पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सांगितले की, भारत हा रशिया- युक्रेन युद्धात तटस्थ नाही तर, शांततेच्या बाजूने आहे. नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितलेल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. शुक्रवारी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी पुतिन यांचे दूरदर्शी नेते म्हणून कौतुक केले आणि हे शांततेचे युग असल्याचे अधोरेखित केले.
“भारत तटस्थ नाही. भारताची एक बाजू आहे आणि ती बाजू शांततेची आहे. आम्ही शांततेच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो आणि शांततेच्या सर्व प्रयत्नांना साथ देताना खांद्याला खांदा लावून उभे आहोत,” असे नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना सांगितले. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमधील सखोल संबंध दिसून आले. तसेच दोन्ही नेत्यांची मैत्रीही दिसून आली. ज्याने रशिया आणि भारत यांच्यातील मजबूत धोरणात्मक भागीदारी वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गेल्या ११ वर्षांत हे नेते १९ वेळा भेटले आहेत.
रशियाला भारताचा “खरा मित्र” म्हणत, पंतप्रधान मोदींनी जलद भू- राजकीय उलथापालथीच्या काळात विश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. “युक्रेन संकट सुरू झाल्यापासून, आम्ही सतत चर्चेत आहोत. वेळोवेळी, तुम्ही देखील, एक खरे मित्र म्हणून, आम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती देत राहिला आहात. माझा विश्वास आहे की विश्वास ही एक मोठी शक्ती आहे. राष्ट्रांचे कल्याण शांततेच्या मार्गात आहे. एकत्रितपणे, आपण जगाला त्या मार्गावर घेऊन जाऊ,” असे पंतप्रधान म्हणाले.
पुतिन यांनी दोन दिवसांचा भारत दौरा केला. यावेळी त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. तसेच तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. त्यांनी युक्रेन मुद्द्यावर वैयक्तिक लक्ष दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आश्वासन देताना पुतिन म्हणाले, “शांततेत तोडगा काढण्यासाठी अमेरिकेशी चर्चा सुरू आहे. शांततेचा तोडगा काढण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल आणि या प्रकरणाकडे वैयक्तिक लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.”
हे ही वाचा..
घुसखोर बांगलादेशींबद्दल पोस्ट टाकली म्हणून ‘आप’ सरकारकडून अटक
“पंतप्रधान मोदी दबावापुढे सहज झुकणारे नेते नाहीत”
सर्वसामान्यांना दिलासा! रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात
असीम मुनीर बनले अधिक शक्तिशाली! पाक सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
गुरुवारी रशियन राष्ट्राध्यक्ष दिल्लीत पोहोचले तेव्हा पंतप्रधान मोदींनी रेड कार्पेटवर त्यांचे स्वागत केले. प्रोटोकॉल तोडून त्यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर ते एकाच गाडीतून पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाकडे निघाले. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजनही केले होते.







