29.5 C
Mumbai
Monday, November 2, 2026
घरविशेषअल-निनोच्या धास्तीने सिडकोचा पाणीकपातीचा निर्णय

अल-निनोच्या धास्तीने सिडकोचा पाणीकपातीचा निर्णय

Google News Follow

अल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सिडको प्रशासनाने पाणीवापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोच्या कार्यक्षेत्रातील विविध नोडमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असून, प्रत्येक नोडमध्ये आठवड्यातून एकदा २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवार, २ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, पुढील आदेश मिळेपर्यंत पाणीकपात कायम राहणार आहे.

गतवर्षी अल-निनोच्या प्रभावामुळे राज्यात अपेक्षेपेक्षा कमी पर्जन्यमान नोंदविण्यात आले होते. परिणामी, पावसाळ्यातही अनेक भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. पाण्याचा प्राधान्यक्रमाने वापर, जलसाठ्यांचे योग्य व्यवस्थापन आणि पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाच्या निर्देशांनुसार सिडकोनेही संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन आतापासूनच पाणी व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे. त्यानुसार खारघरमध्ये सोमवारी, उलवेतील सेक्टर २, ३, ५, ६, १९, २०, २२, २३, २४, २५, २५-अ तसेच गव्हाण, कोपर आणि मोरावे परिसरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उलवेतील सेक्टर ८, ९, १०-ब, १५-क, १६, १७, १८ तसेच शेलघर, बामणडोंगरी, न्हावा, शिवाजीनगर आणि न्हावा खाडी परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

तळोजा येथे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार असून, द्रोणागिरीतील सेक्टर १, २, ११, १२, १५, ३०, ४७, ४८, ५०, ५१, ५२, ५३, ५४ आणि ५५ तसेच धुतुम, भेंडखळ, पागोटे, फुंडे, नवघर, नवघर पाडा, बोकरडवीरा आणि कुंडे परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

नोडनिहाय वेळापत्रकानुसार नवीन पनवेल पूर्वमध्ये सोमवारी, नवीन पनवेल पश्चिममध्ये मंगळवारी, कळंबोलीत बुधवारी, करंजाडे येथे गुरुवारी, तर कळुंद्रे आणि कामोठे येथे शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

दरम्यान, नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ आवश्यकतेपुरताच करावा, असे आवाहन सिडकोने केले आहे. वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच घरांमधील आणि सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या भरून वाहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नळ अथवा जलवाहिन्यांमधील गळती तातडीने दुरुस्त करावी, विनाकारण नळ सुरू ठेवू नयेत आणि साठवलेले पाणी केवळ शिळे झाले म्हणून फेकून देऊ नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहरातील जलतरण तलावांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यासही मनाई करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध जलसाठ्यांचे नियोजन आणि नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याने नवी मुंबईकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा