मुंबई उच्च न्यायालयाने ११ जुलै २००६ रोजी झालेल्या मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी ५ जणांना फाशी आणि ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु ती सर्व रद्द करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध खटला सिद्ध करण्यात सरकारी पक्ष पूर्णपणे अपयशी ठरला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने धक्का बसल्याचे भाजपा नेते किरीट सोमैया यांनी म्हटले आहे.
किरीट सोमैया म्हणाले, मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याने धक्का बसला आहे. निश्चितपणे २००६ चा तपास, कायदेशीर प्रतिनिधित्व (Legal representation), न्यायालयीन मांडणी यात त्रुटी राहिल्या असतील परंतु मुंबईकरांना न्याय हवा आहे. हे जे अतिरेकी आहेत त्यांना फाशी झालीच पाहिजे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपील केली आहे कि, चांगली तपास समिती, लीगल टीमची रचना करा, सर्वोच्च न्यायलयात जा. मुंबईकरांना न्याय मिळालाच पाहिजे, असे किरीट सोमैया म्हणाले.
दरम्यान, २००६ रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये ११ मिनिटांत ७ बॉम्बस्फोट झाले ज्यामध्ये १८९ लोकांचा मृत्यू झाला आणि ८२७ लोक जखमी झाले. एटीएसने या प्रकरणात एकूण १३ आरोपींना अटक केली आणि १५ आरोपी फरार झाले. (ज्यांपैकी काही पाकिस्तानमध्ये असल्याचा संशय होता).
२०१५ मध्ये, कनिष्ठ न्यायालयाने या बॉम्बस्फोट प्रकरणात १२ जणांना दोषी ठरवले, ज्यामध्ये ५ जणांना मृत्युदंड आणि ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर, कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत, सरकारने ५ आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची पुष्टी करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, आरोपींनीही शिक्षेविरुद्ध याचिका दाखल केली.
हे ही वाचा :
मुंबईतील २००६च्या लोकल रेल्वे बॉम्बस्फोटातील सर्व १२ आरोपी निर्दोष
शीतपेयात मादक पदार्थ मिसळून बलात्कार; युवा काँग्रेस नेत्याला अटक!
आयटी क्षेत्रातील मंदीमुळे शेअर बाजार सलग तिसऱ्या आठवड्यात घसरला
आजच्या निकालात न्यायमूर्ती अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या खंडपीठाने म्हटले की, “आरोपींविरुद्धचा खटला संशयापलीकडे आहे हे सिद्ध करण्यात सरकारी वकिल पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.” न्यायालयाने म्हटले की, जवळजवळ सर्व सरकारी वकिलांचे जबाब अविश्वसनीय असल्याचे आढळले. न्यायालयाच्या मते, “स्फोटाच्या जवळजवळ १०० दिवसांनंतरही टॅक्सी चालक किंवा घटनास्थळी उपस्थित असलेले इतर लोकांना आरोपींची आठवण असणे अशक्य आहे.”







