महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर (मनरेगा)ून काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मनरेगा संपवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत काँग्रेसने देशभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली.
वेणुगोपाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, मनरेगा संपवण्याच्या कथित सरकारी योजनेविरोधात १७ डिसेंबर रोजी देशभरातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर काँग्रेस आंदोलन करणार आहे. तसेच २८ डिसेंबर रोजी, काँग्रेसच्या स्थापना दिनी, प्रत्येक मंडल आणि गावात महात्मा गांधींचे फोटो घेऊन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
वेणुगोपाल यांनी मनरेगाला “ऐतिहासिक कायदा” संबोधत सांगितले की, या कायद्याने ग्रामीण भागातील कोट्यवधी कुटुंबांना रोजगाराचा अधिकार दिला, श्रमाची प्रतिष्ठा जपली आणि उपजीविकेची हमी दिली. मात्र सरकार या कायद्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस नेत्याने ‘एक्स’वर शेअर केलेल्या पत्रात असेही म्हटले आहे की, मनरेगा संपवण्यासाठी विधेयक आणणे हा सरकारचा जाणीवपूर्वक उचललेला धोकादायक निर्णय आहे. हा केवळ कायदेशीर बदल नसून, महात्मा गांधींच्या नावाशी जोडलेल्या लोककल्याणकारी कायद्यावर थेट हल्ला असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळात काँग्रेसच्या या आंदोलनाकडे जनतेच्या मूलभूत प्रश्नांपेक्षा राजकीय दबावाचे साधन म्हणून पाहिले जात असल्याचीही चर्चा सुरू आहे. सरकारकडून मात्र मनरेगा बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना काँग्रेसकडून आंदोलनाची हाक देण्यात आल्याने हा मुद्दा अधिक वादग्रस्त ठरत आहे.







