पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात उद्यापासून देशभर “जीएसटी बचत उत्सव” सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच जीएसटी दरांमध्ये कपात लागू केली जाणार असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादनांच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोदींनी यावेळी नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छाही दिल्या आणि सांगितले की, हा उत्सव सणासुदीच्या काळात नागरिकांना आर्थिक दिलासा देणारा ठरेल. आता त्यांच्या या “जीएसटी बचत उत्सव” घोषणेमुळे सणासुदीच्या हंगामात महागाई कमी होण्याची आणि खरेदीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जीएसटी सुधारणांमुळे भारताच्या विकासगाथेला मिळणार गती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात जीएसटी सुधारणांचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, या सुधारणांमुळे भारताच्या विकासगाथेला नव्या उंचीवर नेले जाईल. ते म्हणाले, “२०१४ मध्ये देशवासीयांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. त्या वेळी आम्ही सार्वजनिक हित आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन जीएसटीला आमचे प्राधान्य मानले. सर्व राज्यांना विश्वासात घेऊन, स्वतंत्र भारतातील सर्वात मोठी करसुधारणा आम्ही यशस्वीपणे राबवली.”
“केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे देश डझनभर करांच्या गुंतागुंतीतून मुक्त झाला आणि ‘एक राष्ट्र, एक कर’ हे स्वप्न साकार झालं.” मोदींनी यावेळी असेही स्पष्ट केले की, “सुधारणा या सतत सुरू राहणाऱ्या प्रक्रिया असतात. काळ बदलतो, देशाच्या गरजा बदलतात — त्यामुळे पुढील पिढीच्या गरजांना अनुसरून नवी सुधारणा करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच नवीन जीएसटी सुधारणा लागू केल्या जात आहेत.” या नव्या उपाययोजनांमुळे व्यवसाय करणे सुलभ होईल, ग्राहकांना दिलासा मिळेल आणि अर्थव्यवस्थेला नवा बळ मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आपण भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपण अशा वस्तू खरेदी केल्या पाहिजेत ज्या भारतात बनवल्या जातात. ज्यामध्ये आपल्या तरुणांचे कष्ट आणि घाम यांचा समावेश आहे. आपल्याला प्रत्येक घराला स्वदेशीचे प्रतीक बनवायचे आहे. अभिमानाने सांगा की मी स्वदेशी खरेदी करतो. प्रत्येक दुकानदाराने म्हणावे की मी स्वदेशी वस्तू विकतो. तरच भारताचा विकास होईल. सर्व राज्य सरकारांना देखील विनंती आहे की त्यांनी विकसित भारतासाठी स्वदेशी आणि स्वावलंबनाचा संकल्प स्वीकारावा.”
‘नागरिक देवो भव’
“आपण ‘नागरिक देवो भव’ या मंत्राचे पालन करून पुढे जात आहोत आणि त्याचे प्रतिबिंब आपल्याला पुढच्या पिढीच्या जीएसटी सुधारणांमध्ये दिसू शकते. जर आपण आयकर सूट आणि जीएसटी सूट एकत्र केली तर एका वर्षात घेतलेले निर्णय देशातील लोकांचे २.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत करतील आणि म्हणूनच मी म्हणतो, हा बचतीचा उत्सव आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणतात.
हे ही वाचा :
चोराच्या उलट्या बोंबा; पाकिस्तान म्हणतो, काश्मीरसाठी भारताने पुढाकार घ्यावा!
प्रशांत किशोर यांना तोट्यातील कंपन्यांकडून मिळाले कोट्यवधी
नवीन जीएसटी स्लॅबमुळे बहुतेक दैनंदिन वस्तू स्वस्त होतील
“नवीन स्वरूपात, आता फक्त ५% आणि १८% कर स्लॅब असतील. याचा अर्थ बहुतेक दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. अन्नपदार्थ, औषधे, साबण, ब्रश, पेस्ट, आरोग्य आणि जीवन विमा, अशा अनेक वस्तू आणि सेवा एकतर करमुक्त असतील किंवा फक्त ५% कर भरावा लागेल. ज्या वस्तूंवर पूर्वी १२% कर आकारला जात होता त्यापैकी ९९% वस्तू आता ५% कराच्या स्लॅबमध्ये आल्या आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ते म्हणाले, “शक्तीच्या उपासनेचा उत्सव नवरात्र उद्यापासून सुरू होत आहे. तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! पहिल्याच दिवशी, भारत स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहे.” मोदींनी सांगितले की, “नवरात्रीच्या पहाटे सूर्योदय होताच पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा लागू होतील आणि त्याचबरोबर ‘जीएसटी बचत महोत्सव देशभरात सुरू होईल.” या महोत्सवामुळे, नागरिकांची आर्थिक बचत वाढेल, वस्तू अधिक परवडणाऱ्या होतील, खरेदी अधिक सुलभ होईल. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, “गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी आणि महिला वर्गाला या महोत्सवाचा विशेषतः मोठा फायदा होईल.” या पुढाकारामुळे सणासुदीच्या काळात देशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि जनतेला दिलासा मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.







