भारताचे १४ वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आपल्या आरोग्याच्या कारणांचा उल्लेख करत पदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ अद्याप दोन वर्षे शिल्लक असतानाही त्यांनी ही अनपेक्षित घोषणा केली. ऑगस्ट २०२२ मध्ये पदभार स्वीकारलेल्या धनखड यांनी सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला राजीनामा सादर केला, ज्यात त्यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद ६७ (अ) चा उल्लेख केला आहे. चला पाहूया, काय आहे हा अनुच्छेद ६७ (अ)? उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या पत्रात भारतीय संविधानातील अनुच्छेद ६७ (अ) चा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये उपराष्ट्रपतीच्या राजीनाम्याबाबतची तरतूद आहे. या अनुच्छेदानुसार, उपराष्ट्रपती राष्ट्रपतींना संबोधित करून, स्वतःच्या हाताने लिहिलेल्या पत्राद्वारे पदाचा राजीनामा देऊ शकतो. असा राजीनामा तत्काळ प्रभावी मानला जातो. संविधानानुसार, उपराष्ट्रपतीने आपला राजीनामा फक्त राष्ट्रपतींकडेच सादर करणे आवश्यक आहे.
उपराष्ट्रपती आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या अगोदरही केव्हाही पदाचा राजीनामा देऊ शकतात, त्यासाठी त्यांना फक्त एक स्वहस्ताक्षरित पत्र राष्ट्रपतींना देणे आवश्यक असते. ही संपूर्ण प्रक्रिया संविधानातील अनुच्छेद ६७ अंतर्गत येते, ज्यात उपराष्ट्रपतीच्या कार्यकाळाचे नियम आणि स्वरूप निश्चित केले आहे. संविधानतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्यामुळे आता भारतात नव्या उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठीची घटनात्मक प्रक्रिया सुरू होईल. कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती देखील असतात, त्यामुळे हे पद फार काळ रिक्त ठेवता येत नाही.
हेही वाचा..
१९१६ चे टिशर्ट घालून दहिहंडी उत्सवात एक हजार स्वयंसेवक तैनात करा!
मराठी भाषेच्या वादावर काय म्हणाल्या जेएनयूच्या कुलगुरू?
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याने विरोधक स्तब्ध
‘या’ उपराष्ट्रपतींनी त्यांच्या कार्यकाळाच्या मध्यभागी दिला होता राजीनामा!
राजकीय विश्लेषकांच्या मते, संसदेच्या वरीष्ठ सभागृहाच्या (राज्यसभा) कार्यात सातत्य राहावे यासाठी नव्या उपराष्ट्रपतीची निवड लवकरच होण्याची दाट शक्यता आहे, कारण संविधान त्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे देते. मागील एक वर्षात धनखड यांना आरोग्याच्या कारणास्तव अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अलीकडेच त्यांना नैनीतालमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या आजाराचे नेमके स्वरूप अद्याप उघड करण्यात आलेले नाही.







