रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल पाश्चात्य देशांकडून होत असलेल्या टीकेला भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ठाम प्रत्युत्तर दिले आहे. भारताची ऊर्जा धोरणे ही पूर्णपणे राष्ट्रीय हित, किंमत आणि उपलब्धता यांवर आधारित असून कोणत्याही राजकीय झुकावावर आधारित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फिनलंडमध्ये आयोजित Kultaranta Talks या कार्यक्रमात ‘उभरत्या शक्ती आणि नव्या भू-राजकीय स्पर्धा’ या विषयावरील चर्चेत सहभागी होताना जयशंकर यांनी रशिया-युक्रेन युद्ध आणि भारताच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले.
एस जयशंकर म्हणाले की, “मी तेलाची खरेदी किंमत आणि उपलब्धतेच्या आधारावर करतो. त्या काळात बाजारात उपलब्ध असलेले बहुतांश तेल रशियाचे होते, कारण युरोपीय देश मध्यपूर्वेतील मोठ्या प्रमाणातील तेल खरेदी करत होते, जो पारंपरिकपणे आमच्या पुरवठ्याचा स्रोत राहिला आहे.” पाश्चात्य देशांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना जयशंकर यांनी दुहेरी निकषांचा आरोपही केला. ते म्हणाले, “तुम्ही नैतिक अस्पष्टतेबद्दल बोलत असाल, तर मी एवढेच सांगू इच्छितो की कोणत्याही युरोपीय देशावर भारतीय शस्त्रांनी हल्ला झालेला नाही. भारताच्या संदर्भात युरोपीय शस्त्रांबाबतही मी हेच म्हणू शकलो असतो, अशी माझी इच्छा आहे. युरोपीय देश अशी शस्त्रे विकतात ज्यांचा वापर भारतावर हल्ला करण्यासाठी केला जातो. हे आजचे नाही, तर अनेक वर्षांपासून सुरू आहे. आम्ही कधीही युरोपच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे कोणतेही पाऊल उचललेले नाही.”
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारत-रशिया ऊर्जा संबंधांवर पाश्चात्य देशांतील काही गटांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टीकाकारांचे म्हणणे आहे की, रशियन तेलाच्या वाढत्या आयातीमुळे नवी दिल्ली मॉस्कोकडे अधिक सहानुभूतीपूर्ण भूमिका घेत आहे. मात्र, भारताने वारंवार स्पष्ट केले आहे की त्याचे परराष्ट्र धोरण आणि ऊर्जा सुरक्षेशी संबंधित निर्णय हे केवळ राष्ट्रीय हिताच्या आधारे घेतले जातात. तसेच युद्ध संपवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक प्रयत्नांना भारताने सातत्याने पाठिंबा दिला आहे.
हे ही वाचा:
अणुऊर्जा आयातीवरील सीमा शुल्क माफ
बनावट सही प्रकरणी सीआयडीकडून अभिषेक बॅनर्जींची सहा तास चौकशी
नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन
पहिले ट्रिलियनपती एलॉन मस्क! संपत्ती आता तैवानच्या जीडीपीपेक्षाही जास्त
रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान भारताने संतुलित भूमिका राखण्याचा प्रयत्न केला आहे. एका बाजूला देशाच्या ऊर्जा गरजांना प्राधान्य देण्यात आले आहे, तर दुसऱ्या बाजूला शांतता चर्चा आणि राजनैतिक तोडग्याची बाजूही सातत्याने मांडली आहे. विश्लेषकांच्या मते, जयशंकर यांचे हे वक्तव्य भारताच्या रणनीतिक स्वायत्ततेचा आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा स्पष्ट संदेश मानला जात आहे.







