह १४ ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात रोख रक्कम जप्त करण्यात आली होती आणि नोटा मोजण्याच्या यंत्रांचा वापर करण्यात आला होता.







